संभाजीराजेंच्या राज्याभिषेकाचे वास्तव आणि रंगवणुक

संभाजी राजेंच्या राज्याभिषेकाच्या संदर्भाने चिटणीसाच्या बखरीत आलेल्या चुकीच्या मांडणीचे खंडन

बुधवार, २९ जुलै १६८० ला ललिता पंचमीचे औचित्य साधुन संभाजी महाराजांनी स्वतःचे मंचकारोहण करुन घेतले. परंतु त्याकाळी थोरल्या महाराजांच्या मृत्युनंतर असलेल्या अस्थिर वातावरणात झालेल्या मंचकरोहणात त्यांना व त्यांच्या सहकारी मंत्र्याधिकाऱ्यांना तितके समाधान व शास्त्रार्थाच्या दृष्टीने निर्दोषत्व वाटले नाही. त्यामुळे संभाजीराजांवर ऐंदऱ्याभिषेक करवुन हिंदवी राजसिंहासानाची प्रतिष्ठा कायम राखावी असा विचार झाला. त्यानुसार शंभुराजांचा महाराज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ रोजी पार पडला. शंभुराजे या स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.

याच काळात स्वराज्यावर आदिलशहा, मोगल व सिद्दी यांचे जोराचे अपघात चालु झाले होते. अशा गडबडीत राज्याभिषेक उरकुन घेण्याची निकड त्यांनी केली नसती. परंतु छत्रपती शिवरायांच्या मृत्युनंतर त्यांचे क्रियाकर्म दोनदा करावे लागल्याने व “प्रथमाभिषेक” हा विष्णुसुप्तीतच करुन घ्यावा लागल्याने या मंचकारोहणाचा संस्कार तितकासा समाधानकारक वाटला नाही.

बाल राजारामांसही तसाच संस्कार घेऊन गेल्याने शास्त्राचा व धर्माच्या अडचणी उपस्थित होत होत्या. त्यामुळे ह्या सर्व अडचणी दूर करुन राजसिंहासनाचा निर्वेध भोक्ता होण्यास जसा शिवाजी महाराजांस संस्कार करुन घ्यावा लागला तसाच संभाजीराजांसही ऐंदऱ्याभिषेकाचा संस्कार करुन घेणे व दुहीचे मुळ काढुन टाकणे जरुर झाले होते.

शंभुराजांचे चरित्र बदनाम करण्यास अग्रेसर असणारा मल्हार रामराव चिटणीस या राज्याभिषेक प्रसंगी तरी कसा मागे राहिल ?  तो लिहितो :

माघ शुद्ध १० गुरुवार शके मजकुरी यांस राज्याभिषेक यथाविधी विनायकशांती व पुरंधर शांती होम करुन नंतर अभिषेक होऊन सिंहासनरुढ जाले

यात तिथीवाराशी जसा मेळ नाही तसाच दिवसाचाही घोटाळा याणे केलेला आहे. म्हणजेच मल्हार रामरावाचा सर्व मजकुर पुर्णपणे चुकीचा आहे.

आता त्याचे कथाथाटाचे काल्पनिक भाष्य पाहा :
सूर्यदर्शन व्हावे ते अस्तमानापर्यंत अभ्र येऊन न झाले.”

पहिली गोष्ट सूर्यदर्शनाचा या विधीत काहीही संबंध नाही. आणि माघात (साधारण फेब्रुवारी,मार्च वगैरे) मल्हार रामरावाने सांगितलेली काल्पनिक परिस्थिती असण्याचा संभव तर अगदीच कमी आहे.

तो पुढे म्हणतो :
सिंहासानावरुन उठोन रथावर बसले. तेथुन काळपुरुष मारावा म्हणुन निघाले मार्गी रथ मोडला. तसेच हत्तीवर स्वार होऊन मिरवत समारंभेकरुन महालात आले तेथुन यज्ञशाला केली होती तेथे कबजीच्या सांगण्यावरुन ……तुळा केल्या. अष्टप्रधान यांचे सन्मान वस्त्रे अलंकार देऊन ब्राम्हण तीस-चाळीस हजार जाले. त्यांस दक्षणा (देऊन) ब्राम्हणभोजन करविले. तेव्हा दक्षणेचे दाटीत काही ब्राह्मणही मेले…

आता या मल्हाररावाचे अज्ञान पाहा. ह्या विधीमध्ये सर्व विधी आटोपल्यावर सिंहासनरोहण करावयाचे असते. परंतु मल्हार रामराव सांगतात की, तुलादान प्रसंगी काही ब्राम्हण मेले. परंतु समकालीन लेखकांच्या लिहिण्यावरुन व तुळादान विधीच्या प्रयोगावरून हे तुळाद्रव्य सर्व ब्राह्मणांना वाटायचेच नसते. ते फक्त विधीसाठी उपयोजिलेल्या ब्राह्मणाच्या अधिकारपरत्वेच त्यांना वाटुन द्यावयाचे असते. शिवाय शंभुराजांचा तुलादानविधी १५ दिवस पुर्वीच झाला होता.

अनेकांनी संभाजी कादंबरी वाचली असेलच. त्यातदेखील राज्याभिषेक प्रसंगाचे असेच काही वर्णन दिले आहे. बरेच ब्राम्हण मारतात व सर्वजण कवी कलश यांना शिव्या देत रायगड उतरतात वैगरे……

साभार – अभिषेक कुंभार

वाचा –

१.छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक

२) श्रीशंभुराज्याभिषेक सोहळ्याची भुमिका

३) छत्रपती संभाजी महाराजांवरील आरोपांचे सप्रमाण खंडन

© लोकराज्य टीम.

 

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top