सह्याद्रीपुत्र दुर्गमहर्षी प्रमोद मांडे (भाऊ)

सह्याद्रीपुत्र दुर्गमहर्षी प्रमोद मांडे (भाऊ)

 

दुर्गमहर्षी सह्याद्रीपुत्र भाऊंचा अल्प परिचय

प्रमोद मांडे” हे गडकिल्ल्यांच्या अभ्यास आणि संवर्धन क्षेत्रातील आदराचे नाव. त्यांचा जन्म १८ डिसेंबर १९५४ रोजी पुण्यात झाला. २२ वर्ष पुण्यातील टाटा मोटर्स येथे नोकरी करुन सप्टेंबर २००० मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांचा गडदुर्ग क्षेत्रातील दांडगा अभ्यास, अनुभव आणि आवाका प्रचंड आहे. लोक त्यांना प्रेमाने भाऊ म्हणतात.

केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील जवळजवळ ११०० हुन अधिक गडकिल्ल्यांना त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली आहे. भारतातील २००० हुन अधिक किल्ल्यांचा ज्ञानकोश त्यांच्याकडे आहे. आयुष्यातील ४५ वर्षे त्यांनी सह्याद्रीत आणि गडकिल्ल्यांच्या सहवासात पदभ्रमण केले.

 

किल्ले, स्मारके, मंदिरे यांची मिळुन जवळजवळ २ लाखाहुन अधिक छायाचित्रांचा संग्रह त्यांनी केला आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले जाते.

 

महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ३५० हुन अधिक किल्ल्यांची माहिती जनतेसाठी उपलब्ध करून देणारे ते पहिले दुर्गप्रेमी आहेत. दुर्ग क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल कोल्हापुरच्या छत्रपती शाहु महाराज यांच्याकडुन मांडे सरांना ‘दुर्गमहर्षी‘ किताबाने गौरवण्यात आले आहे.

अपरिचित शिवाजी, कथा क्रांतिकारकांच्या अशा विषयावर त्यांनी १२०० हुन अधिक व्याख्याने दिली आहेत. याच विषयांवरील ४०० हुन अधिक स्लाईड शो त्यांनी केले आहेत. दुर्गभांडार, Heritage Forts of India , आझादी के दिवाने ही त्यांची प्रसिध्द प्रदर्शने आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यात २०० हुन अधिक किल्ले, क्रांतीकारकांच्या चित्रांची प्रदर्शने त्यांनी भरवली आहेत.

 

इतिहास, गडकिल्ले, क्रांतिकारक अशा विविध विषयांच्या ५००० हुन अधिक दुर्मिळ पुस्तकांचा आणि ४५० क्रांतीकारकांच्या पेंटीग्सचा वैयक्तिक संग्रह त्यांच्याकडे आहे. क्रांतीकारकांवरील संशोधनासाठी आपल्या रिटायरमेंटचे सर्व पैसे खर्च करणारा राष्ट्रप्रेमी माणुस म्हणजे मांडे सर. त्यांच्या क्रांतीकारकांवरील संशोधन ग्रंथाला पंतप्रधानांची प्रस्तावना लाभली आहे. हा ग्रंथ इंग्रजी, गुजराथी, कन्नड भाषेतही प्रकाशित झाला आहे.

 

पुणे व्हेन्चरर्स, वडवानल प्रतिष्ठान, श्री राजगड स्मारक मंडळ, गड किल्ले सेवा समिती, लोकसेवा अकादमी यासह अनेक संस्थांचे ते संस्थापक सदस्य आहेत. टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्स्प्रेस, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, पुणे परिचय, महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य, पुढारी, सामना, चित्रलेखासह अनेक वृत्तपत्रे, मासिके यात त्यांनी लेखन केले आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजगड ते आग्रा आणि आग्रा ते राजगड या ६३०० किमी मार्गावरुन त्यांनी दोन वेळा प्रवास करुन मार्गाचे संशोधन आणि चित्रीकरण केले आहे. ABP Maza कडुन ते प्रकाशित करण्यात आले. आपल्या कार्यातुन हजारो शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्स, तरुण इतिहास अभ्यासक तयार केले.

गड किल्ले महाराष्ट्राचे” या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची इत्यंभुत आणि प्रमाण माहिती देणाऱ्या महाग्रंथाचे लेखक. याशिवाय सह्याद्रीतील रत्नभांडार, स्वातंत्र्यसंग्रामातील समिधा, स्वातंत्र्यसंग्रामातील अंगार, स्वातंत्र्यसंग्रामातील अग्निशलाका, १११ क्रांतिकारकांचे संक्षिप्त चरित्र (मराठी, इंग्रजी, गुजराती, कन्नड) अशी विविध पुस्तकं त्यांनी लिहली आहेत. मांडे सरांच्या कार्याचा गौरव करणारा “सह्याद्रीपुत्र” हा गौरवग्रंथही प्रकाशित झाला आहे.

 

त्यांच्या चित्रांची प्रदर्शने प्रसिद्ध आहेत. त्यापैकी आझादी के दिवाने (क्रांतिकारकांच्या जीवनावरील प्रदर्शन), सह्याद्रीतील रत्नभांडार (किल्ले, मंदिरे, लेणींच्या फोटोंचे प्रदर्शन), हेरिटेज फॉर्ट्स ऑफ इंडिया (भारतातील किल्ल्यांचे व वास्तुंचे भव्य प्रदर्शन) ही प्रसिद्ध प्रदर्शने आहेत.

 

१७ ऑक्टोबर २०१७ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. गडकिल्ल्यांवर प्रेम करणारा आणि प्रेम करायला शिकवणारा अवलिया माणुस असा अचानक निघुन गेल्याने गडकिल्ले संवर्धनासाठी काम करणाऱ्या दुर्गप्रेमींचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे…

© लोकराज्य टीम