कॉम्रेड शरद पाटील

भारतीय साहित्य क्षेत्रातील प्रस्थापितांनी मांडलेल्या इतिहासाला संशोधनपुर्वक सत्याचे धक्के देत इतिहासाची नव्याने आणि अधिक उचित मांडणी करण्याचे महान क्रांतिकारक कार्य करणाऱ्या कॉम्रेड शरद पाटील यांचा १७ सप्टेंबर हा जन्मदिवस !

खरे तर त्यांच्यासारखा “साहीत्यसूर्य” जरी मावळला असला तरी मावळण्यापुर्वी या सूर्याने आपल्या लेखणीच्या प्रकाशाने अनेक नवसाहित्यिकांसाठी साहित्य क्षेत्रातील प्रतिगामी अंधकार दुर करुन संशोधक वृत्तीचा सूर्योदय सुध्दा केला आहे. त्यांच्या लेखणीने दिलेले बळ इतके आहे की साहित्य क्षेत्रातील कोणत्याही संकटाचा मुकाबला करुन त्या संकटावर मात करण्याची पात्रता आमच्या अंगी आली आहे.

जीवनक्रम
कॉम्रेड शरद पाटील यांचा जन्म – 17 सप्टेंबर 1925 रोजी धुळे जिल्ह्यातील कापडणे तालुक्यात एका सत्यशोधक कुटुंबात झाला. 1942 ला ते मेट्रिक उत्तीर्ण झाले. 1942-43 त्यांनी कलाभवन वडोदरा येथे चित्रकला शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेतला 1943-45 मध्ये ते जे.जे.स्कुल ऑफ आर्ट ,बॉम्बे मधे दाखल झाले.

1945-47 मध्ये महायुध्दोत्तर पहिल्या देशव्यापी विद्यार्थी संपात ते सहभागी झाले.त्यानंतर शिक्षण सोडून ते कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयात चित्रकार म्हणून कार्यरत झाले. 1947-49 मधे त्यांनी ट्रेड युनियन फ्रंट,धुळे मधे काम केले. 1949-50 ते हद्दपार राहिले. 1951-56 त्यांनी शेतकरी चळवळीत काम केले. 1956 नंतर त्यांनी आदिवासी लोकांसाठी चळवळीत काम केले ते मृत्युपर्यंत. 1964 मध्ये कम्युनिस्ट पक्ष दुभंगल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले.

1966 मधे दोनदा तुरुंगवास भोगून सुटल्यानंतर बडोद्यात संशोधनासाठी व संस्कृत (पाणिनी) व्याकरण शिकण्यासाठी त्यांनी वास्तव्य केले. 1971-72 मधे त्यांनी “दास शुद्रांची गुलामगिरी” हा ऐतिहासिक ग्रंथ लिहला. 1978 मधे जाती व्यवस्थे विरोधात लढायला माकप ने नकार दिल्याने त्यांनी माकप चा राजीनामा दिला आणि मार्क्सवाद- फुले-आंबेडकर तत्त्वावर आधारलेला “सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष” त्यांनी स्थापन केला. 1982 ते 1993 पक्ष आपल्या पक्षाचे मुखपत्र “सत्यशोधक मार्क्सवादी” चे बारा वर्ष संपादन केले. 1987 मधे साक्री येथील दलित-आदिवासी-ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलन घेउन ते “नामांतर कृती समिती” मधे सहभागी झाले. 1994-95 त्यांनी “जातिव्यवस्थापक सामंती सेवकत्व, खंड 2” चे लेखन केले. त्यांचा मृत्यु 11 एप्रिल 2014, धुळे येथे झाला.

कार्य
गोतम बुध्दांनंतर Diloctical Logic ( तर्कशुद्ध युक्तिवादशास्त्र ) प्रथमच मांडणारे अत्यंत अभ्यासु जागतिक विचारवंत अशी त्यांची ओळख आहे. त्यांचे साहित्य अनेक देशी-विदेशी विद्यापीठांमधे विश्वासु संदर्भ साहित्य म्हणुन अभ्यासक्रमात वापरले जाते. कॉम्रेड शरद पाटील यांनी महाराष्ट्र आणि भारताच्या विचार विश्वाला कलाटणी देणारी अतुलनीय अशी विचारसंपदा निर्माण केली. त्यांनी भारतीय इतिहासाची नव्याने मांडणी करून नवे सामाजिक आणि राजकीय संदर्भ निर्माण केले.

मुळचे चित्रकार असणाऱ्या कॉ.पाटलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा संबंध डाव्या चळवळीशी आला, त्यानंतर आयुष्यभर त्यांनी पुरोगामीत्वाचा पुरस्कार केला. जातिव्यवस्था अंताच्या प्रश्नाला भारतीय राजकीय विचारधारेच्या केंद्रस्थानी आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. भारतातील जवळपास बहुतेक सर्व नामवंत विद्यापीठांत वेगवेगळे शिबिर आणि सभांद्वारे त्यांनी प्रबोधन केले.

प्राचीन भारताच्या इतिहास अभ्यासाची एक नवीसंशोधन पद्धती त्यांनी पुढे आणली. त्यांनी समाजात परिवर्तन करु इच्छिणाऱ्या नवलेखकांन नवविचारांची साधने दिली. भारतीय प्रबोधनाचे शस्त्रागार अभ्यासकांना दिले. जाती वर्चस्ववादी पितृसत्ताकता यांच्या प्रभावातून इतिहासलेखनास मुक्त करण्याचे महत्कार्य त्यांनी केले. शिवराय, मार्क्स, महात्मा फुले, शाहु महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे खरे वारसदार म्हणून त्यांनी साहित्य, धर्म, विचारप्रणाली आणि संस्कृती यांच्या संदर्भात नवे सिद्धांत मांडले. त्यांनी केलेली मांडणी इतकी अभ्यासपुर्ण आहे की त्या मांडणीचे खंडन एकाही परीवर्तन विरोधी गटाला करता येणार नाही.

मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद आणि “दासशुद्रांची गुलामगिरी’ अशा ग्रंथांतून आणि “सत्यशोधक मार्क्सवादी’ या मासिकातून त्यांनी जातिव्यवस्थेचा प्रश्न सामाजिक चर्चेच्या आघाडीवर आणण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य केले. त्यांच्या “जातीय सामंती सेवकत्व’ आणि “भांडवली लोकशाही क्रांती आणि तिची समाजवादी पूर्ती” यांसारख्या ग्रंथांच्या माध्यमातुन भारतातील लोकशाही क्रांतीची नवी कार्यक्रमपत्रीका त्यांनी पुढे आणली.

चळवळी
कॉ.पाटलांच्या राजकीय कार्यामधील एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण चळवळींचा उगम त्यांच्या पासुन झाला. महाराष्ट्रातील पहिली धरणग्रस्तांची चळवळ उकाई धरणाच्या निमित्ताने त्यांनी यांनी उभी केली. आज आदिवासी भूमिहीनांसाठी शासनाने वनकायदा पुढे आणला आहे. त्या कायद्यासाठी भारतातील पहिली न्यायालयीन लढाई सुप्रिम कोर्टात कॉ.शरद पाटील आणि त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी लढली. त्यासाठी नंदुरबार,साक्रीच्या आदिवासींच्या जनचळवळींनी वनकायद्यासाठी आवश्यक ती पार्श्वभूमी उभी केली. आदिवासींचा आर्थिक लढा आणि नामांतराचा जातीविरोधी लढा यांच्या एकजुटीतून परिवर्तनासाठी संयुक्त चळवळ उभी करण्याचा पहिला प्रयत्न हा धुळे जिल्ह्यातून पुढे आला. शेतकऱ्यांच्या आर्थिक लढ्यात स्त्रीसमतावादी लढ्याची दिशा देण्यासाठी पिंपळनेर ते चांदवड असा स्त्रियांचा महामोर्चा सत्यशोधक कष्टकरी महिला सभेने संघटित केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे याकरिता सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षातर्फे लॉंग मार्च काढून त्यांनी आदिवासींना नामांतराच्या चळवळीचा भाग बनविले. महाराष्ट्रातील साहित्य संमेलन चळवळींच्या सहभागातून संयुक्त साहित्य सभेची चळवळ धुळे जिल्ह्यातून उभी करण्याचे श्रेय देखील कॉ.शरद पाटील यांनाच जाते. साक्री येथे पहिले संयुक्त साहित्य संमेलन यशस्वी करून साहित्य संमेलन चळवळीला नव्या वळणावर आणण्याचे कार्य कॉ.पाटील आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी केले.

ग्रंथसंपदा
चार प्रमुख खंड

(A) खंड 1 –
भाग 1 व 2 – दासशुद्रांची गुलामगिरी ( इंग्रजी व मराठी )
भाग 3 – रामायण महाभारतातील वर्ण संघर्ष – शंबुक, एकलव्य, सीता, कर्ण, द्रौपदी, विधुर, कृष्ण

(B) खंड 2 –
भाग 1 – जातिव्यवस्थापक सामंती सेवकत्व (इंग्रजी व मराठी)
भाग 2 – शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण महंमदी की ब्राह्मणी ?

(C) खंड 3 –
जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती (इंग्रजी व मराठी),

(D) खंड 4 –
प्रिमिटिव्ह कम्युनिझम,मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद (इंग्रजी व मराठी)
Caste Feudal Servitude खंड 2

काही महत्वाची पुस्तके
● अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र
● मार्क्स – फुले – आंबेडकरवाद
● भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत
● बुद्ध – भारतीय इतिहासातील लोकशाही,स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्त्रोत
● पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका
● स्त्री शुद्रांच्या स्वराज्याचा राजा (नाट्यसंहिता)
● शोध,मूलनिवासींचा की शूद्र वर्णाचा की जात्यंतक समतेचा ?
● नामांतर – औरंगाबाद आणि पुण्याचे
● बुद्ध
● भिक्खू आनंद
● धम्म आनंद
● वधू विशाखा.

पुरस्कार
कॉ.शरद पाटील यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या अत्यंत भरीव योगदानाबद्दल त्यांना 10 एप्रिल 2014 रोजी 18वा “महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार” जाहीर झाला. वाई या ठिकाणी हा पुरस्कार त्यांच्या मानसकन्येने स्विकारला. अलीकडेच त्यांना महाराष्ट्र इतिहास संशोधन परिषदेच्या “महान इतिहासकार पुरस्कार” ने सन्मानित करण्यात आले. कॉ.शरद पाटील यांना नुकताच इतिहासकार “वा.सी. बेंद्रे पुरस्कार” प्रदान करण्यात आला. याशिवाय त्यांच्या साहित्याचा अनेक ठिकाणी गौरव झाला आहे..

लेखक – अनिल माने.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top