यशवंतराव चव्हाणांच्या नजरेतुन इतिहासाचे मर्म

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्मृतिशेष यशवंतराव चव्हाण यांच्या नजरेतुन…‘इतिहासाचे मर्म’

 

महाराष्ट्राचा आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात असलेला वारसा गतिमान करुन स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण सर्वांना परिचित आहेत. परंतु अनेक इतिहासकारांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करुन त्यांच्याकडुन मालोजीराजांपासुन ते शहाजीराजे-छत्रपती शिवराय-संभाजीराजेंपर्यंतचा इतिहास लिहुन घेणारे आणि इतिहास हा ज्यांच्या आवडीचा विषय होता असे इतिहासप्रेमी शिवप्रेमी यशवंतराव चव्हाण आजपर्यंत समोर आलेच नाहीत. यशवंतरावांचे विस्तृत आणि सखोल वाचन, मनन आणि चिंतन यांचे प्रतिबिंब त्यांच्या प्रत्येक भाषणातुन, लिखाणातुन स्पष्ट जाणवते आणि म्हणुनच त्यांची वैचारिक मुल्ये अधिक उंचीची वाटतात.

इतिहासाविषयी यशवंतराव त्यांच्या एका भाषणात म्हणाले होते “मी काही इतिहासाचा पंडित नाही, पण इतिहासाचा एक अभ्यासक जरुर आहे.” वर्तमानकाळ समजण्यासाठी इतिहासाचे सतत चिंतन करावे लागते. कारण वर्तमानकाळाशी झगडणाऱ्या माणसाला भुतकाळ समजण्याची जर अक्कल नसेल तर वर्तमानकाळाशी तो फारसा झगडु शकणार नाही आणि म्हणुन त्यासाठी इतिहासाचा थोडाफार अर्थ समजून घ्यावा लागतो.

इतिहास अभ्यासक व संशोधक वा.सी.बेंद्रे व यशवंतरावांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. तसेच नाते कवी यशवंत आणि यशवंतराव चव्हाण यांचे. या संदर्भात ते म्हणतात “विद्वानांना भेटावे, त्यांच्या विचारांना चालना द्यावी आणि त्यांचे बोलणे ऐकत बसावे असे मला नेहमी वाटते. त्यामुळे पुष्कळसे न वाचताच बहुश्रुत होण्याचे समाधान लाभते.” या व अशा जिव्हाळ्याच्या नात्यांमुळे त्यांनी श्री बेन्द्रेंकडुन मालोजीराजे आणि शहाजी महाराज हा ग्रंथ त्याचबरोबर संभाजी महाराजांवरील ग्रंथ आग्रहाने लिहुन घेण्यासाठी पाठपुरावा केल्याचे लक्षात येते.

बेंद्रे सर थकलेले वाटत असतांना त्यांना इतिहास लेखनासंदर्भात यशवंतराव आग्रह धरत होते. तेव्हा बेन्द्रेंनी मिळविलेले सर्व ऐतिहासिक ज्ञान, त्यांनी केलेली असंख्य टाचणे आणि नोंदी हे सर्व ग्रंथरुपाने प्रकाशित न झाल्यास त्यांच्यानंतर व्यर्थ जाणार आहेत, ते त्यांनी सर्वाना सांगितलं पाहिजे. आपल्याजवळ सांगण्यासारखे असेल ते सगळयांना शहाणे करावे या उक्तीप्रमाणे बेंद्रेसारख्या विद्वानाने आपल्या पाठीमागे राहील असे काहीतरी लिहावे असा यशवंतरावांचा आग्रह होता. आणि त्यांच्या आग्रहाखातर बेंद्रेनी ऐतिहासिक लिखाण केले. इतिहासातील वादांच्या संदार्भात ते म्हणाले होते, वाद झाले नाहीत तर महाराष्ट्रात जीवन ते काय राहणार ? तेव्हा वाद झाले पाहिजेत. याचाच अर्थ वादविवाद होऊन सत्य लोकांपर्यंत पोहोचावे असा अर्थ यशवंतरावांना अभिप्रेत असावा असे मला वाटते.

ज्या मुंबईची सत्ता टिकविण्यासाठी शिवकाळापासुन तर आजपर्यंत सत्ता संघर्ष बघायला मिळतो त्या मुंबई शहरामध्ये पश्चिम सागराच्या प्रवेशद्वारापाशी छत्रपती शिवरायांचे पहिले स्मारक पुतळ्याच्या रुपाने उभे करण्याचे श्रेयदेखील मा.यशवंतरावांनाच जाते तो सुवर्ण दिवस होता २६ जानेवारी १६६१. यशवंतरावांच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हणजे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती. महाराष्ट्र राज्यस्थापनेचा उत्सव २७ एप्रिल १९६० पासुन सुरु होत होता आणि या उत्सवाची सुरुवात यशवंतरावांनी किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवराय आणि मांसाहेब जिजाऊ यांच्या दर्शनाने केली यावेळी ते म्हणाले.. “लोकहो, आज मी माझे परमभाग्य समजतो की, महाराष्ट्राच्या परमेश्वराला प्रणाम करण्यासाठी येथे येण्याची संधी मला मिळाली. आजच्या सुवर्णदिनी आपणां सर्वांच्या तर्फे नव्या महाराष्ट्र राज्यास शिवप्रभुंचे आशिर्वाद मागण्यासाठी मी येथे आलो आहे. मी आज शिवनेरीवर बालशिवाजी आणि मातोश्री जिजाऊच्या प्रतिमेचे उद्घाटन केले आणि आता शिवछत्रपतींना मुजरा करून मी नव्या महाराष्ट्र राज्याची घोषणा करीत आहे. हा नवमहाराष्ट्र आतां निर्माण होत आहे. पुर्वी देवगिरीच्या यादवांच्या काळी जो मुलुख मराठी होता तो आता एकत्र येत आहे. हा मुलुख पुर्वी एकत्र होता, परंतु अधुनमधुन तो इतिहासात तुटला, सुटला होता. पण आता पुन्हा तो एकत्र येत असून पिढ्यानपिढ्या मनात बाळगलेली आपली आकांक्षा आज पुर्ण होत आहे. त्यांचे शिवनेरीवरील संपुुर्ण भाषण अंगावर रोमांच उभे करते. त्यांनी खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींचा आशिर्वाद घेवुन पुढील वाटचाल करुन शिवरायांचा वारसा पुढे नेण्याचे काम सार्वजनिक जीवनात केले.

यशवंतरावांचे नावकरी असलेल्या कवी यशवंत यांच्या छत्रपती शिवराय या महाकाव्याच्या पुस्तक प्रकाशन समारंभात भाषण करतांना यशवंतराव म्हणतात, “शिवचरीत्राने आम्हाला इतिहास दिला, या सह्याद्रीच्या डोंगर-खोर्यातुन आम्ही राहत होतो. शेती करीत होतो, तर कोणी भाऊबंदकीच्या भांडणामध्ये गुंतले होते. हे सगळे चाललेले होते. परंतु इतिहासामध्ये मराठ्यांचा म्हणून जो इतिहास गाजला, त्याची सुरुवात ज्या जीवनातुन लिहिला गेला ते अती विशाल असे शिल्प होते. त्या शिल्पामध्ये सर्व काही आहे. त्यामध्ये एक प्रकारचे उत्तुंग यश आहे, त्यामध्ये शौर्य आहे, त्यामध्ये त्वेष आहे, त्यामध्ये प्रेम आहे आणि कारुण्यही आहे. कवीच्या मनाला जे जे गुण वेडावून सोडतात ते ते सगळे गुण त्या जीवनामध्ये भरलेले आहेत.”

यशवंतरावांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांनी सार्वजनिक जीवनात छत्रपती शिवरायांना आपले आदर्श मानले. यशवंतरावांना त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक समस्यांना सामोर जावं लागल. संकटांशी सामना करावा लागला परंतु त्यांच्या हळुवार मनाने कधी तोल जाऊ दिला नाही. सभ्यता त्यांना कधी पारखी झाली नाही. सुसंस्कृतपणा कधीच ढळला नाही. छत्रपती शिवरायांसारख्या महापुरुषाचे कार्य हे समाजाच्या देशाच्या आणि भावी पिढीकरीता मार्गदर्शक असते ते जतन करण्याची व आदर्श समाजापुढे ठेवण्याची जबाबदारी समाजातील कार्यकर्त्या पुरुषांचीच असते. इतिहासातील हे मर्म यशवंतरावांनी जाणले आणि त्यांनी शिवछत्रपतींचा वारसा पुढे नेण्याचे काम आयुष्यभर केले त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांच्या नजरेतुन इतिहासाच्या मर्मावर अल्पसा प्रकाश टाकुन त्यांना अभिवादन करण्याचा हा छोटासा प्रयत्न.

लेखन: शिवश्री कैलास वडघुले, पुणे. मो.९२७०४९६७७२

शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top