प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी

भारताचा राष्ट्रीय सण : प्रजासत्ताक दिन

भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीनंतर भारतीयांच्या हाती आलेलं स्वराज्य लोकशाही मध्ये परावर्तित करण्याचं काम घटना समितीने केले. समितीतील सर्व सदस्यांनी अभ्यासाअंती भारतीय संविधानाच्या माध्यमातुन लोकशाही भारताच्या प्रवासाची दिशा निश्चित केली. त्या दिशेने प्रवास करत असताना भारतीयांमध्ये आवश्यक असणारी सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, वैचारिक, इत्यादि क्षेत्रातील प्रगल्भता लोकशाही मुल्यांच्या माध्यमातुन रुजवण्याचा प्रयत्न झाला.

संस्कृतींची, धर्मांची, जातींची, पंथांची, भाषेची विविधता असणाऱ्या एका प्रचंड मोठ्या भूभागाला “राष्ट्र” या संकल्पनेत एकवटण्याचं काम लोकशाही मुल्यांनी केले.

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लोकांच्या मनामध्ये जो राष्ट्रवाद रुजलेला होता, तो स्वातंत्र्यानंतरही टिकवुन ठेवण्याचा आणि त्यात गुणात्मक विकास करण्याचं मोठं आव्हान लोकशाही मुल्यांनी आज पेलुन धरलं आहे.

आज भारतीयांना दैनंदिन जीवनात ज्या ज्या वेळेस आपले हक्क, अधिकार, कर्तव्य यांची आठवण होते, त्या त्या वेळेस भारतीय लोकशाही मुल्यांचा विजय होत असतो. कारण या सगळ्याची जाणीव निर्माण करण्याचं कामच मुळात लोकशाही मुल्यांनी केले आहे.

धार्मिक सण, उत्सवांमध्ये रमणाऱ्या भारतीयांनी लोकशाही भारताच्या वाटचालीतील सुरुवातीचा दिवस प्रजासत्ताक दिन हा “राष्ट्रीय सण” म्हणुन साजरा करण्याचे ठरवले. या राष्ट्रीय सणाचा, लोकशाही उत्सवाचा जागर करत असताना लोकशाही मुल्यांचा जास्तीत जास्त अंगीकार करण्याची, त्यातुन प्रगल्भ होण्याची क्षमता प्रत्येक भारतीयांच्या ठायी येवो ही अपेक्षा…

अनिल माने

© लोकराज्य टीम.