नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे काढावे ?

नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र म्हणजे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र. आरक्षणाचा लाभ समाजातील गरीब व गरजु लोकांनाच व्हावा या उद्देशाने वार्षिक उत्पन्न मर्यादेच्या आधारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र दिले जाते.

ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना आरक्षणाचा किंवा महिलांना महिला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी हे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बंधनकारक आहे. शासन निर्णयानुसार नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आता तीन वर्षांसाठी मिळणार आहे. त्यासाठी मागील तीनही वर्षातील प्रत्येक वर्षाचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी पुढील पायऱ्यांनी जा.
१) पुर्वतयारी – उत्पन्नाचा दाखला व रहिवासी पुरावा घेणे
२) आवश्यक कागदपत्रे जमा करणे
३) प्रक्रिया – सेतु केंद्रातुन नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढणे

१) पुर्वतयारी – उत्पन्नाचा दाखला व रहिवासी पुरावा घेणे

उत्पन्नाचा दाखला घेणे.
तहसील कार्यालयातुन मागील तीन वर्षांच्या उत्पन्नाचा दाखला घ्यावा.

(तहसील कार्यालयातुन उत्पन्नाचा दाखला कसा काढावा याबद्दल अधिक माहितीसाठी येथे Click करा.)

रहिवासी पुरावा घेणे
गावकामगार तलाठ्याकडुन तुमच्या नावाचा रहिवासी दाखला घ्यावा.

२) आवश्यक कागदपत्रे जमा करणे

● तहसील कार्यालयातुन मिळालेल्या उत्पन्नाचा दाखला

● रहिवासी दाखला (तलाठ्याचा)

● अर्जदाराचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र.

● ओळखीचा पुरावा (कोणताही एक) – तुमचा फोटो असणारे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्र यापैकी कोणत्याही एकाची साक्षांकित प्रत

● पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) – रेशनकार्ड, लाईट बिल, मिळकत कर पावती, ७/१२ किंवा ८अ उतारा, फोन बिल, पाणीपट्टी, घरपट्टी यापैकी कोणत्याही एकाची साक्षांकित प्रत

● विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर १०₹ चे कोर्ट फी स्टॅम्प/तिकीट आणि अर्जदाराचा फोटो

● उत्पन्नाबाबत १००₹ स्टॅम्प पेपरवर स्वयं घोषणापत्र/शपथपत्र/प्रतिज्ञापत्र
अ) अर्जदाराचे वय १८ वर्ष पुर्ण असल्यास त्याने स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने केलेले प्रतिज्ञापत्र.

● अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनफाईड सर्टिफिकेट (जन्मतारीख व जन्मस्थान यांचा उल्लेख आवश्यक)

(वरील कागदपत्रांची फाईल बनवुन त्याची साक्षांकित प्रत तयार करुन ठेवावी.)

३) प्रक्रिया – सेतु केंद्रातुन नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढणे

सेतु/नागरी सुविधा केंद्र/तहसील कार्यालयामधुन नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारा फॉर्म घ्यावा. त्यातील सर्व माहिती अचुकपणे भरुन तुमची सही करावी. त्यावर १०₹ किंमतीचे कोर्ट फी स्टँप/तिकीट लावावे. तुमचा फोटो लावावा. या फॉर्मसोबत वर यादीत दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत. हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला फॉर्म सेतु/नागरी सुविधा केंद्र/तहसील कार्यालयमध्ये जमा करावा. फॉर्म जमा केल्यावर पोचपावती/टोकन घ्यावे. सदर टोकन वर तुमचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळण्याची तारीख दिली जाते. हे टोकन जपुन ठेवावे आणि टोकनवर दिलेल्या दिवशी येऊन टोकन दाखवुन आपले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र घ्यावे. त्यावर तहसीलदाराची सही-शिक्का असल्याची खात्री करावी. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळाल्यावर त्याच्या आवश्यक तेवढ्या झेरॉक्स काढुन सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवाव्यात.

(कृपया परवानगीशिवाय हा मजकुर इतरत्र छापु नये.)

© लोकराज्य टीम.

Leave a Reply