का काढण्यात आला होता गडकरी पुतळा ?

पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा हटविल्याच्या घटनेला ३ जानेवारी २०१८ रोजी एक वर्ष पुर्ण होत आहे. हा पुतळा हटविल्याच्या घटनेनंतर समाजातुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासातील बदनामीला विरोध करणारा एक वर्ग तर गडकरींच्या लिखाणाचे समर्थन करणारा दुसरा वर्ग अशा दोन बाजु दिसुन आल्या.

पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर जाणीवपुर्वक करण्यात आलेला एक राजकीय स्टंट अशीही याची खिल्ली उडविण्यात आली. गडकरी पुतळ्याच्या समर्थनासाठी नाटककार मंडळींनी निषेधाची नाटके केली. दुसऱ्या बाजुला महाराष्ट्रभरातील तमाम इतिहासप्रेमी वर्ग या घटनेचे समर्थन करत होता. तटस्थ राहुन अगोदर घटनेचा निषेध करणाऱ्यांनी जेव्हा गडकरींचे राजसंन्यास वाचले तेव्हा त्यांचेही मतपरिवर्तन झाले आणि त्यांनीही घटनेचे समर्थन केले. अशी ही घटना घडण्यामागचे कारण काय ? का काढला गडकरींचा पुतळा ते जाणुन घेऊया…

१) गडकरी हे मराठी भाषाप्रभु वगैरे काही असतील, तो भाग वेगळा. परंतु गडकरींनी स्वतःच्या लेखणीचा, कौशल्याचा आणि बुद्धिमत्तेचा वापर करुन छत्रपती शिवराय, छत्रपती शंभुराजे तसेच संपुर्ण शिवकुटुंबाची आणि शिवरायांशी निगडीत गोष्टींची राजसंन्यास नावाचे काल्पनिक नाटक रचुन बदनामी केली असा त्यांच्यावर सर्वात मोठा आक्षेप आहे.

२) गडकरी हे इतिहास संशोधक नव्हते, इतिहासकारही नव्हते. ते एक नाटककार होते. नाटके म्हणजे इतिहास नसतो. परंतु तरीही गडकरींच्या नाटकाला आणि त्यातील काल्पनिक मांडणीला प्रसिद्धी मिळवुन देण्याचे सातत्याने प्रयत्न होत असतात आणि त्यातुन शंभुराजे बदनाम होत असतात अशी इतिहासप्रेमींची भावना आहे.

३) साहित्यात गडकरींनी केलेली बदनामी पुरेशी झाली नाही म्हणुन की काय, गडकरींच्या ४३ व्या पुण्यतिथीच्या दिवशी (२३ जानेवारी १९६२ रोजी) प्रल्हाद केशव अत्रे यांच्या हस्ते आणि पुणे मनपाचे नगरशासक सदाशिव बाळकृष्ण कुलकर्णी व महापौर शिवाजीराव अमृतराव ढेरे यांच्या उपस्थितीत गडकरींचा पुतळा छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव असणाऱ्या उद्यानात जाणीवपुर्वक बसविण्यात आला. त्यावर राजसंन्यास मधील ओळी कोरण्यात आल्या. म्हणुन ज्या छत्रपती शंभुराजेंची बदनामी गडकरींच्या साहित्यात आढळते, त्याच गडकरींचा पुतळा शंभुराजांच्या नावाने असणाऱ्या “छत्रपती संभाजी उद्यान” मध्ये उभा करणे हा आपल्याला खिजविण्याचा प्रकार होता अशी हळुहळु शंभुप्रेमींची भावना प्रबळ होत गेली.

४) छत्रपती संभाजी महाराज उद्यानात अद्याप शंभुराजेंचा पुतळा किंवा स्मारक नाही, मात्र शंभुराजांविषयी बदनामीकारक लिखाण करणाऱ्या एका नाटककारांचा पुतळा होतो, त्याचे सुभोभीकरण केले जाते आणि त्यांच्या लेखनाला खरा इतिहास म्हणुन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो, हे कुठल्याही सर्वसामान्य इतिहासप्रेमींना आवडणारे नव्हते.

५) पुतळा हटविणाऱ्यांच्या दृष्टीने गडकरींनी त्यांच्या राजसंन्यास मध्ये नेमके असे काय केले होते ?

● गडकरींनी “राजसंन्यास” नावाच्या काल्पनिक नाटकात संपुर्ण शिवकुटुंबाची अत्यंत विकृतपणे बदनामी केली होती.

● “जिवाजी महाले आणि तुकोबांचे देहु” या शिवरायांच्या इतिहासातील दोन अत्यंत जिव्हाळ्याच्या गोष्टी असताना, गडकरींनी आपल्या राजसंन्यास नाटकात याच दोन नावाची (जीवाजीपंत आणि देहु) ही काल्पनिक पात्रे वापरुन त्यांच्या तोंडी शिवराय व शंभुराजेंबद्दल बदनामीकारक वाक्ये घातली आहेत.

● छत्रपती शंभुराजांच्या बदनामीला कारण असणारे “तुळसा” नावाचे काल्पनिक स्त्री पात्र राजसंन्यास मधुन प्रसिद्ध केले आणि रंगवले गेले. गडकरींनी इतिहासात कधीही न झालेल्या काल्पनिक तुळसाचे नाव शंभुराजांसोबत जोडुन एका चारित्र्यवान राजाला स्त्रीलंपट म्हणुन बदनाम केले. 

मराठा आणि धनगर या दोन समाजात वादाची बीजे पेरणाऱ्या आणि शिवचरित्राशी कसलाही संबंध नसणाऱ्या काल्पनिक कुत्र्याचे नामकरण “वाघ्या” असे करुन तो शिवचरित्रात घुसविण्याचे काम गडकरींनी केले.

● महाराष्ट्रातील अनेक इतिहासकारांच्या मते रायगडवर छत्रपती शिवरायांच्या पत्नीची समाधी आहे. मात्र त्याच समाधीवर काल्पनिक वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्यावर गडकरींच्या राजसंन्यासमधील लिखाण कोरुन राजसंन्यास त्या काल्पनिक नाटकाला सत्य इतिहास म्हणुन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न शंभुप्रेमींना मान्य नाही.

● गडकरींनी राजसंन्यास नाटकातुन निष्कलंक शंभुराजेंना दारुडे, रंगेल, रगेल दाखविले आहे. शंभुराजांची आणि तथाकथित तुळसाची काल्पनिक प्रेमकहाणी रंगवुन नाटकात शंभुराजांच्या तोंडी अतिशय अश्लील, रोमँटिक वाक्य वापरण्यात आली आहेत. यामुळे शंभुराजांची बदनामीकारक प्रतिमा समाजात निर्माण झाली.

६) गेली १०-१२ वर्षे शंभुप्रेमी लोक गडकरींचा पुतळा छत्रपती संभाजी उद्यानातुन हलवुन इतरत्र कुठेही बसवावा अशी मागणी करत होते. पत्रव्यवहार करत होते. मात्र तो पुतळा न हटवता त्याच्या सुशोभीकरणाचे काम पालिका प्रशासनाने सुरु केले. हा समस्त शंभुप्रेमींना खिजविण्याचा प्रकार होता.

७) गेली १० वर्ष उघड्या डोळ्यासमोर आपल्या राजांची बदनामी लोक सहन करत होते. रीतसर लढा देऊनही प्रशासनाने काहीच हालचाल केली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव लोकांना पुतळा हटविण्याचे पाऊल उचलावे लागले.

८) वैर पुतळ्याशी नाही. मात्र ज्या गडकरींच्या माध्यमातुन शंभुराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण झाले, त्याच गडकरींना आज प्रतिष्ठा मिळवुन देण्याचे प्रयत्न होतात. आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असणाऱ्या शंभुचरित्राला न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न होत नाही. इतिहासकर्त्यांची बदनामी होते, मात्र इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्यांचा गौरव होतो, हा विरोधाभास समाजातील जागृत सळसळत्या रक्ताच्या तरुणांना अशी घटना करण्यास भाग पाडतो.

राम गणेश गडकरींना त्याकाळात उपलब्ध संदर्भाच्या आधारे त्यांनी राजसंन्यास नाटक लिहले असा युक्तिवाद गडकरी समर्थक करतात. मात्र गडकरींच्या इच्छेप्रमाणे त्यांचे स्मारक फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर करण्याऐवजी ते छत्रपती संभाजी महाराज उद्यानातच व्हावे असा आग्रह धरतात. म्हणजे हे वागणं सुद्धा संशयास्पद वाटते. गडकरींचे स्मारक होणे जास्त महत्वाचे आहे की ते जाणीवपुर्वक छत्रपती संभाजी महाराज उद्यानातच होणे जास्त महत्त्वपुर्ण आहे, यावरुन गडकरी समर्थकांचा रोख छत्रपती संभाजी महाराजांविषयीच्या बदनामीकारक मांडणीला प्रस्थापित करण्याकडेच जास्त असल्याचा दिसुन येतो. हे गडकरींचेच दुर्दैव म्हणावे लागेल !

वाचा छत्रपती संभाजी महाराजांवरील सर्व आरोपांची सप्रमाण चिरफाड

© लोकराज्य टीम.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top