मराठा समाजासाठी महत्वपुर्ण उपक्रम

इथे देण्यात आलेली माहिती अत्यंत महत्वाची असुन शेवटपर्यंत वाचा ही विनंती.

मराठा क्रांती मोर्चामध्ये मराठा आरक्षण, शेती, शिक्षण, व्यवसायासाठी आर्थिक महामंडळ, शिवस्मारक आणि इतर अनेक मागण्या सरकारकडे करण्यात आल्या. या मागण्या मान्य होईपर्यंत मराठा क्रांती मोर्चाची लढाई सुरुच राहणार आहे. ही लढाई दीर्घकालीन आहे. परंतु केवळ मागण्या मान्य होतील या एका आशेवर वाट बघत बसण्यात वेळ घालवु नका. आपल्या पातळीवर आपल्याला काही करता येईल का याचा विचार करा. त्या अनुषंगाने आपल्याला काही उपक्रम राबवता येतील का याचाही विचार व्हावा.

१) आरक्षण प्रश्न – मराठा समाजाला प्रामुख्याने शिक्षण व नोकरी याठिकाणी आरक्षणाची आवश्यकता आहे. राखीव जागांच्या अभावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश, शैक्षणिक खर्च या अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यानंतर नोकरीसाठी संघर्ष करावा लागतो. आरक्षणाने हे प्रश्न सुटणारच आहेत, परंतु आरक्षण आपल्या हातात नाही किंवा घरचे नाही. त्याच्या हक्काची कायदेशीर लढाई आपण लढत आहोतच. त्याबरोबरच आरक्षणाअभावी निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी आपण पुढे देण्यात आलेल्या काही उपक्रमांचा प्राधान्याने विचार करावा. जर छत्रपती शिवराय यांच्यासारखा “एक मराठा” आपल्या कर्तृत्वाने “लाख मराठा” लोकांचा पोशिंदा होऊ शकतो, तर आपल्यात असणारे लाखो मराठे आपल्याच समाजातील एखाद्या मराठ्याचे पोशिंदें का होऊ शकत नाही असा विचार त्यामागे आहे.

अ) मराठा विद्यार्थी दत्तक योजना – ग्रामीण तसेच शहरी भागात मराठा समाजातील गरीब शेतकरी, मजुर, कामगारांची कित्येक मुलंमुली शिक्षण, उच्चशिक्षणापासुन वंचित राहतात. आपल्या समाजातील दानशुर, आर्थिक संपन्न लोकांनी आपल्या कुवतीप्रमाणे अशा मुलामुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारावे. आपले कौटुंबिक पालकत्व सांभाळत असतानाच या सामाजिक पालकत्वाचा विचारही वाढीस लागावा.

आ) मराठा विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना – मराठा समाजात शिक्षण, क्रिडा, इत्यादि क्षेत्रात अनेक विद्यार्थी आपली गुणवत्ता सिद्ध करत असतात. त्यांच्या हुशारी, कौशल्याचे कौतुक समाजात व्हायला हवे. ते खरी समाजाची संपत्ती आहेत. त्यांना प्रोत्साहन किंवा शाबासकी म्हणुन यथाशक्ती शिष्यवृत्ती देण्याचा प्रयत्न करा. आपल्या घरातील दिवंगत आईवडील, भाऊबहीण कोण असतील तर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अशी शिष्यवृत्ती देता आली उत्तम. कारण आठवणींच्या रुपात आपल्या प्रियजनांचे नावही जिवंत ठेवता येते, तसेच आपल्या समाजातील एका गुणवंतांचा गौरवही करता येतो. या योजनेचा विचार व्हावा.

इ) मराठा वसतीगृह योजना – शिक्षणासाठी शहरात, तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यांचे मायबाप पोटाला चिमटा काढुन लेकरांच्या शिक्षण, राहण्याच्या व्यवस्थेसाठी पैसे पुरवत असतात. हॉस्टेल, वसतीगृह चालवणारे कोणती दयामाया दाखवत नाहीत. सर्वसामान्यांच्या मुलामुलींना अशा दडपणाखाली शिक्षण घ्यावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी मराठा समाजातील श्रीमंत, बिल्डर, गृहनिर्माण संस्था मालकांनी अशा गरजु, चांगल्या मुलांना आणि मुलींना राहण्यासाठी आपल्या आवाक्यात असेल तर एखादे मराठा वसतीगृह सुरु करावे. जितके पुण्य देवाधर्माच्या कार्यात मिळते तितकेच पुण्य याही कार्यात नक्की मिळेल अशी भावना बाळगा.

ई) कुणबी दाखला काढुन घेणे – मराठा आणि कुणबी एकच आहेत. आज मराठा समाजाला आरक्षण नाही, तर कुणबी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतो. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र काढताना अडचणी येतात. माहितीचा अभाव असतो. पुढे दिलेल्या लिंकवर कुणबी दाखला काढण्याची माहिती दिली आहे.

असा काढा कुणबी दाखला.

उ) समाजातील तरुणांना नोकरीत प्राधान्य – आज मराठा समाजातील अनेकांचे स्वतःचे खासगी उद्योग, व्यवसाय, संस्था आज कार्यरत आहेत. अनेक राजकीय नेत्यांकडे रोजगार पुरवणारी व्यवस्था आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल तेव्हा लागेल, तोपर्यंत का होईना समाजातील अशा सर्व रोजगारदात्यांनी आपल्या समाजातील गरजु, होतकरु युवापिढीला आपल्या आवाक्यातील सर्व ठिकाणी रोजगार देण्याचा प्रयत्न करा. सामाजिक उत्तरदायित्वाची भुमिका पार पाडण्याची साखळी सुरु करा, ती आपोआप वृद्धिंगत होत जाईल.

ऊ) आरक्षण विरहित क्षेत्र – जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरण धोरणांमुळे सरकारी रोजगार क्षेत्रात कपात होत चालली आहे. आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या लोकांची संख्या देशातील सव्वाशे कोटी मध्ये फक्त ०.३३% एवढीच आहे. त्यातही सरकारी व्यवस्थेने रोजगार पुरवण्याची जबाबदारी खासगी उद्योगांवर ढकलली आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. परंतु देशात अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यात आरक्षणाचा अजिबात संबंध येत नाही. संरक्षण खात्यातील आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मधील नोकऱ्या, कृषी क्षेत्र, खासगी नोकऱ्या, चित्रपट, पर्यटन, जाहिरात, क्रिडा, स्टॉक एक्स्चेंज, जलवाहतुक, व्यापार, लघु/मोठे उद्योग व्यवसाय, मासेमारी, गोदी कामगार, शेती कामगार, कुक्कुटपालन, पशुपालन, मधुमक्षिकापालन, अंगमेहनतीची व श्रमाची छोटी मोठी सर्व कामे, असंघटित क्षेत्रातील कामे, इत्यादि सर्व क्षेत्रांमध्ये आरक्षणाचा तितकासा संबंध येत नाही. या क्षेत्रांकडे रोजगाराच्या दृष्टीने पाहण्याचा विचार व्हावा.

२) शेती प्रश्न – मराठा समाजामध्ये पारंपरिक शेती करण्याची वृत्ती जास्त आहे. शेतीच्या दुष्टचक्रात तो अडकला आहे आणि त्यातच आत्महत्येचे विचार त्याच्या मनात येत असतात. केवळ शेतकऱ्यांना तत्वज्ञान शिकवायचे म्हणुन हा विषय सांगत नाही. कारण करायला गेले तर शेतीसारखे फायद्याचे क्षेत्र नाही. फक्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतात काय पिकते यापेक्षा बाजारात काय विकते ही दृष्टी विकसित करायला हवी.

अ) शेतीपुरक उद्योग व्यवसाय दृष्टी – आपले शेतकरी ऊस, कापुस, डाळी, फळबागा इत्यादि नगदी पिकांच्या पलीकडे पाहण्याचे धाडस करत नाहीत. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा शेतीपुरक व्यवसाय करणारे लोक आज आनंदात जीवन व्यतीत करतात ही आजची वस्तुस्थिती आहे. साखर, गहु, ज्वारी, दुध उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा त्याच साखर, गहु, ज्वारी, दुधाचा उपयोग करुन बिस्किटे, चॉकलेटसारखे उत्पादन घेणाऱ्या उद्योगांची आज चलती असते, एवढे उदाहरण पुरेसे आहे. शेतीतुन उत्पन्न काढण्यापर्यंतच आपले शेतकरी विचार करतात, परंतु आपल्या शेतातील शेतमालावर प्रक्रिया करुन तो तयार माल बाजारपेठेत आणण्याचा विचार शेतकरी करत नाही. शेतीशी ज्यांच्या कित्येक पिढ्यांचा संबंध नाही असे लोक शेतमालावर प्रक्रिया उद्योग करुन गब्बर होतात. शेतकऱ्यांनी व्यापारी दृष्टीने विचार केला तरी त्याची परिस्थिती बदलु शकते. याचा विचार व्हावा.

आ) शेतीजमिनी विकण्याऐवजी भागीदारी करा – मराठा समाज सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यांच्याकडे असणाऱ्या जमिनी. भले काही रोजगार मिळाला नाही तरी आपल्या शेतजमीनीत कष्ट करुन आपले कुटुंब जगवण्यापुरते धान्य उत्पादन तो काढु शकतो. परंतु थोड्याच काळापुरता विचार करुन मिळेल त्या किंमतीत आपली जमीन विकण्याची फॅशन आजकाल मराठा समाजात आली आहे. बाहेरचे श्रीमंत व्यापारी, भांडवलदार, उद्योगसमुह येतात आणि थोड्या जास्त किंमती देऊन शेतकऱ्यांकडुन जमिनी विकत घेतात. त्यावर स्वतःचे उद्योग, व्यवसाय सुरु करतात. शेतकऱ्यांकडील पैसे त्याला किती दिवस पुरणार आहेत, ते काही काळानंतर संपुन जातात आणि शेवटी त्यांची पुढची पिढी त्याच जमीनीवर उभ्या असणाऱ्या उद्योग,  व्यवसायात चपराशाची तरी नोकरी मिळावी यासाठी हेलपाटे मारतात. हे चित्र विदारक आहे. म्हणुन मराठ्यांनी आपल्या जमीनी विकण्याऐवजी त्याच जागेवर जे व्यवसाय, उद्योग उभे राहणार आहेत, त्यामध्ये आपल्याला भागीदारी, शेअर्स मागावेत. आयुष्याची भाकरी त्यातुन मिळेल. याचा विचार व्हावा.

३) इतिहास आणि अस्मितेचे प्रश्न – मराठे आपल्या इतिहासावर प्रचंड प्रेम करतात. इतिहास म्हणलं की मराठे मध्ययुगीन काळात जाऊन अभिमानाने आपल्या पुर्वजांचा आणि शिवरायांच्या इतिहासाचे कौतुक सांगतात. तो सांगितलाच पाहिजे, शेवटी तो आपला वारसा आहे. परंतु मोजके अपवाद सोडले तर आपल्याच इतिहासातुन धडे घ्यायला मराठे कमी पडतात ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मराठ्यांच्या इतिहास आणि अस्मिता यांना थोडं गोंजारले तरी मराठे बिनघोर आपली मान त्या गोंजारणाऱ्याच्या खांद्यावर टेकवतात आणि शेवटी आपली मान कापुन घेतात. थोडंसं आत्मपरीक्षण करुन मराठ्यांनी सावध व्हावं. त्यासाठी काय करता येईल यासाठी काही सावधानतेचे उपाय करावेत.

अ) शिवस्मारक – अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य शिवस्मारक व्हावे अशी सर्व मराठ्यांची इच्छा आहे. तिथे सर्वांच्या अस्मिता जोडलेल्या आहेत. ही नस ओळखुन राजकारण्यांनी मराठ्यांना कायम वापरले. समुद्रात महाराजांचे स्मारक झालेच पाहिजे. ते होईल तेव्हा होईल, त्यासाठी आपले पण प्रयत्नही चालु ठेवले पाहिजेत. परंतु त्याचबरोबर बाहेरुन अंगठ्या, लॉकेट, गाड्यांच्या नंबरप्लेट, घरात महाराजांच्या प्रतिमा लावुन जगाला त्याचे प्रदर्शन करण्याआधी प्रत्येकाने महाराजांचे निदान छोटेसे स्मारक आपापल्या काळजात सुद्धा करा. म्हणजेच शिवरायांचे विचार आणि आचार समजुन ते आचरणात आणा. त्याची जास्त गरज आहे.

आ) इतिहासाचे संशोधन आणि पुनर्लेखन – मराठ्यांचा इतिहास प्रेरणादायी आहे. जगातील अनेकांनी मराठ्यांच्या इतिहासातुन प्रेरणा घेऊन आपापला इतिहास निर्माण केला आहे. परंतु मराठे आपल्या इतिहासाबाबत तेवढे जागरुक नाहीत. इतिहासातील अस्मितांबाबत सजग नाहीत. मराठ्यांचा प्रेरणादायी इतिहासाचे कर्तृत्व इतरांच्या नावावर खपवण्याचे आणि मराठ्यांच्या प्रेरणा नष्ट करण्याचे प्रकार अनेक वर्षांपासुन सुरु आहेत. त्यासाठी मराठ्यांनी आपल्या इतिहासाचे संशोधन आणि पुनर्लेखन करायला हवे. त्यातली तथ्ये नव्याने जगासमोर आणायला हवीत. आपल्या पुढच्या पिढीला त्याचा निश्चितच फायदा होईल, याचाही विचार व्हावा.

इ) गडकिल्ले संवर्धन – मराठ्यांच्या पुर्वजांनी स्वतःचा घाम आपल्या शेतात गाळला आणि स्वतःचे रक्त गडकिल्ल्यांवरील लढायांमध्ये सांडले आहे. गडकिल्ले आपला वारसा आहेत. अनेकांना लाभला नाही अशा आपल्या पराक्रमाचा तो वारसा आपल्याला लाभला आहे. त्या गडकिल्ल्यांनी मराठ्यांना सरदार, जमीनदार, देशमुख, पाटील बनवले आणि प्रतिष्ठा दिली आहे. मात्र आज ते गडकिल्ले आज इतिहासाच्या वारसदारांकडुन उपेक्षित आहेत. इतिहास घडविण्यासाठी गडकिल्ल्यांवर जाणाऱ्या मावळ्यांचे वंशज आज फक्त पर्यटन आणि फोटो काढण्यापुरते गडकिल्ल्यांवर जात आहेत. त्यांनी आपला वारसा टिकवुन ठेवण्यासाठी खारीचा का होईना वाटा द्यायला हवा. जमेल तितका संवर्धनाचा प्रयत्न करायला हवा. शिवस्मारक विरुद्ध गडकिल्ले संवर्धन असा वाद लावला जात असतो, तो वादही संपवायला हवा.

४) एकीचा प्रश्न – मराठा समाज कधी एकत्र येत नाही ही गेल्या कित्येक वर्षांपासुन पसरविण्यात आलेली अफवा मराठा क्रांती मोर्चांनी खोटी असल्याचे सिद्ध केली. आता एकत्र आलोय तर ही एकी कायम टिकवुन ठेवता आली पाहिजे. त्यासाठी एकजुट टिकवुन ठेवेल अशी नवी रचना स्विकारायला हवी.

मराठा मोनोपॉली राबवा – समाजात आपण अनेक उदाहरणे पाहत असतो. एखादा गुजर, मारवाडी व्यक्ती त्यांच्या समाजातील व्यक्तीला व्यवसाय उभा करण्यासाठी मदत करतो, बाजारपेठेत त्याला सेटल करतो. रमझानच्या उपवासाच्या महिन्यात सफरचंदाचे दर सर्वात कमी असतात, कारण गरीबात गरीब मुस्लीम व्यक्तीला ते खाता यावे. ही कम्युनिटी मोनोपॉली राबविण्यात मराठा कमी पडतो. एखाद्या मराठा समाजातील व्यक्तीने तयार केलेला २ रुपयांचा पेन जरी सगळ्या मराठ्यांनी विकत घेतला तर त्या मराठा पेननिर्मात्याचा पाच-दहा कोटींचा व्यवसाय होऊ शकेल, हे ढोबळ उदाहरणमात्र लक्षात येण्यासाठी पुरेसे आहे. मराठ्यांनी उद्योग, व्यवसाय, रोजगार अशा क्षेत्रात मराठा मोनोपॉली राबवायला हवी. आपला पैसा आपल्याच व्यक्तीच्या खिशात पर्यायाने आपल्याच समाजात कसा राहील याचाही विचार व्हावा.

वर दिले उपक्रम अंतिम नाहीत, तसेच त्यांची संख्याही वाढवता येईल. तसा प्रागतिक विचार करणाऱ्या नवीन लोकांनी पुढे येऊन ते मांडायला हवेत. हे उपक्रम आपल्याला यथाशक्ती, जमतील तसे बदल करुन राबविता येतील. सर्व समाजघटकांनी त्याचा विचार करावा. भविष्याची पायाभरणी करण्यासाठी काँक्रीट काम केल्याशिवाय गत्यंतर नाही.

एक मराठा लाख मराठा !

© लोकराज्य टीम.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top