आचारसंहिता : शिवरायांचा वसा आणि वारसा सांगणाऱ्यांची

छत्रपती शिवराय हे महापुरुष होते. सामान्य माणसामध्ये असामान्य चेतना निर्माण करुन स्वराज्य स्थापण्याचा दृढसंकल्प त्यांनी पुर्ण केला. आपण त्यांच्या संपुर्ण चरित्रातुन बोध घेऊन आदर्श वर्तन करायला हवे. त्यासाठी छ.शिवरायांच्या खालील गोष्टींचे अनुकरण करावे. तीच आज शिवरायांना मानणाऱ्यांची आचारसंहिता असायला हवी…

१) छत्रपती शिवरायांनी वडीलधाऱ्यांचा सन्मान केला. शहाजीराजे, राजमाता जिजाऊ व इतर. आपणही आपल्या घरातील आईवडील व वडीलधाऱ्यांचा मान ठेवुया.

२) छत्रपती शिवरायांनी परस्त्रीला मातेसमान मानले. हा स्त्रियासंदर्भात शुद्ध दृष्टीकोन आपणही अंगी बाणवुया.

३) छत्रपती शिवरायांनी परधर्माचा द्वेष केला नाही, उलट त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे जगण्यास सहकार्य केले. हा धर्म सहिष्णुतेचा गुण आपणही अनुसरुया.

४) छत्रपती शिवरायांनी ज्ञानाचे महत्व ओळखुन आपल्या मुलास संभाजी राजांना संस्कृतपंडीत बनविले. आपणही आपल्या मुलांमुलींना असे सखोल ज्ञान देऊया.

५) छत्रपती शिवराय आयुष्यभर व्यसनांपासुन आणि रंगेलपणापासुन जाणीवपुर्वक दुर राहिले. दारु, जुगार व परस्त्रीगमन ही व्यसने व्यक्तीला, त्याच्या कुळाला आणि समाजाला हानी पोहोचवतात. इतकेच नव्हे तर उच्च ध्येय, आदर्श जीवन या मार्गातील अडथळा बनतात. म्हणुन यापासुन कटाक्षाने छत्रपती शिवराय दुर राहिले. आपण त्यांचे निष्ठावान अनुयायी असु तर आपणही अशा गोष्टी त्याज्य मानुया.

शिवरायांचा व्यापार कोणत्या २५ देशांशी चालायचा ?

६) छत्रपती शिवरायांनी आपल्या घरातील महिलांना स्वातंत्र्य आणि युद्धकलेचे, राज्यकारभाराचे शिक्षण दिले होते. आपण आपल्या लेकीसुनांना वेगवेगळे शिक्षण घेण्याचे कितपत स्वातंत्र्य देतो ? घरकारभारात व्यवसाय, उद्योगामधे कितपत तरबेज करतो ? शिवप्रेरणेने आपणही या गोष्टी करुया.

७) छत्रपती शिवरायांनी अंधश्रद्धा नाकारल्या. सतीप्रथा नाकारली. राजाराम पालथा जन्मला म्हणुन शांती करणे नाकारले, कुठलीही स्वारी/लढाई करताना मुहुर्त बघितला नाही. ते पुर्ण सामर्थ्यानिशी प्रयत्न करीत राहिले आणि जिंकत गेले. जरी पुरंदरचा तह करावा लागला तरी आपला कुठलाही पराभव हा कायमचा पराभव न मानता जीवघेण्या संकटावर मात करत त्यांनी शेवटी अंतिम ध्येय गाठलेच. हा मनाचा भक्कमपणा आपल्याही रक्तात आणुया.

८) छत्रपती शिवरायांनी धर्माला जीवन जगण्याचा मार्ग एवढेच महत्व दिले. जेव्हा धर्माची तत्वे स्वाभिमानी माणुस म्हणुन जगण्याच्या आड येऊ लागली तेव्हा त्यांनी प्रसंगी धर्मतत्वे बाजुला सारण्याचे धाडस दाखविले. उदा.धर्मतत्वानुसार शुद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार नव्हता, मात्र शिवरायांनी समाजव्यवस्थेत स्थान नाकारलेल्या सर्वांच्या हातात शस्त्रे दिली. सती परंपरा मोडुन काढली. जर धर्म तुम्हाला माणुस म्हणुन न्याय हक्क देत नसेल, सन्मान देत नसेल तर धर्माची दुरुस्ती आवश्यक असते. पण धर्मप्रमुख या गोष्टीला तयार होत नाहीत. अशावेळी आपल्यावर लाजिरवाणी गुलामी लादणाऱ्या धार्मिक बाबींविरुद्ध बंड करुन आपला आत्मसन्मान, स्वाभिमान जपला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्याची पुढील पायरी म्हणुन आपणही हा विचार स्विकारुया.

९) छत्रपती शिवरायांनी रयतेस लेकराप्रमाणे वागविले. त्यांच्यावर चुकुनही अन्याय होणार नाही, याची दखल घेतली. स्वराज्यासाठी आर्थिक त्रास दिला नाही. बलवान माणसाने दुबळ्याचे रक्षण करावे हे त्यांचे तत्व होते. याचे आपणही काटेकोर पालन करुया.

काय सांगते शिवरायांची राजमुद्रा ?

१०) शिवरायांनी स्वदेश व स्वभाषा यांचा अभिमान बाळगला. शत्रुशी शत्रुप्रमाणे व मित्रांशी ते आदर्श मित्राप्रमाणेच वागले. आपणही याचा बोध घेऊया.

११) छत्रपती शिवरायांनी प्रत्येक निर्णय पुर्ण विचारांती घेतला. दुसऱ्याच्या शब्दांवर भरवसा ठेऊन त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. प्रत्येक गोष्ट नीट पारखुन योग्य निर्णय घेतला. आपण मात्र हलक्या कानाचे असतो. “देव,देश अन धर्मासाठी प्राण घेतला हाती” म्हणताच आपले रक्त सळसळु लागते. आता देशाबद्दल रक्त सळसळायलाच हवे. पण देशप्रेम म्हणजे काय ? हेही नीट तपासुन पहायला हवे. त्याचबरोबर सामाजिक व्यवहार जपताना देव व धर्माबद्दल आपण किती व कसा अभिमान बाळगायचा हेही ठरविले पाहिजे. या सगळ्यांचा विचार करुन मगच त्याबद्दल अभिमान बाळगुया.

१२) छत्रपती शिवराय म्हणजे आदर्श नेतृत्व ! छत्रपती शिवराय म्हणजे न्यायप्रिय राजा. छत्रपती शिवराय म्हणजे एक जनकल्याणकारी विचारधारा. छत्रपती शिवराय म्हणजे रयतेचा स्वाभिमान, महाराष्ट्राची उंच मान. या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्या. त्यांच्या नावाला कमीपणा येईल असे वर्तन कोणत्याही शिवभक्तांकडुन होता कामा नये.

१३) धर्माबद्दल अभिमान बाळगताना माझे त्या धर्मात काय स्थान आहे, हे अधिकृतरित्या कळल्याशिवाय धर्मासाठी प्राण देण्याची गोष्ट मी करणार नाही, असेच आता मला म्हणावे लागेल. विचारी माणसांचे भांडण देवाशी किंवा धर्माशी नसतेच. मात्र त्याच्या आधारे गरिबांची पिळवणुक, छळ, अप्रतिष्ठा, त्याचा अन्याय करणाऱ्या वृत्तीला विरोध असतो हे आता जाणीवपुर्वक समजुन घ्यावे लागेल.
जय शिवराय

वाचा शिवरायांच्या प्रशासनाची ८ वैशिष्ट्ये

शिवरायांच्या कुटुंबात ८ पत्नी, ६ मुली, २ मुले

© लोकराज्य टीम.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top