भाऊसाहेब रंगारी : सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक

भाऊ लक्ष्मण जावळे उर्फ भाऊसाहेब रंगारी : सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक

प्रस्थापित इतिहासलेखकांनी आपल्या लेखणीचा गैरवापर करत खरा इतिहास पुसुन चुकीचा इतिहास प्रचलित केल्याचे अजुन एक उदाहरण पुण्यात समोर आले आहे. जातकेंद्री इतिहासलेखकांनी बांधलेल्या इतिहासाच्या तिरक्या भिंतीचे लेखणीने मोठे केलेले चिरे आता त्यांच्यावरच कोसळु लागले आहेत. यावेळेस तो चिरा बाळ गंगाधर टिळकांच्या रुपाने कोसळला आहे.

यापुर्वीच महात्मा ज्योतिराव फुलेंनी १८६९-७० मध्ये सुरु केलेल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे जनकत्व बा.गं. टिळकांच्या नावावर खपविण्याचा जातकेंद्री प्रकार उघडकीस आला असताना परत आता भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्येच सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनकत्व टिळकांच्याच नावावर खपवले गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे सहन न झाल्याने आता पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला खरा इतिहास उघड करु नका अशा धमक्या देणारी पत्रे यायला सुरुवात झाली आहे. खोट्या इतिहासाचा पर्दाफाश झाल्यामुळे नेमकी कुणाच्या बुडाखाली आग लागली असेल ते वेगळे सांगायला नको.

वस्तुतः भाऊसाहेब रंगारी हे एक जबरदस्त क्रांतिकारक होते. त्यांच्या वाड्यामध्ये क्रांतिकारकांना गुप्तपणे शस्त्र चालवण्याचे शिक्षण दिले जायचे. आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्यांनी ब्रिटिशांविरोधात क्रांतीकार्य चालविले होते. नुकताच त्यांच्या वाड्यातील शस्त्रासाठाही सापडला आहे.

भाऊसाहेबांचा शालुंना रंग देण्याचा व्यवसाय होता, त्यामुळे त्यांचे जावळे आडनाव मागे पडुन रंगारी हे नाव प्राप्त झाले. ते उत्तम राजवैद्य होते. त्यांच्या राहत्या घरी आयुर्वेदिक दवाखाना होता. Richard I. Cashman यांच्या The Myth of Lokmanya : Tilak and Mass Politics in Maharashtra या पुस्तकात त्यांचा उल्लेख *”Bhau Lakshman Javle, was a Maratha whom the police considered an extremely dangerous and troublesome man”* असा उल्लेख आला आहे, यावरुन त्यांचा दरारा लक्षात येईल.

१८९२ साली सर्वप्रथम भाऊसाहेब रंगारी यांनी गणेशोत्सव सुरु केला. २६ सप्टेंबर १८९३ च्या केसरीच्या अग्रलेखात टिळक स्वतः लिहतात की, सालाबादपेक्षा यंदा गणेशोत्सवास अधिक सार्वजनिक स्वरुप आले असुन ज्या गृहस्थांनी खटपट केली त्यांचे आभार मानले पाहिजेत. ते गृहस्थ दुसरेतिसरे कोणी नसुन भाऊसाहेब रंगारी हेच होते. सार्वजनिक गणेशोत्सवातील देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्याची सुरुवातही भाऊसाहेबांनीच केली. टिळकांनी १८९४ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग घेतला.

तत्कालीन सामाजिक जीवनातही भाऊसाहेबांना मानाचे स्थान होते. दारुवाला पुलावरील हिंदू-मुस्लिम दंगल थांबवणारे व्यक्तिमत्व म्हणुन दस्तुरखुद्द टिळकांचे सहकारी न.चि. केळकर यांनी भाऊसाहेबांचा उल्लेख केला आहे. मात्र आपल्याकडे चित्रपटातुनही चांगला इतिहास कसा दुसर्यांच्याच नावावर खपवला जातो आणि इतिहास घडविणाऱ्यांना कसे डावलले जाते याचा “सुबोध” आपल्याला यावरुन घेता येईल.

१९०५ मध्ये आधीच आपले मृत्युपत्र बनवुन स्वतःच्या अंत्यसंस्काराच्या खर्चाची तजवीज करणाऱ्या भाऊसाहेबांनी आपली सर्व संपत्ती सार्वजनिक गणेशोत्सवासाठी दान दिली होती. विशेष म्हणजे आपल्या मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणुन त्यांनी एका मुस्लिम व्यक्तीची साक्ष घेतली होती. जुन १९०५ रोजी भाऊसाहेबांचे निधन झाले. त्याचीही बातमी २० जुन १९०५ च्या अंकात केवळ एका वाक्यात छापुन केसरीने त्यांची उपेक्षा केली.

भाऊसाहेबांचा इतिहास बराच मोठा आहे. इतके दिवस भाऊसाहेब रंगारी हे नाव आणि चरित्र उपेक्षेच्या गर्तेत अडकले होते. पण आता उपेक्षेचा काळ संपला आहे. उशिरा का होईना सत्य समोर आले आहे. अजुन बराच उलगडा होणे बाकी आहे. सत्याचा पाठपुरावा करण्यासाठी धडपडणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या सर्व सदस्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ आहे. शेवटी सत्य ज्यांच्या बाजुने असते त्यांचाच विजय असतो…

जिज्ञासुंनी अवश्य भेट द्या.

ठिकाण – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, शनिवारवाड्याच्या पाठीमागे, अप्पा बळवंत चौक, पुणे.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top