कोल्हापुरचा शाही दसरा, ४० कोटींची मेबॅक कार, अडॉल्फ हिटलर !

१०० वर्षांपुर्वी जंगबहाद्दुर नावाचा हत्ती कोल्हापुरच्या शाही दसऱ्याच्या अग्रस्थानी असायचा. जंगबहाद्दुर नंतर ही जागा मेबॅक या आलिशान जर्मन कारने घेतली. १९३२ पासुन दसऱ्याला राजघराण्यातील मंडळींना घेऊन येणारी मेबॅकची २०१८ च्या दसऱ्याला ८७ वी दसऱ्याची फेरी होणार आहे.

अडोल्फ हिटलर आपल्या आवडत्या मेबॅक सह

“मेबॅक DS8 झेपलिन” असं पुर्ण नाव असलेली ही भारतात उपलब्ध असणारी एकमेव कार आहे आणि जगभरात फक्त ४-५ असाव्यात. मेबॅक तर्फे अशा फक्त १०० कारचे उत्पादन करण्यात आले होते. तत्कालीन जगात असे फक्त काही मोजकेच राजे, सुलतान राष्ट्राध्यक्ष, लष्करशहा होते ज्यांच्यात ही ऐपत होती की ते ही कार विकत घेऊ शकतील. कंपनीनेही “प्रोफाईल” बघुनच या कार विकल्या.

१९३२ साली छत्रपती राजाराम महाराज यांनी ही मेबॅक कार ऑर्डर देऊन लंडनमधून खरेदी केली. संस्थानाच्या ध्वजाचा रंग केशरी असल्याने केशरी रंगाच्या कारची ऑर्डर देण्यात आली. बॉनेटच्या पुढे महालक्ष्मी मुर्ती असून कारच्या मधल्या हेडलाईटवर भवानी आणि शिवराय असे संस्थानाचे चिन्ह कंपनीकडून तयार करवुन घेतले. आजतागायत या गाडीची एकदाही दुरुस्ती करावी लागली नाही. अत्यंत उत्कृष्ठ स्थितीत आणि अतिशय दुर्मिळ असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात या कारची आजची किंमत सुमारे ४० कोटी (6.5 Million $) आहे.

मेबॅकमधुन दसऱ्याचे सोने लुटताना छत्रपती घराणे

विल्हेम मेबॅक यांनी १९०९ साली मेबॅक कंपनीची स्थापना केली होती. गॉटलिब डैम्लर त्यांचे सहकारी मित्र होते तर फर्डिनांड पोर्श हा डिजाइन इंजिनियर त्यांच्या कंपनीत होता. त्यादरम्यानच कार्ल बेंझ आणि डैम्लर यांनी मर्सिडीज बेंझ कंपनीची स्थापना केली. फर्डिनांड पोर्शनेही वेगळे होत पोर्श मोटर्स चालु केली. डैम्लर आणि त्यांच्या मुलांने ऑडी आणि BMW च्या स्थापनेतही हातभार लावला.

जर्मनी मध्ये त्या काळात अडॉल्फ हिटलरचा उदय झाला होता. हिटलर मेबॅक कारचा प्रचंड मोठा चाहता होता. पण मेबॅक सारख्या अल्ट्रालक्झरी कारया सामान्यांच्या आवाक्यातल्या नाहीत ही रुखरुख त्याला होती आणि त्यातुनच Volkswagen (सर्वसामान्यांची कार) चा जन्म झाला. Volkswagen च्या बीटल कार ची संपुर्ण संकल्पना हिटलरची होती आणि या प्रोजेक्टचा लीड होता फर्डिनांड पोर्श. बीटल ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची कार ठरली, कारण तिची किंमत होती फक्त ८५ पौंड आणि अशा २.५ कोटी बीटल्स जगभर विकल्या गेल्या.

मेबॅक कार

राजाराम महाराजांच्या नंतर शाहू महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे आजही या मेबॅकची कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतात. मेबॅक कार जशी कोल्हापुरकरांच्या आणि छत्रपतींच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली, तशीच ही कार जगभरातल्या मोठ्या कार ब्रान्ड्सची जनकही बनली.

References –
Yuvraj Sambhajiraje,
RM Auction House,USA

लेखन – मालोजीराव जगदाळे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top