खेडेकर साहेब…

एक काळ होता, छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर फक्त हिंदु-मुस्लिम दंगली घडवण्यासाठी केला जायचा. परंतु, शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन ही चुकीची परंपरा बंद केली. शिवरायांच्या नावाचा गैरवापर करणारे खरे चेहरे उघडे पाडले आणि खरे, वास्तव, लोकावश्यक शिवराय जनमानसांत रुजु केले. महाराष्ट्रातील हिंदु-मुस्लिम दंगल होऊ नयेत म्हणुन दोन समाजात सलोखा निर्माण केला.

एक काळ होता, जिजाऊ माँसाहेब या व्यक्तिमत्वाविषयी फारसे कुणाला गांभीर्य नव्हते. परंतु, खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन सर्वप्रथम जिजाऊंचे चित्र तयार केले. नंतर त्यांच्या पत्नी रेखाताई खेडेकर या आमदार असताना ते चित्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने अधिकृत करुन घेतले आणि त्याचेच तैलचित्र महाराष्ट्र विधानसभेत बसवले. जिजाऊंचा खरा इतिहास समोर आणला. जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेडराजा येथे मातृतिर्थ उभे करुन आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सुरु केला. जिजाऊंना प्रेरणास्थान मानुन मानवतावादी विज्ञानवादी “शिवधर्म” स्थापन केला.

एक काळ होता, महाराष्ट्राला फक्त “जय भवानी जय शिवाजी” ही घोषणा माहीत होती. परंतु, खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख सरांनी जन्मास घातलेला “जय जिजाऊ जय शिवराय” हा आदरयुक्त जयघोष समाजात रुजु केला. जिजाऊंच्या नावाला अभिवादनमुल्य प्राप्त करुन दिले. आज “जय जिजाऊ” या अभिवादनाशिवाय तुमच्या-आमच्या संवादाची सुरुवात होत नाही.

एक काळ होता, महाराष्ट्रात शिवरायांच्या जन्मतारखेबद्दल वाद होता. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये शिवजयंतीसंबंधी संभ्रमावस्था होती. परंतु, खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन या मुद्द्यावर जनजागृती केली. रेखाताई खेडेकर आमदार असताना त्यांच्या माध्यमातुन विधानसभेत यावर व्यापक चर्चा घडवुन आणली आणि शासनाच्या माध्यमातुन १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची खरी व अधिकृत तारीख निश्चित करुन घेतली. किल्ले शिवनेरीवर जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महाराजांच्या जन्माचा पाळणा सुरु केला. मराठा सेवा संघाच्या वतीने शिवजयंती सोहळा हे उपक्रम सुरु केले.

एक काळ होता, मराठा-बहुजन समाजातील युवकांचे वैचारिक भान सनातन्यांच्या क्रुर षड्यंत्रामुळे हरपले होते. समाजाच्या मनुष्यबळाचा गैरवापर केला जात होता. परंतु, खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन हे षड्यंत्र हाणुन पाडले. मराठा-बहुजन समाजाला वैचारिक दिशा दिली. युवाशक्तीला विधायक कार्यासाठी प्रेरित केले. युवकांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचे आवाहन करुन समाजात जाणीव-जागृती केली. बुटपॉलिश ते तेल मालिश व्यवसायासाठी तरुणांना प्रोत्साहन दिले.

एक काळ होता, शिवचरित्र, शंभुचरित्र या विषयांवर लिहण्या-बोलण्यावर मनुवादी वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे समाजात चुकीचा इतिहास पेरला जात होता. परंतु, खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन या विषयावर बोट ठेवले. इतिहासाच्या पुनर्लेखनाचे महत्व समाजाला पटवुन दिले. शिवशंभुराजांचा सत्य इतिहास लोकांपर्यंत पोचवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक शिवशाहिर, इतिहास संशोधक, वक्ते, लेखक, चित्रकार, नाटककार यांची मोठी फळी निर्माण केली. नव्या इतिहास संशोधक, अभ्यासकांना आपले इतिहासज्ञान अधिक निर्भीडपणे मांडता यावे म्हणुन मनुवाद्यांची या क्षेत्रातील मक्तेदारी मोडुन काढली. चुकीचा इतिहास लिहणाऱ्या लोकांना जरब बसवली. इतिहासातील अनेक वादग्रस्त विषय मार्गी लावले. एरवी इतिहासाकडे केवळ शंभर मार्कांचा विषय म्हणुन बघणाऱ्या समाजाला इतिहासात अस्मिता आणि आदर्श शोधायला शिकवले.

एक काळ होता, महाराष्ट्रात मराठा-दलित, मराठा-मुस्लिम आणि मराठा-बहुजन असा वाद निर्माण करुन अनेकांनी आपल्या राजकिय पोळ्या भाजुन घेण्यासाठी पार्श्वभूमी तयार केली होती. परंतु, खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन हा मुद्दा हाताशी घेतला आणि “बळीराजा – बुध्द – तुकोबा – शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर” या महापुरुषांच्या साखळीची समाजाला ओळख करुन दिली. समाजाच्या सर्व स्तरांत सामंजस्य आणि एकमेकांविषयीच्या आपुलकीची भावना रुजवली. महाराष्ट्रात एक जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण केले. जातीय दंगलीपासुन समाजाला मुक्त केले.

एक काळ होता, वेगवेगळ्या क्षेत्रातील मराठा बहूजन समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांना अनुल्लेखाने टाळण्याची मोहीम सनातनी वर्गाकडुन चालविली जात होती. परंतु, खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातुन सनातन्यांची चाल हाणुन पाडली. सर्व क्षेत्रातील मराठा-बहुजन व्यक्तिमत्वांना पुढे आणले. समाजाला त्यांची ओळख करुन दिली. त्यांच्या कार्याला आणि विचारांना पाठबळ दिले.

शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या कार्याचा आढावा घ्यायला इथे शब्द पुरणार नाहीत. मनुवादी मानसिकतेचे प्रचारक आणि प्रसारक समाजाला अंधश्रद्धा, अंधकार व अधोगतीच्या खाईत लोटण्याचा कार्यक्रम पध्दशीरपणे राबवत असताना खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघ या चळवळीचं रोपटं लावलं, वाढवलं आणि तिचे लोकचळवळीत रुपांतर केले. या चळवळीने महाराष्ट्रात एक सलोख्याचे वातावरण निर्माण केले. समाजातील भेदभावाची दरी कमी करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले. चिंतन-मंथन करुन समाजाच्या भावी प्रश्नांची जाणीव करुन दिली. समाजात एक आनंदाचे व सहकार्याचे वातावरण निर्माण केले. लोकांना एकमेकांशी जोडले.

गोतम बुध्दांचा मध्यममार्ग, तुकोबांची लवचिकता आणि छत्रपती शिवरायांचा मुत्सद्दीपणा आम्हाला शिकवला. आपली नाणी, वाणी, लेखणी आणि करणी आपल्याच लोकांविरुद्ध वापरायची नाही हा समाज जोडण्याचा मंत्र दिला. मराठा सेवा संघ आणि ३२ कक्षांच्या माध्यमातुन वैचारिकदृष्ट्या नापीक समाजाला सुपीक केले. अज्ञान, अहंकार, भोळेपणा आणि वैचारिक गुलामीचे दुर करुन समाजाचे मन, मेंदु, मनगट, मणका सशक्त करण्याचे काम केले. समाजाच्या वेळ, श्रम, बुद्धी, पैसा आणि कौशल्य या पंचदानाच्या माध्यमातुन शिक्षणसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता आणि प्रचार-प्रसारमाध्यम सत्ता मिळवण्याचे आवाहन केले. हे काम उभे करत असताना स्वतः मानहानीचे विष पचवले, विरोधकांचा वाईटपणा घेऊन समाजाला उभे केले, दिशा दिली आणि समाज म्हणुन जगण्याचे विचार दिले.

आपल्याकडे राजकीय क्षेत्रात मा.शरद पवार साहेबांवर टीका करुन कित्येक लोक राजकारणात मोठे झाले. तोच कित्ता गिरवत सामाजिक क्षेत्रातील आणि सामाजिक माध्यमांवरील लोक जेव्हा खेडेकर साहेबांना टीकेचा विषय करतात तेव्हा मला वेगळं काही वाटत नाही. काम करुन मोठं होण्यापेक्षा टीका करुन मोठं होणं सोपं असतं हा बोध त्या लोकांनी घेतलेला असतो. स्वतः कधी साधी वीट लावलेली नसते, मात्र सामाजिक कार्याची इमारत उभी करणाऱ्यांबद्दल तावातावाने बोलणाऱ्या अशा पोकळ लोकांना साहेब कधी कळणार नाहीत.

एक मराठा सेवा संघ उभा करणे, दिवसरात्र धावपळ करुन तो वाढवणे आणि सलग २८ वर्षांपर्यंत तो टिकवुन ठेवणे या सोप्या गोष्टी नाहीत. हे करत असताना नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व आणि दातृत्वशील लोकं जोडणे, लोकांच्या माध्यमातुन समाज जोडणे आणि सातत्याने समाजाच्या प्रश्नावर लिहणारी, बोलणारी, प्रश्न विचारणारी, मत मांडणारी फळी उभा करणे या गोष्टी स्वतःहुन करायला जाल तेव्हा त्यातली खोली कळेल. खेडेकर साहेबांच्या ज्ञात अज्ञात क्षेत्रातील कार्याला मुजरा. साहेबांना ६९व्या वाढदिवसाच्या हार्दिक सदिच्छा. त्यांना दीर्घायुष्य लाभो !
– अनिल माने.

#खेडेकरसाहेब ___________________________________