श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा तुळापुर २०१९

श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा शौर्यपीठ तुळापुर २०१९ वार्ता

स्वराज्याचे द्वितीय छत्रपती संभाजी महाराज यांचा ३३९ वा श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा शौर्यपीठ तुळापुर येथे आज मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आपल्या धाकल्या धन्याला वंदन करण्यासाठी तुळापुरमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शंभुप्रेमी प्रचंड संख्येने उपस्थित होते. पोलिस प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार सकाळपासुन जवळपास पन्नास हजारांहून अधिक शंभुप्रेमींनी येथे हजेरी लावली. शिवपुत्र शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे.

फलटण राजघराण्यातील श्रीमंत विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते शंभुराजांचा राज्याभिषेक पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार नितेश राणे, मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे केंद्रिय निरीक्षक विकासअण्णा पासलकर, राष्ट्रसेवा समुहाचे संस्थापक राहुल पोकळे, पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, तुळापुर ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि शिवशंभुप्रेमी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते शिवपुत्र शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्टच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या श्रीशंभुराज्याभिषेक विशेषांक २०१९ चे प्रकाशन करण्यात आले.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत शिवरायांची भुमिका करणारे कलाकार शंतनु मोघे यांना यावेळी शिवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगोल्याचे चेतनसिंह केदार यांना उद्योजक, नगरचे शिवप्रेमी गजेंद्र दांगट यांना सामाजिक तर नॅशनल कबड्डी खेळाडु स्नेहल शिंदे यांना क्रिडा क्षेत्रातील शंभुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पैठण येथे मराठा क्रांती भवनसाठी अकरा गुंठे जागा उपलब्ध करुन देणारे दिपक मोरे, तुळापुर स्मारक परिसर विकासासाठी स्वखर्चाने बांधकाम करणारे दत्ताआबा गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

आपल्या मनोगतात बोलताना अजितदादा पवार म्हणाले की, सत्ताकाळात मी रात्रीत सर्जिकल स्ट्राईक केला. सकाळपर्यत ह्या कानाचं त्या कानाला होऊ दिलं नाही; त्यामुळे मी बोलतो कमी करून जास्त दाखवतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास विकृत करणाऱ्या मुठभर पिलावळीला सोडणार नाही. तुळापुर येथील स्मारकस्थळाला क वरुन ब आणि ब वरुन अ दर्जा मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेन असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

प्रविणदादा गायकवाड यांनी तुळापुर येथील स्मारकाच्या विकासासाठी एक लाख रुपयांची मदत घोषित केली. त्यांनी सांगितले की, अजित दादांनी फोन केल्यावर आजचा हत्तीसारखा मुख्यमंत्री लगबगीने हलायला लागतो हे खरं आहे, आम्ही ते पाहिले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आणि शिवप्रेमींची ताकत ओळखली असती आज शिवरायांचे नाव घेऊन मोदी सत्तेत आले नसते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाणांनी केलेल्या विनंतीनुसार इतिहास संशोधक वा.सि.बेंद्रे यांनी हातातील काम बाजुला ठेवुन छत्रपती संभाजी महाराजांचा वस्तुनिष्ठ इतिहास लिहुन काढला. आज त्यांच्यामुळे आपल्याला खरे संभाजी महाराज समजत आहेत. डॉ.कमल गोखले यांनीही महाराजांविषयीच्या अनेक अनैतिहासिक बाबी खोडून काढण्याचे काम केले. आज शंभुराज्याभिषेकाच्या निमित्ताने आपण त्यांचे स्मरण केले पाहिजे अशी भावना राहुल पोकळे यांनी व्यक्त केली.

शंतनु मोघे यांनी तरुण पिढीला वाचन करण्याचे आवाहन केले. ज्या शिवरायांनी संपूर्ण स्वराज्य एकत्र ठेवले त्या शिवरायांचा आपण आज काय आदर्श घेतो असा अंतर्मुख करणारा प्रश्न त्यांनी उपस्थितींना विचारला.

तत्पुर्वी तुळापुर गावातुन शंभुराजांच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. शिवपुत्र शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या शिवशंभुप्रेमींसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास पंधरा हजारांहून अधिक लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. सोहळ्यासाठी पुणे, सातारा, सांगली, सोलापुर, कोल्हापुर, धुळे, जळगाव, लातुर, परभणी, औरंगाबाद, बीड, अहमदनगर, नाशिक, मुंबई, रत्नागिरी, नांदेड, उस्मानाबाद इत्यादि जिल्ह्यातील शिवशंभुप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीशंभुराज्याभिषेक सोहळ्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर शंभुप्रेमींनी हजेरी लावुन शिस्तबद्धरित्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल ट्रस्टच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले आहेत.

शिवपुत्र शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्ट, पुणे.

#श्रीशंभुराज्याभिषेक #Shambhurajyabhishek