शिवरायांनी राज्याभिषेकासाठी ६ जुन हा दिवस का निवडला ?

छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन आज महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सोहळ्याला हळुहळु लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त व्हायला लागले आहे. राजधानी रायगडावर लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी मावळे राज्याभिषेक सोहळ्यासाठी हजेरी लावतात. त्याची तयारी दोन-चार महिने अगोदरपासुनच सुरु होते.

“काळजा काळजात एकच धुन
चलो राजधानी रायगड ६ जुन”

हे घोषवाक्य आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. परंतु ह्याच ६ जुनला राज्याभिषेक करवुन घेण्यामागे महाराजांची दुरदृष्टी काय होती याबद्दल अनेक शिवप्रेमी अज्ञात आहेत. चला तर मग जाणुन घेऊया महाराजांनी राज्याभिषेकासाठी ६ जुन हा दिवस का निवडला याविषयी…

१) आपल्या कर्तृत्वाची आणि स्वराज्याची जाणीव दाही दिशांना आणि आलम दुनियेला व्हावी आणि त्याचवेळी मोगलांनाही ह्या देशात स्वतंत्र स्वाभिमानी स्वराज्याची स्थापना झाली हे कळावे यासाठीच कोणत्याही मुहुर्ताची वाट न बघता महाराजांनी ६ जुन हा दिवस जाणीवपुर्वक राज्याभिषेकासाठी निवडला. त्यांनी मोगलांना त्यांच्या ढासळत्या डोलाऱ्याची जाणीव करुन दिली. त्यांनी मोगलांचा तिळपापड केला.

२) महाराजांच्या राज्यभिषेकास त्याकाळी धर्मविधी करणाऱ्या सर्वच पुरोहीत वर्गाने जाहीर विरोध केला आणि महाराज वैदिक धर्मानुसार शुद्र असल्यामुळे राज्याभिषेकास पात्र नाहीत असा निष्कर्ष काढला होता. त्यामुळे महाराजांनी काशीच्या गागाभटाला भरपुर द्रव्य देऊन त्याच्याकडुन राज्याभिषेक करुन घेतला आणि विरोध करणाऱ्या पुरोहित वर्गाला धडा शिकवला.

१) जबाबदारी : शिवचरित्राचा गाभा असणारा पैलु

३) ६ जुन हा मृग नक्षत्राचा आदला दिवस. कृषी संस्कृतीशी जवळचा दिवस. आपल्याकडे मृग नक्षत्र ७ जुनला सुरु होते. त्यात काहीच बदल होत नाही. महाराष्ट्रात कोकणासह सगळीकडे शेतकऱ्यांच्या पेरण्या प्रामुख्याने मृग नक्षत्रात सुरु होतात. म्हणजेच शेतीची कामे ७ जुनपासुन सुरु होतात. शेतकरी रयतेला हा सोहळा सोयीचा जावा आणि महाराजांचा राज्याभिषेक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा क्षण ठरावा, म्हणुन त्याकाळी रोहीणी व मृग नक्षत्राचा जोड दिवस म्हणुन महाराजांनी ६ जुन हा दिवस निवडला.

४) ६ जुन १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला,  त्यावेळी किल्ले रायगडवरचे वातावरण चांगले होते. उन्हाळा आणि पावसाळा यांच्यामधील तो संक्रमणकाळ. आकाश निरभ्र होते. ऊनही कमी झालेले होते. पाऊस नव्हता. वातावरण शेतकऱ्यांना सुद्धा सोयीचे होते. हे सुध्दा हा दिवस निवडण्यामागचे महत्वाचे कारण होते.

५) जर महाराजांनी ज्योतिषाचा सल्ला घेतला असता ज्योतिषांनी त्यांना ऑक्टोबर ते जानेवारी हा काळ सांगितला असता. कारण पंचांगातील दक्षिणायण-उत्तरायण ही भानगड. परंतु महाराजांना त्यावेळी वेगेवेगळ्या शत्रुंच्या हालचालींवर लक्ष देणेही तितकेच आवश्यक होते. राज्याभिषेकाला कुठल्या शत्रुचा अडसर व्हायला नको होता. लोक दक्षिणायण वर्ज्य मानतात. परंतु महाराज आवर्जुन दक्षिणायणातील जुन महिना निवडतात, कारण शत्रुला चकमा देण्यासाठी तेच योग्य होते. राज्य राहिले तरच राज्याभिषेक सोहळा व्यवस्थित होईल. म्हणुन अगोदर राज्य आणि रयत ह्यांची काळजी घेऊन महाराजांनी हा दिवस निवडला.

६) मुहुर्त, पंचांग आणि योग्य संधी याचा काहीही संबंध नसतो हे महाराजांनी आपल्या अनेक मोहिमांतुन दाखविले होते. राज्यभिषेक या महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या प्रसंगीही त्यांनी हीच गोष्ट सिद्ध करुन दाखविली.

७) ६ जुन हा दिवस निवडण्यामागे आणखी एक मोठा राष्ट्रीय उद्देश होता. मोगल बादशहा औरंगजेब याचा सिंहासनरोहणाचा खास कार्यक्रम ५ जुन १६५९ या दिवशी झाला होता. त्यामुळे “आता तुमच्या मोगलाईचा अस्त होऊन स्वराज्याच्या स्वातंत्र्याचा सूर्य दक्षिणेकडील क्षितीजावर उगवलेला आहे” हे औरंगजेबाला दाखवुन देण्यासाठी महाराजांनी ५ जुनच्या मध्यरात्रीपासुनच राज्यभिषेक प्रक्रिया सुरु करुन ६ जुन १६७४ रोजी किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक केला. जगातील सर्वात बलाढ्य सत्ताधीशाला सह्याद्रीच्या रणमर्दाने दिलेला तो एक इशाराच होता.

महाराजांच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकल्यानंतर औरंगजेब त्यावेळी हताशपणे उद्गारला,
“या खुदा, अब तो हद हो गई | तु भी उस सिवा के साथ हो गया | सिवा ‘छत्रपती’ हो गया |”

छत्रपती शिवराय यांच्याकडे दुरदृष्टी होती, म्हणुनच त्यांनी राज्याभिषेकासाठी हा दिवस निवडला. तारीख-तिथी वाद करण्यापेक्षा सर्व शिवप्रेमींनी शिवरायांच्या नजरेतुन या सोहळ्याकडे पहावे. या दिवसाला राष्ट्रीय सणाचे महत्व कसे प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करावेत. जय शिवराय.
लेखन – अनिल माने.

शिवरायांच्या कुटुंबातील दुर्लक्षित व्यक्तिरेखा

शिवजयंती वाद निर्माण करणाऱ्यांना महाराजांचे पत्र

संकलन – लोकराज्य टीम.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top