तो ट्रेकर नसतो…

तो ट्रेकर नसतो…

‘ट्रेंड’ सुरु होणं ही या नश्वर आयुष्यातील एक सामान्य गोष्ट आहे. आपल्या जीवनात काही ना काही ‘ट्रेंड’ सुरुच असतात. हल्ली अॅडव्हेंचर क्षेत्रात एक नवीन ट्रेंड सुरु झालाय. नव्याने निर्माण होणाऱ्या ट्रेकर्सची संख्या प्रचंड प्रमाणत वाढत आहे. खरंतर ही चांगली गोष्ट आहे. आम्हा जुन्या ट्रेकर्सची मनातून इच्छा असते की अधिकाधिक लोकांनी निसर्गाकडे वळावे आणि त्याचा आनंद घ्यावा आणि संवर्धनात हातभार लावावा.

पण ह्या वाढत्या संख्येमध्ये थोडी गडबड आहे. यातील अनेक लोकांना ‘ट्रेकिंग’चा खरा अर्थच कळला नाहीय. किंवा त्यांना तो कळून घ्यायची इच्छाच नाहीय. ‘ट्रेकिंग म्हणजे फक्त मौज-मजा’ असा चुकीचा अर्थ या लोकांनी घेतला आहे. तर ट्रेकिंग ही एक खूप मोठी संज्ञा आहे. आपण अनेक ठिकाणी ‘ट्रेकर कसा असतो?’ हे वाचलं असेल पण आज या लेखाच्या माध्यमातून मी आपल्याला ‘ट्रेकर कसा नसतो..’ हे मांडण्याच्या प्रयत्न मी करतोय.

अनुभवी ट्रेकर्सचे मार्गदर्शन न घेता किंवा कोणतेही प्लानिंग न करता सरसकट एखादी अॅडव्हेंचरस जागा भटकण्यासाठी निघतो तो ट्रेकर नसतो. स्वतःच्या कुवतीचा विचार न करता, सगळेच जातात किंवा ‘अमुक कोणी जाऊन आला तर आपण इझिली करू शकतो असा विचार करून जो भटकण्याचे ठिकाण ठरवतो तो ट्रेकर नसतो.

सोबत येणाऱ्यांमध्ये त्या विशिष्ट ठिकाणी चढणे किती जणांना जमेल याची खात्री करून घेत नाही तो ट्रेकर नसतो. निघण्यापूर्वी बॅगमध्ये पाणी, हेडलँप / टॉर्च, पर्सनल फर्स्ट एड कीट इत्यादी महत्वाच्या गोष्टी न भरता कॅमेरा, सेल्फी स्टिक, गॉगल, फॅशन जॅकेट अशा गोष्टी जो भरतो तो ट्रेकर नसतो. दहा – पंधरा छोटे-मोठे ट्रेक झाल्यावर स्वतः लीडर होऊन जो इतरांना अनेकांच्या संख्येने अनाठायी ठिकाणी ट्रेकिंगला घेऊन जातो तो ट्रेकर नसतो.

स्वतः १५-२० जणांच्या ग्रुपपेक्षा जास्त सहभागी असलेला ग्रुप घेऊन जातो तो किंवा असे मोठ-मोठे ग्रुप घेऊन जाणाऱ्या कमर्शिअल संस्थांसोबत जो हिंडतो तो ट्रेकर नसतो. ऑफिस शूज किंवा ट्रॅक्शन नसलेले स्पोर्ट्स शूज / सँडल, जीन्स, ढगळ कपडे घालून डोंगर भटकंतीला जातो तो ट्रेकर नसतो. स्वतः पाण्याची बाटली, खाऊचे पदार्थ सोबत न ठेवता इतरांनी आणलेल्या गोष्टींवर वेळ मारून नेण्याचा विचार करतो तो ट्रेकर नसतो.

भटकंतीदरम्यान निसर्गातील आवाजाचा आस्वाद न घेता कानात हेडफोन लाऊन किंवा लाऊडस्पीकर वर गाणी लाऊन हिंडतो तो ट्रेकर नसतो. भटकताना इतर सहभागी मित्रांशी मोठ-मोठ्या आवाजात गप्पा किंवा विनोद करत इतर लोकांना त्रास होईल असे वागत जो फिरतो तो ट्रेकर नसतो. भटकंतीपूर्वी किंवा भटकंतीदरम्यान जो धूम्रपान किंवा मद्यपान करतो तो तर मुळीच ट्रेकर नसतो. धबधब्यांना किंवा डोंगरमाथ्यांना केवळ मौज-मजा किंवा व्यसनाच्या जागा म्हणून पाहतो तो ट्रेकर नसतो.

डोंगरावर भटकताना झाडांच्या फांद्या तोडणे, वन्य प्राण्यांना डिवचणे, जंगलातून जाताना प्राण्यांचे किंवा इतर आवाज काढून जंगलातील शांततेचा भंग करण्याचं काम करतो, वन्यप्राण्यांना खाऊ टाकून त्यांच्या सवयी बदलण्याचे काम करतो तो ट्रेकर नसतो. अशा ठिकाणी कागद – प्लास्टिक इत्यादी कचरा करतो तो तर ट्रेकर नसतो. डोंगरावर चढताना आपण जग जिंकतो आहोत अश्या अविर्भावात जो चढतो किंवा डोंगराला आदर करत नाही तो ट्रेकर नसतो. डोंगरावरील पाण्याच्या स्त्रोतांचा किंवा तेथील निसर्गाचा मान न राखता जो तिथे प्रदूषण करतो तो ट्रेकर नसतो.

डोंगर किंवा किल्ल्यावरील पाण्यामध्ये, ते पिण्याचे आहे की नाही हे न पडताळता, जो पोहायला उतरतो तो ट्रेकर नसतो. डोंगरावर किंवा पाण्याच्या स्त्रोतांमध्ये जो घाण-कचरा करतो तो ट्रेकर नसतो. किल्ले किंवा तत्सम पवित्र स्थळांवर किंवा तेथील झाडांवर खडू – विटकर – रंगाने नावे कोरणे, अवशेषांमध्ये प्रातःविधी करणे, दारूच्या किंवा इतर बाटल्या किंवा कचरा करणे इत्यादीप्रकारे या स्थळांची नासधूस होईल असे काम करतो तो ट्रेकर नसतो.

ऐतिहासिक महापुरुषांविषयी वाईट-साईट विनोद करतो तो ट्रेकर नसतो. पायथ्याच्या किंवा माथ्यावरच्या गावातील लोकांचा मान राखत नाही किंवा परिसरात केर-कचरा करतो तो ट्रेकर नसतो. डोंगरावर किंवा धबधब्यांमध्ये, धोक्याच्या ठिकाणी, सेल्फी फोटो काढतो तो ट्रेकर नसतो. डोंगरावरील मुक्कामाच्या ठिकाणी केवळ स्वतःपुरता किंवा स्वतःच्या ग्रुपपुरता विचार करून जागा व्यापतो तो ट्रेकर नसतो.

इतर अनुभवी ट्रेकर्सनी किंवा त्यांच्या संघटनेने एखादी सूचना करूनही ती सूचना अमलात न आणता स्वतःचे तेच खरे करतो तो ट्रेकर नसतो. आपण करू शकतो म्हणून आपल्या ग्रुपमधील इतर सहभागींना एखादी धोकादायक गोष्ट करायला भाग पाडतो तो तो ट्रेकर नसतो. शेवटी अगदी महत्वाचे म्हणजे सदसदविवेकबुद्धी ना वापरता गिर्यारोहण, पर्यटन आणि पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा कृती करतो तो ट्रेकर नसतो.

हा लेख लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे हल्ली न्यूज किंवा सोशल मेडीयावरून डोंगरभटकंती करणाऱ्या लोकांचा उल्लेख सरसकट ‘ट्रेकर’ असा केला जातो त्यामुळे आमची (हो आमची) ट्रेकर्सची प्रतिमा (म्हणजे तुमच्या मराठीमध्ये ‘इमेज’) खराब होत आहे. त्यामुळे यापुढे असा उल्लेख सरसकट करताना या माध्यमांनी वरील मुद्दे लक्ष्यात घ्यावेत ही कळकळीची विनंती. कळावे. लोभ असावा.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top