सॉफ्टवेअर इंजिनिअर ते चहा व्यावसायिक

शेतकऱ्याचा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला. पुण्यातील कंपनीत त्याला महिन्याला एक लाखाचा पगार मिळू लागला. पण वाचनाची आवड निर्माण झाली. तो उद्योगपती कसे घडले, यावरील पुस्तकेही वाचू लागला. उद्योगपती बनण्याचे स्वप्न पाहू लागला. अचानक एक दिवस एक लाखाच्या नोकरीला लाथ मारली. अमेरिकेत नोकरीसाठी दिलेली आॅफरही ठोकरली अन् पुण्यात चक्क चहा विकू लागला. सर्वजण बोलू लागले, वेडा झाला. समाजाने वेडा म्हणून हिणवलेला हा युवक आज चहा विक्रीतून वर्षाला दोन कोटींहून अधिक उलाढाल करू लागला.

कऱ्हाड तालुक्यातील पेरले गावातील राहुल उत्तमराव चव्हाण या शेतकऱ्यांचा मुलाने हे करून दाखवले आहे. ‘या जगात आपल्याला कोणच मोठे करणार नाही. आपल्याला मोठे करणार ते फक्त आणि फक्त आपले काम,’ हे ब्रीद वाक्य घेऊन शेतकरी ते चहावाला व्हाया सॉफ्टवेअर इंजिनिअर हा राहुलचा प्रवास थक्क करणारा आहे.

राहुलचा जन्म पेरले गावातील शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घेतले. पदवी कऱ्हाडच्या सायन्स कॉलेजमध्ये घेतली. एमसीए ही पदव्युत्तर शिक्षण भारती विद्यापीठ मलकापूरमध्ये घेतले. नोकरीसाठी त्याने मुंबई गाठली. मुंबईत एक वर्ष सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी केली. ती नोकरी सोडली. पुणे हीच कर्मभूमी मानून पुणे येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करू लागला. महिन्याला एक लाख रुपये पगार मिळू लागला. याच दरम्यान त्याच्यात वाचनाची आवड निर्माण झाली. भेटेल ते पुस्तक वाचणे सुरू झाले. पुस्तकांमधून अनेक उद्योगपतीच्यावर लिहिलेली पुस्तकेही वाचनात आली आणि स्वत: उद्योगपती होयचेच. हे स्वप्न पाहू लागला. एक दिवस वाचन करत असताना नोकरी सोडायची आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा राहुलने निर्णय घेतला.

अमेरिकेतील बॉसला फोन करून सांगितले, ‘नोकरी सोडतोय.’ नंतर त्याला स्वत:चा व्यवसाय करण्यास पत्नीची साथ मिळाली आणि शोध सुरू झाला व्यवसायाचा. राहुल व्यवसायात उतरला. पंधरा लाखांची चहा तयार करण्याची मशीन खरेदी केली. सुमारे २२ लाख रुपये खर्चून ‘रीडिफायंड टी‘ नावाने ३०० स्केअर फुटांच्या गाळ्यात चहा प्रीमिकस पॅकिंग सुरू केले. आज जो चहा पिला की त्याची कॉलिटी एक वर्षंनतरही मिळेल. ही खात्री त्याने ग्राहकांना दिली. आठ वेगवेगळ्या प्रकारचे चहाविक्री सुरू झाली. अनेक बरे-वाईट अनुभव घेत चहाविक्रीचा वेडेपणा राहुलने सुरू ठेवला. आयुष्याचा टर्निंग पॉर्इंट आला. चहाची चव आणि चहाचे जपलेले वेगळेपण उपयोगी पडले. एका कंपनीत चहा देण्याची आॅर्डर राहुलला मिळाली आणि त्याच्या चहाची गाडी सुसाट सुटली. ती आज अखेर सुसाटच आहे. या चहाविक्रीची आर्थिक उलाढाल दोन कोटींहून अधिक आहे.

दोन कामगारांना घेऊन सुरू केलेला हा चहाविक्रीचा व्यवसाय आज चांगलाच वाढला आहे. आज राहुलकडे सुमारे ४० कामगार काम करत आहेत. राहुलने स्वत:बरोबर ४० कामगारांच्या हाताला काम उपलब्ध केले आहे. मुलगी आर्या ही तिसरीत असताना आॅलिंपियाड परीक्षेत भारतात बारावी, तर पुण्यामध्ये प्रथम आली. हे समजल्यानंतर गावात तिचा सत्कार ठेवण्यात आला. संध्याकाळी अचानक फोन आला. सकाळी सत्कार आहे’. यावेळी गावी जाण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा मुलीने साठवून ठेवलेली मनी बँक फोडली. त्यातील सर्व १४० रुपये मला दिले; पण त्यात आम्ही गावी जाऊ शकत नव्हतो; पण वाचनातून मिळालेल्या विचारामधून सावरलो. पैसे उसने घेऊन दोघींना घरी जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसवले.

मी हे सर्व करू शकलो ते फक्त वाचनामुळे. वाचनामुळे जीवनात यशस्वी झालेल्या उद्योजकाच्या यशोगाथा मला समजल्या. त्याचबरोबर यश मिळवताना आलेली संकटे त्यावर त्यांनी केलेली मात ही मार्गदर्शक ठरली. वाचन हे जीवनात कसे उभे राहायचे, हे शिकवते. आम्ही फक्त चहा विकत नाही तर चहाबरोबर विचारही ग्राहकाला देत असतो.” असे राहुलने शेवटी सांगितले आहे.

साभार : कृषिकिंग

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top