प्रस्थापित माध्यमांचा संक्रमणकाळ

प्रस्थापित माध्यमांचा संक्रमणकाळ

 

माध्यमं ही समाजमनाचा आरसा असतात. समाजातुन उठणाऱ्या चांगल्यावाईट प्रतिक्रियांचे प्रतिबिंब त्यातुन उमटते असा सर्वसाधारण समज आहे. त्या प्रतिबिंबावरुन समाजाच्या चेहऱ्यावरील भावाचा अर्थ लावता येतो. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात वर्तमानपत्रे, रेडिओ या माध्यमांनी नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रवाद रुजवण्यात महत्वाची भुमिका बजावली. प्रबोधनाच्या चळवळीला बळ देण्याचे काम त्यांनी केले. अनेक वैचारिक प्रवाहांची जडणघडणच मुळात माध्यमं हातात असल्याच्या कारणाने झाली.

 

स्वातंत्र्यानंतरच्या काळात समाजाच्या प्रश्नांचे चित्रण करुन त्यावर प्रकाश टाकणाऱ्या दुरदर्शनचा प्रसार आणि लोकप्रियता वाढली. कालांतराने खाजगी दुरचित्रवाहिन्यांचीही लाट आली. या लाटेने समाजमनावर खुप मोठा प्रभाव टाकला. इतका की इलेक्ट्रॉनिक माध्यमांतुन मांडल्या जाणाऱ्या माहितीच्या रोखानेच स्वतःचे मत बनवण्याकडे लोकांचा कल वाढला. एखादी बातमी माध्यमांमध्ये सांगितली म्हणुन ती खरीच असेल, त्यात मांडलेले प्रश्न हेच आपल्या देशातील महत्वाचे प्रश्न आहेत किंवा त्या बातमीत मांडलेल्या माहितीची तीच एकमेव बाजु असुन दुसरी कुठली बाजु नसावी असा समज करुन घेण्याचा प्रकार लोकांमध्ये दिसु लागला. लोकांचं सद्सद्विवेकबुद्धीने विचार करणं कमी होऊ लागले.

नेमकं हेच माध्यमांच्या पथ्यावर पडले. मग माध्यमांनीही सेलेब्रेटींची प्रेमप्रकरणं, त्यांच्या घरातील वाद, त्यांचे रंगीबेरंगी सोहळे, विशिष्ट वर्गाचे प्रश्न अशा ज्या ज्या गोष्टींना महत्व दिले तेच आमच्या देशातील राष्ट्रीय प्रश्न आहेत या गोड गैरसमजात समाज वाहत गेला.

 

लोक आपले प्रश्न विसरले, परंतु त्यांना तेंडुलकरचे शतक, सलमानचे लग्न, कोहलीचा ब्रेकप यासारखे प्रश्न जिव्हाळ्याचे वाटु लागले. भरीस भर जाहिरातींद्वारे होणाऱ्या अर्थकारणाचा मोठा प्रभाव माध्यमांवर पडत गेला. त्यातुनच माध्यमांना पेड न्युज पत्रकारितेचे ग्रहण लागले. मिडीया ट्रायलचा उगमही इथेच सापडतो. प्रिंट मिडियालाही या गोष्टींची लागण व्हायला वेळ लागला नाही. मोजके अपवाद वगळता माध्यमं विकाऊ झाली. ब्लॅकमेलिंगची साधनं म्हणुन काम करु लागली. विशिष्ट विचारसरणीला बांधील राहुन काम करु लागली. समाजाचे लक्ष मुळ प्रश्नांपासुन हटवुन दुसरीकडेच वळवत राहिली. अपवाद वगळता शिकलेले लोकंही याला भुलत गेली.

 

सोशल मिडीयाच्या आगमनानंतर हे चित्र बदलत गेले. लोकांना सोशल मिडिया नावाचे खुप मोठे हत्यार हातात मिळाले. त्यामुळे प्रस्थापित झालेल्या माध्यमांवर काही अंशी अंकुश मिळवता आला. प्रस्थापित माध्यमं जसजशी व्यावसायिक होत गेली तसतसा लोकांना सोशल मिडीया जवळचा वाटु लागला.

प्रस्थापित माध्यमांतील एककल्लीपणा, सोयीस्करपणा, इत्यादि गोष्टीही याला कारणीभुत आहेत. म्हणुनच लोकांना स्वतःलाच आपले प्रश्न सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मांडावे लागत आहेत. स्वतःलाच वार्ताहर आणि निवेदकाचे काम करावे लागत आहे. येणाऱ्या काळात हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. माध्यमांनी राजकारण्यांची किंवा विशिष्ट वर्गाची रखेल म्हणुन काम करण्याने त्यांच्याबद्दल समाजात असणारी विश्वासार्हता कमी होत आहे. असो. येणाऱ्या काळात सोशल मिडिया जबाबदारीने हाताळणाऱ्या लोकांना महत्व येणार आहे. लोक व्यक्त होत राहतील. प्रस्थापित माध्यमांचे संक्रमण अटळ आहे.

 

लेखन – अनिल माने.

© लोकराज्य टीम.