छत्रपती सूत्र : जबाबदारी : शिवचरित्राचा पैलू

छत्रपती सूत्र : जबाबदारी : शिवचरित्राचा पैलू

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची पाने चाळुन पाहताना आपल्याला त्यात आजही अनेक प्रेरणादायी मार्ग सापडतात. शिवचरित्र आहेच मुळात इतकं प्रेरणादायी. म्हणुनच तर जगाच्या पाठीवर शिवरायांच्या कार्याचे गुणगान दिवसेंदिवस अधिकच जोमाने होताना दिसते.

सामान्य माणसाला पडणाऱ्या सर्वच प्रश्नांची उत्तरे असणारे गाईड म्हणजेच शिवचरित्र. इतकं शिवचरित्राचे महत्व अधोरेखित आहे. आपल्याला शिवचरित्राच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक मार्गदर्शक मुल्ये सापडतील. फक्त त्या मुल्यांचा प्रामाणिक शोध घेण्याची गरज आहे.

सुरुवातीला अगदी मोजक्या मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी उभा केलेला लढा स्वराज्यनिर्मिती करेपर्यंत थांबलाच नाही. कमी मनुष्यबळावर इतके दैदिप्यमान यश संपादन करणारे महान राजे फक्त शिवछत्रपतीच..

परंतु आज आपल्याकडे त्याकाळच्या मानाने इतके मनुष्यबळ असतानासुध्दा आपण आपले कार्य अपेक्षेप्रमाणे पुर्ण करु शकत नाही, हा मोठा विरोधाभास आहे. शिवरायांनी त्याकाळात जे करुन दाखवलं, ते आपण का करु शकत नाही ? हा प्रश्न आज उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. अशी कोणती गोष्ट होती ज्यामुळे शिवराय अल्प मनुष्यबळावर हे यश मिळवु शकले ? याचा बारकाईने विचार केला तर शिवरायांच्या यशाच्या अनेक रहस्यांपैकी या एका महत्त्वाच्या रहस्याचा उलगडा होतो.

शिवशाहीच्या यशस्वीतेचे रहस्य म्हणजे प्रत्येकाला असणारी “जबाबदारीची जाणीव” आणि या जाणीवेतुनच प्रत्येकाने प्रामाणिकपणे पार पाडलेली आपापली “जबाबदारी“. दिलेली जबाबदारी कोणत्याही परिस्थितीत पार पाडणे हे शिवशाहीच्या यशाचे एक महत्वाचे गमक आहे.

आपण कोणतीही गोष्ट जबाबदारीने केली तर तिचा परीणाम सकारात्मक असतोच हे यावरुन लक्षात येते. तसं पहायला गेले तर जबाबदारीची जाणीव असणे आणि जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हीच खुप मोठी गोष्ट आहे. जबाबदारी पाळणे हे शिवचरित्रातील महत्वाचा संदेश आहे. याबाबत शिवशाहीतील काही प्रातिनिधीक उदाहरणे पाहू…

१) शहाजीराजे, जिजाऊ माँसाहेब यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारी पायाभरणी करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि पार पाडली.

२) जगतगुरु संत तुकोबांरायांनी किर्तनाच्या माध्यमातुन शेतकरी, कष्टकरी लोकांमधे अन्यायाविरुध्द पेटुन उठण्याची वृत्ती निर्माण करुन वारकऱ्यांना धारकरी मावळे बनवण्याची जबाबदारी स्विकारली आणि पार पाडली.

३) छत्रपती शिवरायांनी स्वराज्यनिर्मीतीच्या लढ्याचे नेतृत्व केले. या लढ्याच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांनी स्विकारली आणि पार पाडली.

४) वीर बाजी पासलकर, तानाजी मालसरे, प्रतापराव गुजर, बाजीप्रभु, मुरारबाजी, नागोजी जेधे, शंभुसिंह जाधव, मदारी मेहतर, जीवाजी महाले, शिवाजी काशीद, रुस्तमेजमान, येसाजी कंक, बहिर्जी नाईक यासारख्या हजारो मावळ्यांनी स्वतःच्या प्राणाची, घरादाराची पर्वा न करता स्वराज्यासाठी लढण्याची जबाबदारी स्विकारली आणि पार पाडली.

 

शिवशाहीतील अशी अनेक उदाहरणे देता येतील. शिवशाहीत प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखली, ती स्वीकारली आणि पार पाडण्याची भुमिका बजावली.

शिवशाहीच्या यशात आणि आजच्या आपल्या अल्पयशात (आणि अपयशात ) हाच फरक दिसतो. स्वतःची जबाबदारी पार पाडणे तर सोडाच पण आपल्याला साधी आपली जबाबदारीही ओळखता येत नाही.

मतदाराला सुज्ञ मतदार असण्याची, विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवणाऱ्या विद्यार्थी असण्याची, शिक्षकाला जबाबदार विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षक असण्याची, लेखकाला प्रामाणिक लेखक असण्याची, वक्त्याला श्रोत्यांमध्ये चैतन्य निर्माण करणाऱ्या वक्ता असण्याची, नेत्याला जनसेवा करणाऱ्या नेता असण्याची, विचारवंतांना समाजाला प्रबोधित करणाऱ्या विचारवंत असण्याची, पदाधिकाऱ्याला एखाद्या संस्थेचा निष्ठावंत पदाधिकारी असण्याची, शासनाला लोकसेवा करणाऱ्या शासक असण्याची…..

ही यादी अजुन खुप वाढवता येईल. बरेचजण एकच विचार करतात मी जबाबदारी घेतल्यावर “मला काय फायदा ?” त्यामुळे आजकाल जबाबदारी पाळण्याऐवजी जबाबदारी टाळण्याचाच जास्त प्रयत्न होताना दिसतो. यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच जातात.

आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर आपणच आपली जबाबदारी ओळखुन तिचा स्वीकार केला पाहिजे आणि ती पार पाडण्यासाठी प्रयत्न केले तर शिवशाही अवतरायला वेळ लागणार नाही. निदान शिवरायांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्यांनी तरी शिवचरित्रानुसार आचरण करण्याची जबाबदारी स्वीकारुन ती पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, ही अपेक्षा…
लेखन – अनिल माने

वाचा
१. शिवचरित्र काय शिकवते ?

२.शिवरायांचा वसा आणि वारसा सांगणाऱ्यांसाठी आचारसंहिता

संकलन – लोकराज्य टीम.