श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा भुमिका

श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा विशेषांक संपादकीय लेख – १६ जानेवारी २०१७
इतिहास हा भविष्याचा आरसा असतो. या इतिहासाच्या आरशाकडे तुम्ही ज्या दृष्टीने पाहता त्यानुसारच तुमची प्रतिमा मिळत असते. इतिहासाकडे पाहण्याची दृष्टीच भविष्यातील प्रतिमा निश्चित करणारा मुख्य घटक आहे. इतिहास योग्य पद्धतीने समजुन घेतला तरच भविष्यात काय करावे लागणार आहे याचे यशस्वी नियोजन करता येते. इतिहासाकडे पाहण्याच्या आपल्या या दृष्टीचा आपल्यालाच पडताळा होण्यासाठी इतिहासाच्या पुनर्जागराचा प्रपंच करावा लागतो. त्याचे माध्यम कोणतेही असो, हा पुनर्जागर करत असताना मात्र इतिहासाची जाण, आकलन आणि उपयोजन या तीन गोष्टींवर अधिक भर दिला जावा हा आग्रह आहे. कारण इतिहासातुन मिळणाऱ्या प्रेरणा या वर्तमानातील परिस्थितीतुन मार्ग काढण्यासाठी आणि भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरतात. त्यासाठी इतिहासाची जाण असण्याबरोबरच त्याचे योग्य आकलन होऊन आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचे सुसंगत पद्धतीने उपयोजन करता यायला हवे. तरच खऱ्या अर्थाने इतिहासाचा पुनर्जागर करण्याचा उद्देश साध्य झाला असे म्हणता येईल. नाहीतर त्या पुनर्जागराला केवळ इतिहासाचे सोहळे एवढेच उत्सवी स्वरुप प्राप्त होऊन जाईल आणि हे मर्यादित स्वरुप इतिहास घडवणाऱ्या समाजाला कधीही परवडणारे नाही.

आमच्या इतिहासात आम्ही डोकावुन पाहिले तर आम्हाला दुसऱ्या कुठुनही प्रेरणा उसन्या घ्याव्या लागणार नाहीत, इतका प्रचंड प्रेरणादायक इतिहास आमच्या इतिहासपुरुषांनी निर्माण केला आहे. आता त्याचा फक्त पुनर्जागर करण्याचीच गरज आहे. छत्रपती संभाजी महाराजांसारखे युवकांना प्रचंड प्रेरणादायक ठरतील असे इतिहासपुरुष आमच्याकडे होऊन गेले. आपल्या ३२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे कार्य उभे केले ते सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनातील सर्व क्षेत्रांना स्पर्श करुन जाणारे आहे. त्याबाबतीत ते मार्गदर्शक ठरु शकते. त्यांच्या जगण्यात आणि मरण्यातही जो पराक्रमाचा इतिहास आहे त्यातुन लोकांना नव्या प्रेरणा भेटु शकतात. ही गरज ओळखुन श्रीशंभुराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील तमाम शंभुप्रेमींच्या सहकार्याने इतिहासाच्या पुनर्जागराचा हा प्रपंच सुरु झाला. यंदा या सोहळ्याचे चौथे वर्ष आहे. मागच्या तीन वर्षात वेगवेगळ्या माध्यमांतुन हा सोहळा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील बहुतांश लोकांपर्यंत घेऊन जाणे शक्य झाले आहे. तोच प्रयत्न यावेळीही अधिक चांगल्या, अधिक व्यापक पद्धतीने करण्याच्या दृष्टीकोनातुन या विशेषांकाची निर्मिती झाली आहे. मागच्या वर्षीच्या विशेषांकात या सोहळ्याविषयी, कार्यक्रमाच्या ठिकाणाविषयी तसेच इतर गोष्टींविषयी लोकांच्या मनात असणाऱ्या सर्व शंकांची उत्तरे देण्यात आली होती. यंदा नव्याने काही विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच वर्षभरात शंभुचरित्रावर काम करणाऱ्या लेखक, कवी, संस्था, चित्रकार यांच्याकडुन त्यांचे साहित्य घेण्यात आले आहे. हा कार्यक्रम लोकांपर्यंत घेऊन जात असतानाच विशेषांकाच्या माध्यमातुन शंभुराजांच्या चरित्रावरील प्रेरणादायी ठरतील असे वस्तुनिष्ठ मांडणीतुन केलेले लिखाण लोकांपर्यंत घेऊन जाता येते ही यामागची भुमिका आहे. त्यासाठी साहित्य उपलब्ध करुन देणाऱ्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.

श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा : ऐतिहासिक भुमिका

छत्रपती शिवरायांच्या माध्यमातुन निर्माण झालेल्या छत्रपती पदाने खऱ्या अर्थाने इथल्या रयतेला स्थैर्य दिले. आपले राज्य, आपली व्यवस्था ज्यामध्ये एका अभिषिक्त राजाच्या छत्रछायेखाली आपल्याला सर्व प्रकारच्या न्याय, सुरक्षितता आणि कल्याणाची हमी मिळु शकेल हा विश्वास इथल्या रयतेच्या मनात छत्रपती पदामुळे निर्माण झाला. ते केवळ पद राहिले नाही, तर लोकांच्या जगण्याचा आधार बनले. जुलमी व्यवस्था संपुन लोककल्याणकारी व्यवस्था अंमलात आल्याचे ते प्रतीक होते. थोरल्या महाराजांच्या अकाली जाण्याने लोकांचा आधार हरवला. परत एकदा जुलमी व्यवस्थेचे सावट येऊन आपण पारतंत्र्यात जातो की काय अशी भीती रयतेच्या मनात निर्माण झाली. मात्र शंभुराजांनी १६ जानेवारी १६८१ या दिवशी आपला राज्याभिषेक करुन घेतला. खचलेल्या रयतेला आधार दिला. थोरल्या महाराजांच्या काळातील व्यवस्था पुढेही कायम राहील याची हमी दिली. खऱ्या अर्थाने लोकांना परत एकदा उभे केले. त्यांच्यात इतका स्वाभिमान भरला की शंभुराजांच्या जाण्यानंतरही इथली रयत त्या स्वाभिमानावर अविरत झुंजत राहिली. औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशहाला त्यांनी इथल्याच मातीत संपवले. छोट्याशा जहागिरीतुन थोरल्या महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा विस्तार करण्याचे, त्याला बळकट करण्याचे आणि ते अधिक लोकाभिमुख करण्याचे उत्तरकार्य शंभुराजांनी निष्ठेने पार पाडले. ही प्रेरणा प्रचंड आहे. ती अधोरेखित करण्यासाठी आणि वर्तमान समाजात ती घेऊन जाण्यासाठी श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा : सामाजिक भुमिका

छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेतल्यावर अंगात प्रचंड बळ येते असे अनेकजण सांगत असतात, मात्र ज्यावेळी महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांच्या एकुण व्यक्तिमत्वाच्या विसंगत गोष्टी घुसडुन महाराजांची बदनामी होत असते तेव्हा त्याला प्रतिकार करण्यासाठी आवश्यक असणारे हे बळ अचानक कुठे निघुन जाते हा प्रश्न कधीतरी आम्हाला उपस्थित करावा लागणार आहे. पुर्वी हा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचा आवाज कधी कुणी लक्षात घेतला नसेल, मात्र आता काय अडचण नाही. एकतर ज्यांनी आधी शंभुराजांचे चरित्र बदनाम करुन समाजापर्यंत आणले आणि नंतर जेव्हा हे चरित्र अस्सल सोन्याप्रमाणे तावुन सुलाखुन सर्व दिव्य पार करुन प्रभावीपणे लोकांच्या समोर आले तेव्हा मात्र आम्ही त्यातले नव्हेच हा गाजावाजा करत त्यातल्या कित्येक बोरुबहाद्दरांनी कोलांटउड्या मारल्याचे इतिहासाचा अभ्यास करताना आपण पाहिले आहे. आता त्या गोष्टी उगाळत बसण्याची गरज नाही. परंतु इतिहासाचे संदर्भ घेऊन जेव्हा नवीन आव्हाने समोर उभी राहतात तेव्हा या गोष्टींचा कुठेतरी विचार करावा लागतो. हे जर नाही केले तर साहित्यातुन शंभुराजांबद्दल बदनामीकारक लिहणाऱ्या गडकरींचा पुतळा संभाजी महाराजांच्या नावानेच असणाऱ्या उद्यानात येणाऱ्या जाणाऱ्यांना राजसन्यासचे धडे पुढेही शिकवतच राहणार आहे. शंभुराजांचे रक्त सांडलेल्या तुळापुर भुमीत पुण्याच्या पेठांमधुन गोळा केलेला कचरा सांडण्याचे प्रस्ताव येतच राहणार आहेत. लष्कराच्या ताब्यात असणारे शंभुजन्मस्थान पुरंदर आपल्या शेवटच्या घटका मोजत जीर्णावस्थेत ढासळत ढासळत संपुन जाणार आहे. एवढेच कशाला आमच्यावर कुठलातरी शिक्का बसेल म्हणुन या सगळ्या गोष्टींना प्रतिकार करायला घाबरणाऱ्यांच्या गर्दीत संभाजी महाराजांचा पुतळा डेक्कनला एकाकीपणे गरवारेच्या वर्तुळाखाली उभा राहुन रस्त्याने डोळेझाक करुन पुढे जाणाऱ्या लोकांचे चेहरे हताशपणे बघतच राहणार आहे. हे चित्र विदारक असले तरी संभाव्य आहे. त्यासाठी आपल्या इतिहासपुरुषांच्या इतिहासलेखन, पुनर्लेखन आणि त्याचे प्रदर्शन या गोष्टींबाबत आपल्याला सावध रहावे लागणार आहे. पायात पाय घालण्याऐवजी एकत्रितपणे हातात हात घालुन काम करावे लागणार आहे. आपल्या या नैतिक कर्तव्यापासुन आपल्याला दुर जाता येणार नाही. 

शौर्यपीठ तुळापुर : प्रेरणाकेंद्राची नव्याने ओळख

छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचा जागर करत असताना त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या ठिकाणांपैकी तुळापुर हे ठिकाण त्यामानाने समाजात खुप उपेक्षित राहिले आहे याचा प्रत्यय वारंवार येतो. लोकांना तुळापुर आणि तुळजापुर यातील फरक समजण्यात किती वेळ लागेल ते माहित नाही, परंतु हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पुणे, पिंपरी-चिंचवड, देहु-आळंदी, चाकण-शिक्रापुर सारख्या बहुचर्चित ठिकाणांच्या मध्यवर्ती असणारे तुळापुर हे ठिकाण अद्याप लोकांना माहीतच नसावे यासारखी इतिहासाची उपेक्षा कोणती असु शकते. या उपेक्षेमुळेच मध्यंतरी या ठिकाणी अनेक गैरप्रकार वाढले होते. तुळापुर आणि पिंडदान, तुळापुर आणि प्रेमवीरांसाठी एकांत, तुळापुर आणि त्रिवेणी संगम एवढाच संबंध लोकांना माहीत होता. तुळापुरच्या जागरुक ग्रामस्थांनी आपल्या परीने या ठिकाणाची ऐतिहासिक ओळख जपण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. त्याठिकाणी गेल्यानंतर जेव्हा या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या त्याच दिवशी आम्ही या ऐतिहासिक ठिकाणाची ओळख छत्रपती संभाजी महाराजांच्या संबंधाने शौर्यपीठ तुळापुर अशी व्हावी हा निश्चय करुन श्रीशंभुराज्याभिषेक सोहळ्याचे पाऊल उचलले. आज ते उचललेले पाऊल योग्य दिशेने जात असल्याबद्दल समाधान वाटते.

शिवपुत्र शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्ट

शौर्यपीठ तुळापुर येथे काम उभे करण्यासाठी छोटीशी का असेना एखादी संस्था उभी करावी या विचाराने शिवपुत्र शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्ट नावाने २०१५ मध्ये संस्था सुरु केली. यावर्षी तिला शासनमान्य नोंदणी क्रमांक मिळेल. परंतु याची वाट न बघता संस्थेच्या नावे वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये शंभुजयंतीनिमित्त वृक्षारोपण, शंभुराजे स्मृतिदिनानिमित्त रक्तदान, मरणोत्तर अवयवदान शिबीर, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, स्मारक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, स्वच्छता मोहिमा असे उपक्रम घेण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या नियोजित कचरा डेपोला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. प्रत्येक रविवारी फोनद्वारे संपर्क करुन बाहेरगावाहुन येणाऱ्या शंभुप्रेमींना स्थळाची इत्यंभुत माहिती देण्यासाठी ट्रस्टच्या सदस्यांनी गाईड म्हणुन विनामानधन काम केले. ट्रस्टच्या वतीने शंभुराजांच्या इतिहासाचा जागर करणारे नवीन वक्ते उभे केले. शाहीर उभे केले. शंभुराजांच्या सत्य चरित्रावर आधारित पुस्तक लिहणारे लेखक तयार केले. दरवर्षी श्रीशंभुराज्याभिषेक कार्यक्रमात ज्या नवोदित वक्त्यांना, कलाकारांना आपले कलागुण सादर करण्याची संधी उपलब्ध करुन दिली, ते लोक आज महाराष्ट्रभर आपल्या व्याख्यान, शाहिरी माध्यमातुन शंभुप्रचारक म्हणुन काम करत आहेत. काम छोटे असो वा मोठे त्याची कुणीतरी सुरुवात करणे गरजेचे असते. ती गरज ओळखुन भविष्यात तिची पुर्तता करण्यासाठी पावले उचलणे एवढ्याच अट्टाहासापायी सुरु झालेला हा प्रपंच दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावा या अपेक्षेसह तमाम शिवशंभुप्रेमींना श्रीशंभुराज्याभिषेक दिनाच्या मनःपुर्वक सदिच्छा..!

लेखन – अनिल माने

(संपादक, श्रीशंभुराज्याभिषेक विशेषांक २०१७)

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top