शेतकऱ्यांची शेतातली शापीत पोरं

प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांनी अवश्य वाचावं असं काहीतरी…

याला भरपुर अपवादही असतील किंवा त्या अपवादानेही किंचीतसं हे अनुभवलं असेल. हा विषय शेतीचा आहे अन् अकालीच म्हातारपण आलेल्या शेतकरी मुलांचा आहे.

शेतकरी मग तो कुण्याही गावातला असुद्या, कधीकाळी सुखी होता. खुप अलीकडचा १९९० च्या दशकातला काळ जरी आठवला तरी भरपुर शेती, माळवदी वाडे, मोठ्या पडव्या, आडं, बळद, चोपा, गुरेढोरे, घराघरात धान्याच्या कणगी, दुधाच्या आडी, परसात भरपुर भाजीपाला हे सगळं आठवतं. भौतिक सुखासोबत मानसिक  समाधान ही होतं. जिवनात इरस होती पण जिवघेणी स्पर्धा नव्हती. त्यामुळे आत्महत्यांचं प्रमाण कमी होतं. माणसं नैसर्गिक जगायचे अन् नैसर्गिक मरायचे. पुस्तकी अज्ञान असेल पण किमान जिवनाचं गणित सुटायचं.

हे चित्र आता धुसर झालं. आताही वयोवृद्ध शेतकऱ्यांना ह्या आठवणी सांगु वाटतात. तेव्हाचा पाऊस, तेव्हाची एकत्र कुटुंबपध्दती (खटलाचं घर), तेव्हाची ऊसाची गुऱ्हाळं आणि तेव्हाची ईमानदार माणसं हे सर्व आता चित्रपटात पाहिल्यासारखं वाटतं.

आपल्या भविष्याची काही चिंता नाही असं त्यावेळी शेतकरी मुलांना स्पष्ट दिसायचं. पण आता शेतकऱ्यांच्या लेकरांवर आई जेवु घालेना अन् बाप भिक मागु देईना अशी वेळ आली आहे. पुर्ण आत्मविश्वास हरवुन हे आत्महत्यांच्या परंपरेचे वारस, मरण्याची हिंमत नसल्यामुळे जिवंतपणाचं ओझं वागवत आहेत.

गावा गावात असे भरपुर चेहरे आढळतील जे स्वप्नांचा चुराडा झाल्यामुळे कसल्याही स्पर्धेत न पडता एकाएकी निरासक्त झाले आहेत. धावत्या जगासोबत धावताना त्यांना काहीतरी आडवतं. ते काय आहे हाच प्रश्न आहे.

आपल्याकडे सत्ता असावी असं साऱ्यांना वाटतं. मग त्यांच्या त्यांच्या लेवलवर कुणाला देशाची, कुणाला राज्याची, कुणाला तालुक्याची, कुणाला गावातली आणि कुणाला घरातली सत्ता हवी असते. ही नैसर्गिक भावना आहे. मोठा भाऊ लहान भावावर सत्ता गाजवतो. काहीतरी करुन दाखवल्याशिवाय हा सत्तेचा सोपान भेटत नाही. फक्त समाजासाठीच नाही तर स्वतःसाठी, स्वतःच्या मनाला उभारी देण्यासाठी देखील काही तरी करणं हे गरजेचं आणि जगण्यास कारण देणारं असतं. पण काहीजणांवर अशी वेळ येते की ते शेतातलं बुजगावणं होवुन जातात.

चार रुपयाचा किसान तोटा घ्यायचा म्हणला तर दहा एकरच्या मालकाच्या पोराला दुकानदाराकडे लाजुन लाचार होवुन उधारी करावी लागते. स्वतःच्या घरामध्ये पैसे ठेवण्याची सर्व गुप्त ठिकाणे याला माहित असतात, साखरेच्या डब्यात, डाळीच्या डब्यात आईने जपुन ठेवलेले पैसे चोरण्याचे अजबगजब किस्से असतात. आजच्या डिजीटल काळात पिशवीमध्ये शेरभर धान्य विकायला आणुन चिरीमिरी हौस भागवणारे बळीराजाचे शापीत पुत्र पाहिले की मन सुन्न होतं. पैसा नसणाऱ्याला ना घरात किंमत रहाते ना समाजात. पैसा येतो काही तरी प्रयत्न केल्यास, प्रयत्न करण्यासाठी लागतं स्वातंत्र्य आणि शेतकऱ्यांच्या पोरांस्नी स्वातंत्र्यच नाही. कारण स्वातंत्र्य देण्यासाठी त्याला अक्कल नाही अशी त्यांच्या पिताश्रींची (गैर)धारणा. मग हा राग अगदी प्रेमळपणाने आमचा म्हातारा, डंगरं डुंगरं अशी पाठीमागे संबोधनं सुरु होतात. जेंव्हा नोकरदाराची पोरं दहावीलाच टु व्हिलर घेवुन फिरतात तेव्हा हा तुटका चप्पल लेवुन भटकत असतो एसटीने, वायरची पिशवी हातात घेवुन. ग्यानगेलीपणाचा प्रवास इथुनच सुरु होतो.

या शापीताचा पहिला संघर्ष घरातुन सुरु होतो. सुरुवातीला लाड होतो. तो लाड काहीच करु देत नाही. जेव्हा काही करुन दाखवण्याची इच्छा होते, तेव्हा शेतात काबाडकष्ट करावे लागते. कुठली नवीन कल्पना शेतीत मांडली की घरात स्विकारली जात नाही. कारण पिढीतला संघर्ष. त्यात पुन्हा दुष्काळ, भाव नसणे, हजारो सण, सांस्कृतिक गुलामगिरी या सगळ्यांचा परिपाक म्हणजे आर्थिक अराजकता. देशात आर्थिक आणीबाणी कधी लागु झाली नाही पण यांची आर्थिक आणीबाणी कधी संपलीच नाही. अगोदर विरोध करणारं घर आता एकाएकी कुजवुन कुजवुन काहीतरी कर म्हणुन मागे लागतं. आता हजारो स्वप्नांचा चुराडा होऊन उत्साह संपल्यावर याची अशीही काही करण्याची इच्छाच उरत नाही. विद्रोह करण्याची ताकद होत नाही कारण संस्कार तसे शिकवित नाहीत. बरेच जण बंड करुन शहराची वाट धारतात आणि आयुष्यात काही करुन दाखवितात.

एका नामांकित शेतकरी पुढाऱ्याचा ३८ वर्षाचा फक्त खिशाला पेन आडकावुन मारुतीच्या पारावर विचार करत बसलेला मुलगा मी पाहिला आहे. मोठ्या झाडाच्या सावलीखाली लहान झाडे येत नाहीत तसा हा निष्क्रिय राहिला. हा कधीच चुकणार नाही कारण याला व्यवहार कधी कोण शिकु देणारच नाही. आयुष्यात काही वाईट केलं नाही एवढाच काय तो आनंद. वारसाहक्काने मिळालेली अन् उरलेली थोडीफार जमीन हा वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी स्वतःच्या नियोजनाने कसणार ! म्हणजे अगोदरची पिढी येणाऱ्या पिढीला पुर्णपणे संपवल्याशिवाय रिटायर्ड होणारच नाही आणि या लाडक्या मांजराच्या हातामध्ये व्यवहार देणारच नाही.

लाडकं मांजर म्हणण्याचे कारण…एका लहान मुलाला एक मांजर खुप प्रिय होतं. आपल्या मांजराला एखादं कुत्र खाऊन टाकेल म्हणुन ते मांजर नेहमी जवळच मिठीत घेऊन ठेवायचं. जगाच्या भीतीने त्या मांजराला कधी खाली सोडलंच नाही. अतिप्रेमाने अतीमिठी मारल्याने त्या लहान मुलाला हे समजलंच नाही की ते मांजर श्वास घ्यायला न मिळाल्यामुळे मरुन गेलं. अशी अवस्था आहे गावाकडच्या कष्टकरी मुलांची.

शाळेत असल्यापासुनच सगळी मुलं सहलीचं नियोजन करायले तर हा उठुन जातो कारण त्याला माहीत असते की घरुन सहलीसाठी पैसे मिळणार नाहीत. पार्टी करताना फुकट्या म्हणुन त्याची हेटाळणी ठरलेली असते. लग्नाच्या बाजारात तर शेतकऱ्याचं पोरगं बेकिंमतच. मुलीकडचे त्याला नाही, शेती बघायला अगोदर येतात. शेतकरी नवरा हा बदनाम शब्द. असं मानसिक, आर्थिक, सामाजिक खच्चीकरण होऊन उरतो फक्त थंड हाडामासाचा जिवंत वाटणारा गोळा. वर्षानुवर्षे अंधारकोठडीत राहिलेल्यांना जसा प्रकाश सहन होत नाही तसं बौध्दिक विचार यांना भावत नाहीत. कुजुन मरण्यापेक्षा झिजुन मेलेलं केव्हाही चांगलं असतं. कांगारु जन्मलेल्या पिलाला जन्म होताच लाथ मारुन पळायला शिकवतं कारण हे जग गोल नाही, चपटं नाही तर हरामखोर आहे. इथे प्रत्येकजण शिकार तरी होतो किंव्हा शिकारी तरी होतो.

बांधावरुन किंवा कुठल्याही किरकोळ कारणावरुन शेजाऱ्याशी जेंव्हा भांडण होतं तेंव्हा ते भांडताना त्या भांडणाचं कारण हे दहा टक्के तर आयुष्याची निर्रथकता नव्वद टक्के वाटा उचलते. म्हणुन ते भांडण जास्त हिंस्र होतं. हीच मानसिकता मोठी मोठी होत आत्महत्येपर्यंत पोहचते.

इकडे जागतिकीकरण, खाजगीकरण सोडा बाजारभाव अन् ऋतुमानाच्या पुढे अभ्यास गेलेला नसतो. पण टीव्हीवरच्या मालिका चित्रपट अन् शहरी नोकरदारांचा उच्च राहणीमानाचा झिरपता सिध्दांत मनामध्ये असंतोष मुरवतो. तो गाठण्याचा मृगजळी प्रयत्न अन् खच्चीकरणातुन निर्माण झालेलं न्युनगंड सांभाळत हा संघर्ष चाललेला असतो.

पुण्यामुंबईकडे गेलेला आणि तिकडेच स्थायिक झालेला  एखादा भाऊ असेल तर तो गावाकडच्या या शेतकरी भावाला तुच्छ समजतो. त्याला पहिल्यापासुनच अक्कल नाही असं बिरुद लावतो. हा शेतातला भाऊ लहाणपणापासुन कष्ट करुन दुसऱ्या भावाच्या शिक्षणासाठी हातभार लावतो आणि शेवटी चित्रपटातल्या राजेश खन्नासारखा याला ही न्याय मिळत नाही. असे कितीतरी राजेश खन्ना आपल्याला जागोजागी आढळतात. त्यांच्या कथेला चेहरा नसतो. बुड ही नसतं अन् शेंडाही नसतो. असते फक्त निशब्दता .

असामान्यत्वाकडुन अतिसामान्यत्वाकडे होणाऱ्या या प्रवासात तो कोणालाही दोषी ठरवत नाही. कारण आपण खुप काही करु शकत नाही हे त्यानं स्विकारलेलं असतं. बारोमास तग धरणे हाच पर्याय रहातो. मग म्हशी राखण्यातलं छोटं छोटं अर्थशास्त्र अनुभवत चिल्लर मोजण्याऐवढा शहाणपणा तरी नियती त्याच्या उतारवयापर्यंत त्याला बहाल करते.
लेखक – जगदिश पाटील (7517772019)
कुणबी दाखला काढण्याची संपुर्ण प्रक्रिया वाचा.
संकलन – लोकराज्य टीम.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top