सुरतची लुट की सुरतवर छापा ?

“शिवरायांनी सुरतेची लुट करुन औरंगजेबाला बेसुरत केले” असे ज्या घटनेचे वर्णन केले जाते ती घटना ६ जानेवारी १६६४ ची. मराठ्यांच्या इतिहासातील एक गौरवास्पद घटना. या घटनेनंतर शिवरायांच्या शत्रुंनी त्यांचा इतका धसका घेतला की त्याचे वर्णन इंग्रजी पत्रांमध्ये “Surat Trembles At The Name Of Sevagee” (अर्थ-शिवरायांच्या नावानेच सुरत थरथर कापते.) अशा पध्दतीने केल्याचे पहायला मिळते. शिवरायांना जगभर पोहचवणाऱ्या अनेक प्रसंगांपैकी हा एक प्रसंग. शिवरायांची राजनिती, युध्दनिती, पराक्रमाचा एक उत्कृष्ट नमुना…

वाचा शिवरायांच्या आयुष्यातील ८ या अंकाचा विलक्षण योगायोग

पार्श्वभुमी –
शाहीस्तेखान पुण्यात लालमहालामध्ये आपल्या विशाल सैन्याबरोबर मुक्कामाला असताना त्याने इथल्या गोरगरीब रयतेला प्रचंड त्रास दिला होता. त्याने प्रजेकडुन अमाप लुट केली होती. शाहिस्तेखानाला धडा शिकवण्यासाठी शिवरायांनी स्वतः ३ एप्रिल १६६३ रोजी लालमहालात घुसुन शाहीस्तेखानावर हल्ला केला आणि त्याला आपली चुणुक दाखवली. शिवरायांच्या आक्रमकतेमुळे भयभीत झालेला शाहीस्तेखान तीन दिवसात आपल्या फौजेसह पुणे सोडुन पाय लावून पळाला. जाताना त्याने केलेली लुट सोबत घेउन गेला. शाहीस्तेखानाने स्वराज्याची अपरिमीत हानी केली.

 

स्वराज्याचा डोलारा पुन्हा उभा राहणे आवश्यक होते. मार्ग सापडत नव्हता. शिवरायांनी बहीर्जी नाईकांवर आर्थिक स्त्रोत शोधण्याची जबाबदारी सोपवली. बहीर्जी नाईकांनी आपली जबाबदारी पार पाडली. “राजे, सुरत मारलियाने अगणित द्रव्य गवसेल…” ही गोष्ट त्यांनी महाराजांना सांगितली. महाराजांनाही पटले.

सुरत ही औरंगजेबाच्या साम्राज्यातील प्रमुख बाजारपेठ. थोडक्यात सांगायचे तर औरंगजेबाची तिजोरीच ! महाराजांनी आपला मोर्चा सुरतेकडे वळवला. बहीर्जी नाईकांनी एखाद्या Sattelite Cammera प्रमाणे सुरतेच्या गल्लीबोळापासुन सर्व माहीती गोळा करुन महाराजांना आणुन दिली. या माहितीवरुन पुढील योजना आखल्या गेल्या. ठरल्याप्रमाणे सर्व योजना पार पडल्या. महाराजांना या मोहीमेतुन भरपुर खजीना मिळाला. या घटनेने मोगलशाहीचे नाक कापले गेले. शिवराय जगप्रसिध्द झाले. अशी या घटनेची पार्श्वभुमी आहे.

मित्रांनो, आपण शिवरायांवर प्रेम करणारे मावळे आहोत. शिवरायांचा इतिहास वाचताना, ऐकताना आपण कधीकधी खुप भावनिक होतो. या भावनिकपणात नकळत काही चुका आपल्याकडुन होत असतात. वर सांगितल्याप्रमाणे सुरत ही औरंगजेबाची तिजोरीच होती. परंतु या सुरतेत असणारे सावकार हे खुप मुजोर आणि माजगे होते. त्या सावकारांनी गोरगरीब जनतेची संपत्ती लुबाडली होती. रयतेच्या कष्टावर हे सावकार आपल्या श्रीमंतीचे मजले चढवीत होते. शिवरायांना या गोष्टीची पुर्ण माहिती होती. त्यांना धडा शिकवायचा ही शिवरायांची खुप दिवसांची इच्छा होती. पण योग्य संधी मिळत नव्हती. ती संधी ६ जानेवारी १६६४ ला मिळाली. त्या संधीचा त्यांनी योग्य उपयोग करुन घेतला.

खरं सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांनी सुरत लुटली या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. कारण शिवरायांनी सुरतेतील गोरगरीब जनतेला, धर्मस्थळांना अजिबात त्रास दिला नाही. उलट जे मुजोर, मस्तवाल सावकार होते, ज्यांनी गोरगरीबांवर अन्याय करुन संपत्ती लुबाडली होती ती संपत्ती त्या माजग्या सावकारांकडुन वसुल केली. तीसुध्दा त्या सावकारांना अगोदर इशारावजा पत्रातुन कळवुन. महाराजांनी त्या संपत्तीचा उपयोग स्वराज्यासाठी केला. सुरतेच्या मोहिमेत मिळालेली सगळी संपत्ती त्यांनी सिंधुदुर्गच्या संपुर्ण बांधकामासाठी वापरली.

वाचा शिवरायांच्या कुटुंबातील दुर्लक्षित व्यक्तिरेखा

शिवरायांच्या सुरत मोहिमेला ज्यांनी कोणी हा “सुरतेची लुट” हा शब्दप्रयोग रुढ केला त्यांनी खुप मोठी चुक केली आहे. लेखणीबहाद्दरांनी कळत नकळत या घटनेचे वर्णन “सुरतेची लुट” असे करुन एकप्रकारे शिवरायांना “लुटारु” ठरवले आहे. मग त्याच पावलावर पाऊल ठेऊन बाकीच्यांनी पण तोच इतिहास रुढ केला. प्रधानमंत्री नेहरुंनीही त्यांच्या पुस्तकात शिवरायांना लुटारुच ठरवले. गुजरातच्या पाठ्यपुस्तकांतुन शिवरायांचे वर्णन लुटारु असेच झाले. असे अनेक दाखले देता येतील.

मुळात सुरतेची लुट हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. खरंतर शिवरायांनी सुरतेची लुट केली नसुन सुरतेवर छापा मारुन तेथील मुजोर सावकारांनी लुबाडलेली गोरगरीब जनतेची संपत्ती त्यांच्याकडुन वसुल केली आणि स्वराज्यकार्यासाठी वापरली. एका चांगल्या कार्यासाठी चांगल्या भावनेतुन केलेल्या कार्यास लुट म्हणता येईल काय ? माझे म्हणणे एवढेच आहे की, सुरतेची लुट याऐवजी सुरतेवर छापा, स्वारी, मोहीम असे शब्दप्रयोग वापरणे योग्य होईल. इतिहास अभ्यासकांनी परिक्षण करुन आपले मत कळवावे व माहीतीत भर घालावी.

शिवजयंतीचा वाद निर्माण करणाऱ्यांना महाराजांचे पत्र…

© लोकराज्य टीम.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top