कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र कसे काढावे ?

जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच जात वैधता (Cast Validity Certificate) प्रमाणपत्र. शासकीय नोकरी किंवा पदोन्नती, शासकीय योजना, शैक्षणिक प्रवेश, विविध शिष्यवृत्ती, स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षित जागांच्या निवडणुका इत्यादि कामांसाठी जात प्रमाणपत्रासोबतच जात पडताळणी प्रमाणपत्रही असावे लागते.

कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पुढील पायऱ्यांनी जा.
१) पुर्वतयारी – कुणबी जातीचे पुरावे गोळा करुन जात प्रमाणपत्र काढणे
२) आवश्यक कागदपत्रे जमा करणे
३) प्रक्रिया – जात पडताळणी समितीकडुन जात वैधता प्रमाणपत्र मिळवणे

पायरी १) पुर्वतयारी – कुणबी जातीचे पुरावे गोळा करुन जात प्रमाणपत्र काढणे

 कुणबी जात प्रमाणपत्र काढण्याची संपुर्ण प्रक्रिया जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.

● अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकांपैकी कुणाकडेही जात वैधता प्रमाणपत्र असेल तर जात पडताळणी समितीकडे ते प्रमाणपत्र सादर करुन अर्जदाराला त्याचे जात वैधता प्रमाणपत्र काढता येते. त्या प्रमाणपत्रावर समितीने कोणताही आक्षेप न घेतल्यास अर्जदाराला इतर नवीन कुठलेही पुरावे सादर करण्याची गरज नसते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सामाजिक न्याय विभागाने तसा निर्णय घेतला आहे.

पायरी २) आवश्यक कागदपत्रे जमा करणे

● अर्जदाराचे कुणबी जात प्रमाणपत्र व त्याची साक्षांकित प्रत

● उपलब्ध असल्यास अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्र.

● रहिवासी पुरावा – १३ ऑक्टोबर १९६७ किंवा त्यापुर्वीच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाचा लेखी पुरावा.

● अर्जदाराचा आणि अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनफाईड सर्टिफिकेट (त्यावर जन्मतारीख व जन्मस्थान यांचा उल्लेख आवश्यक)

● ओळखीचा पुरावा (कोणताही एक) – अर्जदाराचा फोटो असणाऱ्या आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्राची साक्षांकित प्रत

● पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) – रेशनकार्ड, लाईट बिल, मिळकत कर पावती, ७/१२ किंवा ८अ उतारा, फोन बिल, पाणीपट्टी किंवा घरपट्टीची साक्षांकित प्रत

● विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर १०₹ कोर्ट फी स्टॅम्प/तिकीट आणि अर्जदाराचा फोटो

● अर्जदाराचे स्वतःच्या कुणबी जातीच्या दाव्यासाठी जोडलेली कागदपत्रे आणि रक्तसंबंधातील ज्या नातेवाईकाचा कुणबी जातीचा पुरावा सादर केला आहे त्याच्यासोबत असणारे नाते दर्शवणाऱ्या वंशावळीबाबत १००₹ च्या स्टॅम्प पेपरवर स्वयं घोषणापत्र/शपथपत्र/प्रतिज्ञापत्र.

● १९२० पर्यंतची महसुली कागदपत्रे बहुतांशकरुन मोडी लिपीतील असतात. अर्जदाराने जातीचा पुरावा म्हणुन सादर केलेले कागदपत्र जर मोडी लिपीतील असेल तर त्या कागदपत्राचे शासन मान्यताप्राप्त मोडी लिपी वाचकाकडुन मराठीत भाषांतर केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे आणि त्यात दिलेल्या माहितीबाबत १००₹ च्या स्टॅम्प पेपरवर स्वयं घोषणापत्र/शपथपत्र/प्रतिज्ञापत्र तयार करावे.

● एखाद्याच्या कागदपत्रातील नावात किंवा आडनावामध्ये किरकोळ बदल, वगैरे असल्यास त्याबाबत १००₹ स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार करावे.
(वरील कागदपत्रांची व्यवस्थित फाईल तयार करावी. त्याच्या आवश्यक तेवढया सत्यप्रती (True Copy) तयार करुन ठेवाव्यात.)

पायरी ३) प्रक्रिया – जात पडताळणी समितीकडुन जात वैधता प्रमाणपत्र मिळवणे

अ) विद्यार्थी – अर्जदाराने जर ११ वी, १२ वी विज्ञान शाखेतील किंवा इंजिनिअरिंग, मेडिकल, ऍग्री वा तत्सम व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल तर त्याला जात पडताळणीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत असणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण (BARTI) संस्थेच्या https://barti.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन CCVIS Website या लिंकवर क्लिक करुन ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची मार्गदर्शिका वेबसाईटवर देण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट घ्यावी, त्यावर आपला फोटो लावावा. त्यासोबत आपल्या कॉलेजच्या प्राचार्यांचे प्रमाणपत्र, बोनफाईड सर्टिफिकेट घ्यावे. त्यासोबत वर दिलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत. या सर्व कागदपत्रांची फाईल बनवुन ठेवावी.
विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा नमुना क्र.१६
कागदपत्रांबाबत शपथपत्राचा नमुना क्र.१७
वंशावळीबाबत शपथपत्राचा नमुना क्र.३
या सर्वांचे नमुने बार्टीच्या वेबसाईटवर CCVIS लिंकवर देण्यात आले आहेत.

ब) शासकीय/निमशासकीय सेवेतील कर्मचारी शासकीय/निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्याने सुद्धा या वेबसाईटवर जाऊन CCVIS Website लिंकवर क्लिक करुन ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट घ्यावी. त्यावर आपला फोटो लावावा. त्यासोबत ज्या शासकीय/निमशासकीय कार्यालयात सेवेत आहात तिथल्या नियुक्ती प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घ्यावे. त्यासोबत वर दिलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत. या सर्व कागदपत्रांची फाईल बनवुन ठेवावी.
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अर्जाचा नमुना क्र.१८
कागदपत्रांबाबत शपथपत्राचा नमुना क्र.१९
वंशावळीबाबत शपथपत्राचा नमुना क्र.३
या सर्वांचे नमुने बार्टीच्या वेबसाईटवर CCVIS लिंकवर देण्यात आले आहेत.

क) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी – निवडणुकीत ओबीसी आरक्षित जागेसाठी आपला नामांकन अर्ज दाखल करताना अर्जासोबत आपले जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र जोडावे लागते. जात पडताळणी प्रमाणपत्र नसेल तर त्यासाठी जिल्हा जात पडताळणी समितीकडे अर्ज केल्याची पोचपावती/टोकन जोडावे. निवडणुक निकालाच्या तारखेपासुन सहा महिन्यांच्या आत आपले जात पडताळणी प्रमाणपत्र संबंधित निवडणुक अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते, अन्यथा आपले सदस्यत्व आपोआप संपुष्टात येते. त्यासाठी निवडणुक जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी त्वरित जात पडताळणीसाठी आवश्यक असणारा विहित नमुन्यातील अर्ज भरावा, त्यावर आपला फोटो लावावा. त्यासोबत जिल्हा निवडणुक अधिकाऱ्याचे निवडणुकीबाबत प्रमाणपत्र घ्यावे. त्यासोबत वर दिलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत. या सर्व कागदपत्रांची फाईल बनवुन ठेवावी.
उमेदवारासाठी अर्जाचा नमुना क्र.२०
कागदपत्रांबाबत शपथपत्राचा नमुना क्र.२१
वंशावळीबाबत शपथपत्राचा नमुना क्र.३
या सर्वांचे नमुने बार्टीच्या वेबसाईटवर CCVIS लिंकवर देण्यात आले आहेत.

ड) इतर कारणासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र हवे असल्यास – विहित नमुन्यातील अर्ज भरावा, त्यावर आपला फोटो लावावा. त्यासोबत ज्या आस्थापन/संस्थेकडुन लाभ मिळणार आहे त्यांचे प्रमाणपत्र घ्यावे. त्यासोबत वर दिलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत. या सर्व कागदपत्रांची फाईल बनवुन ठेवावी.
इतर कारणासाठी अर्जाचा नमुना क्र.२२
कागदपत्रांबाबत शपथपत्राचा नमुना क्र.२३
वंशावळीबाबत शपथपत्राचा नमुना क्र.३
या सर्वांचे नमुने बार्टीच्या वेबसाईटवर CCVIS लिंकवर देण्यात आले आहेत.

विद्यार्थी, शासकीय सेवेतील कर्मचारी, निवडणुकीत आरक्षित जागेवर उभे असणारे उमेदवार किंवा इतर कारणासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असणाऱ्यांनी आपली कागदपत्रे जोडलेली फाईल व विहित नमुन्यातील अर्ज आपल्या जिल्हा जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जाऊन स्वतः दाखल करावा. विहित शुल्क जमा करुन अर्ज दाखल केल्याची पोचपावती/टोकन घ्यावे. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळेपर्यंत ही पोचपावती/टोकन जपुन ठेवावे.

जिल्हा जात पडताळणी समिती कार्यपद्धती
अ) समितीला अर्ज प्राप्त झाल्यानंतर समिती संबंधित अर्जात भरलेली माहिती, जोडलेली कागदपत्रे आणि शपथपत्रे विहित पद्धतीत आहे का नाहीत, कायमस्वरुपी वास्तव्य, जातीचे पुरावे, वंशावळ, प्रमाणपत्रे यांची सखोल छाननी करते. कागदपत्रांच्या सत्यतेबाबत खात्री पटल्यास इतर कोणतीही चौकशी न करता अर्जदाराला जात पडताळणी प्रमाणपत्र वितरित करते.

ब)
अर्जात त्रुटी किंवा कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्याबाबत अर्जदाराला कळविण्यात येते.

क) समितीला छाननीमध्ये अर्जदाराच्या कागदपत्रांची खातरजमा होत नसेल तर समिती सदर प्रकरण अधिक चौकशीसाठी दक्षता पथकाकडे पाठवते.


ड) दक्षता पथक –
दक्षता पथक अर्जदाराने अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या अनुषंगाने गावात किंवा घरी जाऊन रहिवाशांकडे, कुटुंबीयांकडे गृहचौकशी व शालेय चौकशी करते. जातीच्या प्रथा, रुढी, परंपरा, देवदेवता, जन्ममृत्यु व विवाह विधी याबाबतही चौकशी करुन साक्षीपुरावे व जबाब नोंदवले जातात. दक्षता पथकाला गरजेचे वाटल्यास ते अर्जदाराने संबंधित कागदपत्रे ज्या कार्यालयांतुन प्राप्त केली, त्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांच्या सत्यतेविषयी खात्री करते. आपला अहवाल तयार करुन जात पडताळणी समितीला पाठवला जातो. या अहवालाचा अभ्यास करुन समिती अर्जदाराच्या अर्जावर निर्णय घेते.

इ) दक्षता पथकाच्या अहवालावरुनही खात्री न पटल्यास समिती अर्जदाराला कारणे दाखवा नोटीस पाठवुन जातीचा दावा सिद्ध करण्यास सांगते. सोबत दक्षता पथकाचा अहवालही पाठवते. अर्जदाराच्या अर्जावर सुनावणी घेतली जाते. त्यात अर्जदाराची मुलाखत घेतली जाते किंवा त्याच्या वकीलामार्फत अर्जदाराचे म्हणणे लेखी व तोंडी नोंदवुन घेतले जाते. अर्जदाराचा अर्ज, त्याने सादर केलेली कागदपत्रे, दक्षता पथकाचा अहवाल, सुनावणीवेळी दिलेले लेखी व तोंडी म्हणणे आणि संदर्भासाठी तत्सम विविध न्यायनिवाडे, निकाल यांचा आधार घेऊन समिती आपला अंतिम निर्णय देते. सदर निर्णयही अर्जदाराला मान्य नसल्यास त्याला फक्त मुंबई उच्च न्यायालयात याविषयी अपील करता येते. या अपीलावर एका महिन्यात निर्णय दिला जातो.

(हेल्पलाईन – १८००२३३०४४४)

(कृपया परवानगीशिवाय मजकुर इतरत्र छापु नये. आपल्या प्रतिक्रिया लोकराज्य फेसबुक पेज इथे द्याव्यात.)


© लोकराज्य टीम.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top