शिवरायांना जगातील ५८ देशांत पोहोचवणारी मोहीम

छत्रपती शिवराय हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते होते ही गोष्ट आता सर्वमान्य झाली आहे. शिवरायांच्या राजमुद्रेतील “विश्ववंदिता” ही अक्षरं खरी ठरली आहेत. अशा महान राजाची जयंती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी २०१६ मध्ये शिवप्रेमींनी “#DoodleOfShivray” ही मोहिम फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल माध्यमांत राबविली. या मोहिमेने अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करुन दाखवल्या. जाणुन घेऊया “डुडल ऑफ शिवराय” मोहिमेबद्दल…

अमित वानखेडे, अरणी (यवतमाळ) DoodleOfShivray मोहिमेचे जनक

गुगल या जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सर्च इंजिनच्या मुख्य पानावर वेगवेगळ्या व्यक्तींचे डुडल लावुन गुगलकडुन त्यांना मानवंदना दिली जाते. अशीच मानवंदना शिवरायांनाही दिली जावी आणि १९ फेब्रुवारी २०१६ रोजी शिवजयंतीनिमीत्त शिवचरित्राशी संबंधित डुडलही लावला जावा या उद्देशाने यवतमाळच्या अरणी येथील अमित वानखेडे या शिवप्रेमीने ६ फेब्रुवारी २०१६ रोजी DoodleOfShivray मोहीम सुरु केली.

फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मिडीयावरील हॅशटॅग ट्रेंड, Change.org वेबसाईटवरील पिटीशनच्या सह्यांची संख्या आणि गुगलला पाठवण्यात आलेले इमेल्स यांच्या एकत्रित संख्येची आकडेवारी करुन डुडल संबंधी निर्णय घेतला जाणार होता. हातात केवळ तेरा दिवस होते. तरीसुद्धा केवळ जबरदस्त इच्छाशक्ती उराशी बाळगुन गुगलच्या माध्यमातुन छत्रपती शिवरायांना जगात पोहोचवण्यासाठी वानखेडेंनी ही मोहीम सुरु ठेवली.

सुरुवातीला त्यांनी Change.org/shivajidoodle वेबसाईट लिंकद्वारे ऑनलाईन सह्यांसाठी पिटिशन सुरु केली. तसेच फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मिडीयावरील नेटिझन्सना पोस्ट करताना DoodleOfShivray हा हॅशटॅग वापरुन पोस्ट करण्याचे आवाहन केले. अशा प्रकारची जास्त माहिती लोकांना नसल्यामुळे सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाला. परंतु वानखेडे थांबले नाहीत, त्यांनी आपल्या सोशल मिडीयावरील मित्रांना सोबत घेऊन मोहिमेची माहिती सर्वांना समजावुन सांगितली. नंतर जसजशी १९ तारीख जवळ येऊ लागली तसतसा या मोहिमेला थक्क करणारा प्रतिसाद मिळु लागला.

१८ फेब्रुवारी २०१६ रोजी दस्तुरखुद्द गुगल इंडिया कडुन या मोहीमेला हिरवा कंदील मिळाला आणि त्यांनी डुडल ऑफ शिवराय बद्दल सर्व माहिती पुढे गुगलच्या अमेरिकेतील मुख्य कार्यालयास पाठविली. परंतु तोपर्यंत थोडा उशीर झाला होता. गुगलच्या मुख्य कार्यालयात आपली मागणी पोहोचेपर्यंत १९ तारीख उजाडली होती. एकंदर ही मोहीम अंशतः अपुर्ण राहिली असली तरी या मोहिमेने अत्यंत दखलपात्र असा ठसा उमटवला आहे. केवळ तेरा दिवसातच या मोहीमेने गाठलेले काही मैलाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत.

असा असतो Doodle

१) फेसबुक सारख्या जगातील सर्वात मोठ्या सोशल नेटवर्किंग साईटवरती १९ फेब्रुवारी २०१६ रोजी शिवजयंती हा विषय DoodleOfShivray या हॅशटॅगच्या माध्यमातुन ट्रेंडिंगमध्ये म्हणजेच फेसबुकवर त्या दिवशी जगभर कशाची चर्चा चालु आहे याच्या सुचीमध्ये जगभरात दिवसभर पहिल्या स्थानी राहिला. शिवजयंती वैश्विक होत असल्याचे ते द्योतक आहे.

२) ही ऑनलाईन पिटीशन जगातील ५४ देशांत पोहोचली आणि केवळ तेरा दिवसात या पिटीशनला १००००० (एक लाख) हुन अधिक लोकांनी भेट दिली आणि त्यात आपला सहभाग नोंदवला.

३) फेसबुक, ट्विटर या सोशल साईट्सवरच्या पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या DoodleOfShivray या हॅशटॅगची संख्या कोटींच्या घरात होती.

४) भारतातील आतापर्यंत सर्वात जास्त सह्या झालेली पिटिशन (३३४३२ सह्या) म्हणुन या पिटिशनने भारतातील नवा विक्रम स्थापन केला होता. त्यापुर्वी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या घराला राष्ट्रीय स्मारक म्हणुन घोषित करण्यासाठी ३२२०० लोकांनी पिटिशन सह्या केल्याचा उच्चांक होता.

५) गुगल इंडियाच्या [email protected] या इमेल आयडी वरती शिवप्रेमींनी सह्या केलेल्या पिटिशन इतकेच म्हणजे जवळजवळ ३३००० इमेल्स पाठविले होते. हा सुद्धा एक विक्रमच होता.

६) जगातील काही प्रमुख प्रिंट मिडियाबरोबरच भारतातील प्रमुख प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, मॅगेझीन्स सोबत लोकल मिडियातुनही दहा दिवस हा विषय चर्चेत राहिला. त्यांनी या मोहिमेला प्रसिद्धी देऊन सहकार्य केले.

७) महाराष्ट्रातील प्रसिद्ध सिनेकलाकार, राजकीय नेते, खेळाडु तसेच सेलिब्रिटींनीही आपापल्या फेसबुक, ट्विटर पेजेसवरुन ट्रेंड करुन करोडो चाहत्यांपर्यंत ही मोहीम पोहोचवली.

८) १४ फेब्रुवारी २०१६ यादिवशी बाकीचे लोक एकीकडे व्हॅलेंटाईन दिवस साजरा करत असताना अख्ख्या महाराष्ट्रातील शिवप्रेमी शिवरायांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवसभर डुडल ऑफ शिवराय ही मोहीम राबवत होते. हे या मोहिमेचे नैतिक यश ठरले.

९) डुडल ऑफ शिवराय मोहिमेवेळी तारीख-तिथी वाद, जात-धर्म, पक्ष-संघटना विसरुन  सर्व शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे या सहभाग घेतला. शिवप्रेमींची ही समाधानकारक एकी यानिमित्ताने पहिल्यांदाच पहायला मिळाली. यातुनच शिवराय आणि शिवजयंती ग्लोबल होत आहे.

१०) शिवजयंती आणि शिवरायांना ग्लोबल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमित वानखेडे यांच्या कार्यांबद्दल छत्रपती शिवरायांचा जगातील पहिला पुतळा असणाऱ्या शिवाजीनगर (पुणे), महात्मा फुलेंनी जिथुन जगातील पहिली शिवजयंती सुरु केली त्या हिराबाग चौक (पुणे) या ठिकाणी तसेच स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांच्या वारसदारांकडुन पुण्यात शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या स्वराज्यरथ सोहळ्यात जंगी सत्कार करण्यात आला.

माध्यमांनी घेतलेली दखल

कल्पना साधीच होती परंतु इच्छाशक्तीचे पंख आणि प्रयत्नांची जोड या बळावर ही कल्पना शिवरायांना जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन गेली. आपण सर्वजण आजपर्यंत भाषणातच ऐकत आलो की शिवरायांना जागतिक करुया, परंतु या मोहिमेने कृतीतुन ते करुन दाखवल्यामुळे तिचे वेगळे महत्व आज प्रस्थापित झाले आहे.
लेखन – अनिल माने.

वाचा
१) शिवजयंतीचा वाद निर्माण करणाऱ्यांना महाराजांचे पत्र 

२) शिवराज्याभिषेकासाठी ६ जुन हा दिवस का निवडला ? 

३) शिवरायांच्या कुटुंबातील दुर्लक्षित व्यक्तिरेखा

© लोकराज्य टीम.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top