शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील

शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापुर जिल्ह्यातील कुंभोज येथे झाला. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या महत्वपुर्ण योगदानामुळे सर्वसामान्यांचा शैक्षणिक विकास शक्य झाला.

छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यातील सर्वसामान्य लोकांना “रयत” संबोधुन त्या रयतेसाठी आपले आयुष्य वेचले. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सर्वसामान्य लोकांसाठी सुरु केलेल्या शिक्षणसंस्थेला “रयत शिक्षणसंस्था” नाव देऊन शिवरायांच्या कार्याला पुढे नेण्याचे काम केले. “छत्रपती शिवाजी कॉलेज” नावाची शिक्षणसंस्था उभी करुन तिच्याविषयी घडलेल्या एका प्रसंगात “प्रसंगी जन्मदात्या वडिलांचे नाव बदलीन पण संस्थेला दिलेले शिवरायांचे नाव कधीच बदलणार नाही” अशा आशयाचे उद्गार त्यांनी काढले.

राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात वसतिगृहांची संकल्पना राबवुन सर्वसामान्य घटकातील लोकांची शिक्षणाची सोय केली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या पत्नीचे मंगळसुत्र आणि दागिने मोडुन रयत शिक्षणसंस्थेचे वसतिगृह चालवले. महात्मा गांधींच्या हस्ते त्याचे नामकरण “श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस” असे करुन त्यांनी शाहूंचा सामाजिक विचार जपला.

महाराजा सयाजीराव गायकवाडांनी सर्वसामान्य घटकातील कित्येक विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणुन आर्थिक मदत केली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक खर्चही भागवता यावा यासाठी “कमवा आणि शिका” ही योजना राबवणारे देशातील पहिले “फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कुल” सातारा येथे सुरु केले आणि त्याला “महाराजा सयाजीराव हायस्कुल” हे नाव देऊन सयाजीरावांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

त्याशिवाय त्यांनी दुधगाव शिक्षण मंडळ, सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज, सद्गुरु गाडगेबाबा कॉलेज, मौलाना आझाद एज्युकेशन कॉलेज अशा शिक्षणसंस्था उभ्या करुन शिक्षणाची गंगा सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन गेले.

 

राष्ट्रसंत गाडगेबाबांनी त्यांना “कर्मवीर” ही पदवी दिली. “प्रत्येक खेड्यात शाळा असावी, महाराष्ट्रात एकही गाव विनाशाळेचे असु नये. शेतकऱ्यांच्या प्रत्येक नांगरापाठीमागे एक पदवीधर मनुष्य उभा राहिला पाहिजे” असे स्वप्न कर्मवीर अण्णांनी पाहिले आणि त्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिले. हे करत असताना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील होण्यासाठी कित्येक कार्यकर्ते तयार करण्याचे काम त्यांनी केले. आधुनिक महाराष्ट्राच्या शिक्षणाचा शिल्पकार असणारा हा ज्ञानवृक्ष ९ मे १९५९ रोजी पुण्यातील ससुन हॉस्पिटलमध्ये निधन पावला. त्यांच्या विचारांना आणि कार्याला शतशः नमन…

वाचा यशवंतराव चव्हाणांच्या नजरेतुन इतिहासाचे मर्म

© लोकराज्य टीम.