दगलबाज शिवाजी : प्रबोधनकार ठाकरे

प्रबोधनकार ठाकरे यांचा १७ सप्टेंबर हा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या “दगलबाज शिवाजी” पुस्तकाविषयी…

…अर्जुन ‘बगलबाज’होता. काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू या क्षुद्र कल्पनेला बळी पडून विहित कर्तव्याला बगल मारून पळत होता. पण शिवाजी तसा न्हवता. तो वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकून समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पाडणारा ‘दगलबाज’ होता. बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समरभूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझलखानासमोर उभा ठाकलेला शिवाजी,यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो. ‘दगलबाज’ आणि ‘दगाबाज’ यातील भेदच लोकांना समजत नाही. दगलबाज म्हणजे ‘डिप्लोमॅट’ दगाबाज म्हणजे ‘ट्रेचरस’. इरसाल मुत्सद्दी हा दगलबाजच असावा लागतो !…” हे वादळी विचार आहेत महाराष्ट्राचे प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे. १९२६ साली लिहिलेली ‘दगलबाज शिवाजी’ हि त्यांची पुस्तिका व्यवहारवादी दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांकडे पाहायला लावते.

कल्पनेने किंवा अंधश्रद्धेने काढलेले शिवरायांचे चित्र बाजूला सारून, त्या राष्ट्रवीराची खरीखुरी प्रतिमा धिटाईने लोकांपुढे मांडणे म्हणजे लोकक्षोभाला बळेच आव्हान देण्याइतकेच भयंकर काम आहे. पण ते कोणीतरी केंव्हातरी करणेच प्राप्त असल्यामुळे लोकक्षोभाची पर्वा न बाळगता हौसेने ते आम्ही आपल्या शिरावर घेतेले आहे अशी भूमिका त्यांनी आधीच स्पष्ट केली आहे.

ज्या राष्ट्राला स्वातंत्र्य नाही, परकीयांच्या राजसत्तेखाली जे जगत असते, त्या राष्ट्रातल्या माणसांना ‘ह्युमन कॅटल‘ (माणशी गुरेढोरे) हीच संज्ञा यथायोग्य शोभते. शिवाजीच्या हृदयात राष्ट्रधर्माच्या या तीव्र भेदाची विद्युलता चमकेपर्यंत सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रातला हिंदू म्हणजे ‘ह्युमन कॅटल’ बनलेला होता, असे निरीक्षण नोंदवत प्रबोधनकारांनी शिवाजी महाराजांना अवतार केल्याबद्धल पुढे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवीरांची कीर्ती जगविश्रुत करण्याची जबाबदारी एतद्देशीय इतिहासकारांची असल्याचे अधोरेखित करीत आमच्या इतिहासकारांमध्ये विवेक, चिकित्सा आणि साक्षेप यांचा अभाव असल्याचे ते नमूद करतात.

शिवाजीला कोणी दगलबाज म्हटले कि आमच्या नाकाचा शेंडा फुरफुरू लागतो. पण, शिवाजी दगलबाज कसा न्हवे ? का असू नये ? याचा मात्र विवेशशून्य विचार आम्हाला कधी सुचायचा नाही; म्हणूनच रूढ पौराणिकी मताची पर्वा न करता हा विचार खुलासेवार चर्चेला घेतला असल्याची प्रांजळ कबुली त्यांनी संदर्भीय पुस्तकात अगोदरच दिली आहे.

शिवाजीवर अहिंदूंचे आरोप या प्रकरणात त्यांनी शिवाजी महाराजांना विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध बंड केल्याबद्धल राजद्रोहाचा आरोप करणाऱ्यांचे खंडन करताना म्हटले आहे कि, इंग्रजांनी मराठ्यांचाराजद्रोह केला अशी भाषा पुढे का येत नाही ? ब्रिटिश रक्तांच्या ब्रिटिशांनीच अमेरिकेतून ब्रिटिश सत्तेची उचलबांगडी करून नवीन संयुक्त अमेरिकन संस्थानची स्थापना केली. मग जॉर्ज वॊशिंग्टन हा सुद्धा मोठा दगलबाज राजद्रोही मानला पाहिजे असेही ते पुढे सांगतात. अफझुलखानाच्या (त्यांच्याच भाषेत) खून केल्याचा आरोप लावणाऱ्यांना प्रबोधनकार अफझलखानाचे इरादे आणि त्याची दगाबाजी याची आठवण करून देतात. शिवाजी आग्र्याच्या बादशाही कैदेतून पळाला असले आरोपसुद्धा बुद्धिभ्रष्टता अगर जातिवंत दुष्टावा यातूनच निर्माण होत असतात असेही प्रबोधनकारांनी सांगितले आहे.

राजकारण म्हटले कि दगलबाजी आलीच हे सिद्ध करण्यासाठी प्रबोधनकारांनी ‘दगलबाज शिवाजी’ या पुस्तकात मांडलेले युक्तिवाद खालीलप्रमाणे आहेत.

१) जीवो जीवस्य जीवनम ! मोठ्या माशाने धाकट्या मासोळीला मटकावून जगावे. ज्ञान्यांनी अज्ञान्यांची घरेदारे लुटून आपले वाडे शृंगारावे. जबरदस्तांनी कमकुवतांना जिंकून दास बनवावे. सत्य, न्याय, प्रेम, अहिंसेची कास बळकट धरणाऱ्या नामर्द षंढांना युक्तिबाज, दगलबाजांनी हसत हसत चिरडून जमीनदोस्त करावे. ज्याच्या हाती शिकार त्याने पारधी म्हणून मिरवावे. हाच जेथे सृष्टीत चाललेल्या ‘जगण्याच्या धडपडी’चा आत्माराम, तेथे एका चोराने दुसऱ्या चोरावर दगलबाजीचा आरोप करावा. ही तरी दगलबाजीच नव्हे काय ?

२) साध्यासुध्या संसारात एकमेकांच्या मुंड्या मुरगाळल्याशिवाय जर संसाऱ्याना जगताच येत नाही; कापड मोजताना गजाला आणि माल तोलताना तराजूच्या हिसका दिल्याशिवाय जर आमच्या व्यापारातला अपमृत्यु टळत नाही; आणि खऱ्या-खोट्याची भेसळ केल्याशिवाय, न्यायदेवतेने दिलेली न्यायाची कांजी पिण्याची जर मनुष्याच्या जिभेला सवयच नाही; तर कोट्यवधी लोकांच्या संसाराच्या बरेवाईटपणाचा जिम्मा घेणाऱ्या राजकारणी संसाराच्या नायकाला शक्तीयुक्ती बुद्धीची ठेवण कसल्या मनोवृत्तीच्या साच्यातून ओतून काढणे अगत्याचे असते, याची कल्पनाच करावी.

३) आजपर्यंत जगात एकही राजसत्ता झालेली दाखविता येणार नाही कि जिचा पाया दगलबाजीवर उभारलेला नाही. दगलबाजी हा यच्चयावत सर्व राज्यसंस्थापकांचा मुख्य सदगुण आहे. हा सदगुण ज्यांच्या अंगी विशेष तेच पुरुषोत्तम प्रत्येक देशाच्या नवमन्वंतराचे शककर्ते म्हणून इतिहासात चिरंजीव होऊन बसले आहेत.

४) नदीच्या मुळाप्रमाणे आणि ऋषीच्या कुळाप्रमाणे कोणत्याही राजसत्तेचे मूळ शोधण्यात अर्थ नाही. या मुळात कसकसली खते पडलेली असतात, त्याचे पृथ:करण भल्याने करू नये. म्हणूनच राजकारणपटू आंग्ल मुत्सद्दी एडमंड बर्क यांने ‘सर्व राजसत्तांच्या उगमांवर पावित्र्याचा पडदा सोडून देणेच श्रेयस्कर आहे‘ असा इशारा दिलेला आहे. असा दाखला प्रबोधनकारांनी या पुस्तकात दिलेला आहे.

शिवाजी विजयी दगलबाज

हिंदूंची राजनीती पडत्या प्रतिस्पर्ध्याचा सन्मान राखते, तर प्रतिस्पर्धी पराभूत होताच आंग्ल राजनीती त्याला रसातळाला नेते. हा भेट स्पष्ट करीत प्रबोधनकार पुढे लिहितात कि, नेपोलियन, जोन ऑफ आर्क, शिवाजी वगैरे थोरथोर राष्ट्रवीर वीरांबद्दल आंग्लेतिहासकार जे इतक्या क्षुद्रतेचे आणि उपहासाचे उद्गार काढतात, त्याचे मूळ त्यांच्या आनुवंशिक संस्कृतीत आहे. हिंदुस्थानात एकवेळ दगलबाज आर्यानी कम-दगलबाज अनार्यांना पादाक्रांत केले. त्यानंतर हिंदू राज्यकर्त्यांची दाणादाण उडवून मोगलांनी आपली दगलबाजी वरचढ ठरविली. पोर्तुगीज, फ्रेंच, डच व इंग्रजी यांमध्येही परस्पर दगलबाजीच्या शर्यती लागून, त्यात अखेर इंग्रजांचा घोडा पहिला आला. कांही वर्षे दख्खनच्या मुस्लमानशाह्या ‘आम्ही पट्टीचे दगलबाज’ म्हणून महाराष्ट्रभर आपल्या सत्तेचा धुमाकूळ घालत होत्या. शिवाजीने बोलबोलता त्या सत्तेला उद्ध्वस्त करून खुद्द दिल्लीच्या काळजाला हात घातला आणि मुसलमानांपेक्षा आम्ही मराठी दिढी दुपटी दगलबाज आहोत, याची जाहीर नौबद रायगडावरून ठोकली. पुढे मराठेशाहीचा धौशा पेशव्यांनी थेट अटकेला न्हेऊन भिडविला.

प्रबोधनकारांनी दगलबाजीचे समर्थन करताना स्वतःच एक शंका उपस्थित करीत विचारले आहे कि, जी कामे नीतिग्रंथात अकर्मे अथवा कुकर्मे म्हणून गणली जातात, ती उघड माथ्याने आचरून नरपती, हयपती,छत्रपती, चक्रवर्ती इत्यादी अत्युच्च पदाला पोहोचणाऱ्या पुरुषांना थोर का मानावे ? ते केवळ सत्ताधीश बनतात म्हणून कि काय ? नीती, न्याय, सदाचार यांना लाथाडून मिळविलेल्या श्रेष्ठ पदाची महती जगाने काय म्हणून वानावी ?

याचे उत्तरही ते पुढे देताना सांगतात कि संसाराच्या रोजच्या क्षुद्र दलदलीतसुद्धा ‘हे बरे का ते खरे’ ‘असे करू का तसे करू’ आणि ‘कसे करू काय करू’ याचा मानवाला उलगडा होत नाही. मोठमोठ्या पंडितांचीही निर्णयशक्ती पुष्कळवेळा लंजूर पडते. अशावेळी मोहग्रस्त माणूस वाट्टेल त्यावर वाट्टेल ते आरोप करून आपल्या संशयी मनाचे कसे तरी समाधान करून घेतो.

अहिंसा, सत्य, अस्तेय, कायावाचामनाची शुद्धता आणि इंद्रिय निग्रह ही पाच सनातन नीतिधर्माची तत्वे खरी, परंतु त्यांच्याही आचरणात अपवादांची अनेक स्थळे आहेत. सामान्य नियम आणि अपवाद यांचा पायाशुद्ध आणि विवेकमान्य विचार नीतिशास्त्राने मुळीच केलेला नाही असा आरोपही त्यांनी येथे केला आहे. त्यांनी आपल्या या विधानाला सिद्ध करण्यासाठी जो युक्तिवाद मांडला तो असा कि सत्यापेक्षाही सर्व भुतांचे ज्यांत हित असेल, ते बोलावे. सर्व भुतांचे ज्यात अत्यंत हित तेच माझ्यामते खरे सत्य होय. कोणत्याही कृत्याचा परिणाम काय होतो इकडे लक्ष पुरवूनच त्याची नीतिमत्ता ठरवली पाहिजे असा अशी आग्रही भूमिकाही ते मांडताना दिसतात.

यत्र योगेश्वर : कृष्णो यत्र शिवराय भूपती //
तत्र श्रीविजयो भूतिध्रुर्वा नीतिर्मतिर्मम //”

शेवटी प्रबोधनकार ठाकरे शिवरायांना दगलबाजांतील योगीराज संबोधताना दाखल देतात कि, श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला, पण ती प्रत्यक्षात आचरणात आणून महाराष्ट्राचा राष्ट्रधर्म भगवतगीतेत आहे, हे सप्रमाण सिद्ध केले शिवाजीने. गीतेचे पांग पांडवांनी फेडले नाहीत, ते शिवाजीने फेडले. महाभारतीय इतिहासाला आपल्या बुद्धिप्रभावाने रंगवून चिरंजीव करणाऱ्या दगलबाज श्रीकृष्णाला अर्जुनापेक्षा दगलबाज शिवाजी हाच खरा शिष्य व अनुयायी लाभला, यात मुळीच संशय नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top