अपयशावर जिद्दीने मात करणारी प्राची भिवसे

अपयशावर जिद्दीने मात करणारी प्राची भिवसे

अवघ्या एका गुणाने आयुष्य बदलले

प्राचीचे आई वडील व बहीण

माणसाला त्याची स्वप्न साकार करताना आयुष्य कुठल्या वळणावर घेऊन जाईल सांगता येत नाही. आयुष्यातील एखादी घटना, एखादा प्रसंग यातुन त्याला “Kick” मिळते आणि त्याचे संपुर्ण आयुष्य बदलते, अशी खुप उदाहरणे आपल्या आजुबाजुला पाहायला मिळतात. अशीच कहाणी आहे कोल्हापुरच्या प्राची भिवसे हिची. आपल्या जिद्दीच्या जोरावर या जिजाऊ-सावित्रीच्या लेकीने आपला झेंडा महाराष्ट्रात रोवला आहे. गेल्या वर्षी केवळ एका गुणाने एमपीएससीच्या STI परीक्षेत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या या कोल्हापुरच्या कन्येने यंदा त्याच STI परीक्षेत मुलींमध्ये महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. जाणुन घेऊया प्राची भिवसे हिच्याबद्दल…

प्राची सखाराम भिवसे ही कोल्हापुरच्या SSC बोर्डाजवळील पद्मा कॉलनीत राहते. लहानपणापासुनच प्राची अभ्यासात हुशार होती. वर्गात पहिला नंबर कधी तिने सोडला नाही. दहावीच्या बोर्डात पहिली येण्याचा पराक्रम तिने याआधीच करुन दाखवला आहे. एवढ्यावरच न थांबता बारावीलासुद्धा तिने पहिला नंबर सोडला नाही. तिने सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातुन इलेक्ट्रॉनिक्स बी.टेक. पदवी शिक्षण पुर्ण केले.

प्राची अभ्यासात हुशार असल्याने पदवीनंतर नोकरी न करता तिने काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान तिला स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती मिळाली होती. तिने स्पर्धापरीक्षा देऊन प्रशासनात जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या आई वडिलांनाही तिच्या निर्णयाला पाठींबा दिला.

इथुन प्राचीच्या प्रवासाला सुरुवात झाली. प्राची स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासासाठी पुण्याला आली. युनिक अकॅडमीमध्ये बाणेर येथे निवासी बॅचला तिने क्लास लावला. खरं तर तिच्या अंगभूत असणाऱ्या हुशारीमुळे तिला क्लासची गरज नव्हती, परंतु एक योग्य दिशा मिळावी म्हणुन तिने क्लासचा पर्याय निवडला. त्याचा तिला फायदाच झाला.

प्रामाणिकपणे कष्ट घेऊन प्राचीने २०१६ साली विक्रीकर निरीक्षक (STI) परिक्षा दिली. पूर्वपरीक्षा ती सहज पास झाली. त्याचवेळी तिने मंत्रालय सहाय्यक (ASO) ची सुद्धा परीक्षा देऊन त्यात सिलेक्शनसुद्धा झाले. जानेवारी २०१७ मध्ये ती मंत्रालयात सहाय्यक म्हणुन रुजु झाली. परंतु तिची स्वप्नं मोठी असल्याने तिचे मन तिथे रमत नव्हते.

८ मार्च २०१७ ला तिचा STI मुुख्यचा रिझल्ट लागला. त्यात ती केवळ एका गुणाने हुकली. त्यातच १६ मार्च २०१७ ला PSI पुर्वपरीक्षाही एका गुणाने हुकली. त्यानंतर खचून न जाता प्राचीने अभ्यास सुरु ठेवला. जानेवारीत झालेली STI पुर्वपरीक्षा ती उत्तीर्ण झाली होती. मे-जुन मध्ये तीने मन लावुन अभ्यास करुन मुख्य परीक्षा दिली.

प्राची भिवसे

एका गुणाच्या अपयशानंतर प्राचीने जिद्द सोडली नाही. हाच प्रसंग तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. तिने जिद्दीने STI मुख्य परीक्षा दिली. नुकत्याच त्याचा रिझल्ट लागला. त्यात प्राची राज्यात मुलींमध्ये पहिली आल्याची बातमी समजली तेव्हा तिच्या आईवडिलांना सार्थक झाल्यासारखे वाटले.

आपल्या यशाबद्दल बोलताना प्राची म्हणते, ‘‘स्पर्धा परीक्षा ही सर्वांचीच परीक्षा पाहत असते. आजही जे विद्यार्थी स्पर्धापरीक्षेत आपले भवितव्य आजमावत आहेत, त्यांनी एक-दोन गुणाने मेरिट हुकले म्हणून निराश न होता प्रयत्न कायम ठेवावेत. एक ना एक दिवस निश्‍चित यश मिळते, यावर विश्‍वास ठेवावा.

प्राचीने जे यश मिळवले ते नक्कीच प्रेरणादायी आहे. आपले प्रयत्न कमी पडत असतील तर ते वाढवा, परंतु अपयशाने अजिबात खचुन जाऊ नका. कदाचित हेच अपयश तुम्हाला आयुष्यात “Kick” देऊ शकते…

© लोकराज्य टीम.