बांधकाम क्षेत्रातील शिवाजी – उद्योगमहर्षी बी.जी.शिर्के

भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात राजकारण, समाजकारण, ज्ञान-विज्ञान आणि उद्योग अशा सर्व क्षेत्रांमध्ये विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. अशा प्रतिकुल परिस्थितीमध्ये कोणतीही पार्श्वभुमी नसताना सातत्याने संघर्ष करुन केवळ आपल्या अफाट जिद्द व कष्टाच्या जोरावर बांधकाम क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा झेंडा तब्बल सहा दशकांहुन अधिक काळ फडकावत ठेवणारे यशस्वी उद्योजक म्हणजे उद्योगमहर्षी बी.जी.शिर्के.

महाराष्ट्र आणि देशाच्या बांधकाम क्षेत्रामध्ये “सिपोरेक्स” हे नवे क्रांतिकारी तंत्रज्ञान आणुन आपल्या विलक्षण कल्पकतेने ते प्रत्यक्षात यशस्वी करुन दाखविणाऱ्या बी.जी.शिर्के यांच्या यशाची कहाणीसुद्धा तितकीच संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. जाणुन घेऊया बांधकाम क्षेत्रातील शिवाजी म्हणजेच बी.जी.शिर्के यांच्याविषयी…

परिचय
बी.जी.शिर्के उर्फ बाबुराब गोविंदराव शिर्के यांचा जन्म १ ऑगस्ट १९१८ रोजी पसरणी ता.वाई जि.सातारा येथे एका अल्पभुधारक शेतकरी कुटुंबात झाला. आईवडील दोघेही अशिक्षित. त्यांच्या गावालाही शिक्षण आणि व्यवसायाची कसलीच पार्श्वभुमी नाही. छत्रपती शिवरायांच्या प्रतापगड रणसंग्रामाच्या काळातील घटनांमध्ये उल्लेख असणारा हा पसरणीचा भाग. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतुन कमवा व शिका पद्धतीने वाईच्या द्रविड हायस्कुलमधुन त्यांनी आपले शालेय शिक्षण पुर्ण केले. पुढे त्यांनी पुण्यात फर्ग्युसन व नंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातुन सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. शिकत असताना खानावळीत वाढपी (वेटर) म्हणुन त्यांनी काम केले. ६ जुन १९४३ रोजी बांधकाम अभियांत्रिकी पदवी पुर्ण केली. वाई पसरणी भागातील त्या काळचे ते पहिले इंजिनिअर होते.

सिव्हिल इंजिनिअरचा संबंध विकासाशी येतो आणि विकास उद्योगांतुन होतो त्यामुळे उद्योगाची जननी असणाऱ्या स्थापत्यशास्त्रातच त्यांनी पदवी घेतली. त्यांच्या धाडसी निर्णयांचा आणि स्पष्टवक्तेपणाचा त्यांना शिक्षण आणि व्यवसायात नेहमी फायदा झाला. १९४७ मध्ये त्यांनी विजया शिंदे यांच्याशी लग्न केले. बांधकाम व्यवसायातील मनस्ताप, राजकारण यामुळे खचलेल्या शिर्केंना त्यांच्या पत्नीने मोलाची साथ देऊन खंबीरपणे सोबत उभ्या राहिल्या आणि बांधकाम व्यासायाला मोठा हातभार लावला. त्यांच्या तीन मुलांपैकी विजय आणि प्रतापराव हे व्यवसायाचा कारभार पाहतात तर अजय शिर्के हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच BCCI चे सेक्रेटरी म्हणुन काम पाहतात. १४ ऑगस्ट २०१० रोजी वयाच्या ९२व्या वर्षी बी.जी.शिर्के यांचे निधन झाले. त्यांचे “जिद्द” नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. २००३ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. महाराणी येसुबाई (छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी व राजेशिर्के घराण्यातील कन्या) यांचे जगातील पहिले स्मारक त्यांनी शिरकोली येथे बांधले आहे.

व्यवसायास सुरुवात
नोकरी न करता स्वतःची कंपनी सुरु करावी अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती. परंतु सुरुवातीला अनुभवासाठी नाशिक येथे त्यांनी तेजुकाया बांधकाम कंपनीत काही दिवस नोकरी केली. त्यानंतर ९ सप्टेंबर १९४४ रोजी दसऱ्याच्या मुहुर्तावर त्यांनी कोणतेही पैशाचे पाठबळ नसताना, व्यावसायिक परंपरा नसताना आपल्या जिद्द आणि ज्ञानाच्या जोरावर आपल्या Supreme Construction या कंपनीची पायाभरणी केली.

कामाच्या शोधात सुरुवातीला ते सायकलवर फिरले. पुण्यातील लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्याला काम मिळावे अशी त्यांनी विनंती केली. शिर्केंची जिद्द, कष्ट आणि प्रामाणिक धडपड बघता अधिकाऱ्याने त्यांना काम दिले. पुण्याच्या लष्करी छावणीची कंपाउंड भिंत बांधण्याच्या कामापासुन शिर्केंनी आपल्या बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली. लवकरच १९४५ मध्ये कोल्हापुर कारागृहाच्या बांधकामाचे मोठे कंत्राट त्यांना मिळाले. तिथुन त्यांचा नावलौकिक वाढला आणि लवकरच १९५३ मध्ये पुणे विद्यापीठात केमिस्ट्री डिपार्टमेंटची मोठी बिल्डिंग तसेच नीरा नदीवरील वीर येथील धरण अशी मोठी बांधकामे त्यांनी पुर्ण केली. हळुहळु त्यांचा व्यवसाय स्थिरावु लागला. शिर्केंच्या कामाची गुणवत्ता पाहुन शंतनुराव किर्लोस्कर यांनी १९६२ ते १९८१ पर्यंतची आपल्या कंपनीची पुण्यातील सर्व बांधकामे शिर्केंना विनानिविदा करण्यास दिली.

व्यवसायाचा विस्तार आणि प्रगती
व्यवसायात थोडीशी स्थिरता आल्यानंतर बी.जी.शिर्केंनी मागे वळुन न बघता व्यवसायाचा विस्तार करण्यास सुरुवात केली. पडेल ते कष्ट करण्याची तयारी, कोणत्याही संकटाला तोंड देण्याची धैर्य, गुणवत्तेचा आग्रह, कल्पकवृत्ती, अफाट जिद्द, समाजसुधारणेची तळमळ आणि भ्रष्टाचाराची चीड या गुणांच्या जोरावर त्यांनी आपला शिर्के कन्स्ट्रक्शन व्यवसाय वेगळ्या उंचीवर नेला. सहा दशकांहुन अधिक काळ बांधकाम उद्योगविश्वात बी.जी.शिर्के यांच्या नावाचा बोलबाला राहिला.

बांधकाम क्षेत्रात जागतिक स्तरावर एक यशस्वी उद्योजक म्हणुन त्यांनी ख्याती मिळविली. परंतु हे यश मिळविताना, मुख्यत्वे “Siporex म्हणजे शिर्के” हे समीकरण साधताना त्यांच्या सहनशीलतेचा खुप अंत पाहिला गेला. सिपोरेक्स या बांधकामाचे साहित्य निर्माण करणाऱ्या कंपनीची भारतात स्थापना करताना त्यांना खुप संघर्ष, अडथळे, सरकारी कारभार, भ्रष्टाचार, तांत्रिक अडचणी, अतोनात भांडवल अशा गोष्टींवर मात करावी लागली.

१९८४ साली मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी शिर्केंच्या आधुनिक तंत्राचा उपयोग महाराष्ट्राला होईल असे निर्णय शासकीय पातळीवर घेतले. मात्र त्यानंतर सुद्धा १३ वर्ष कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या. शेवटी आपले संपुर्ण कष्ट पणाला लावुन १९७२ मध्ये त्यांनी सिपोरेक्स कंपनी सुरु केलीच.

दरम्यानच्या काळात दुबईमध्ये बांधकामासाठी माणसांचा तुटवडा निर्माण झाला होता. माणसं मिळेनात इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी बांधकामासाठी बी.जी.शिर्केंच्या “सिपोरेक्स”ला काम मिळाले. त्यांनी भारतातुन लोकं नेऊन दुबईत अनेक इमारती, मशिदी उभ्या केल्या. दुबईच्या या पहिल्या कामाने “सिपोरेक्स” तारली गेली. आज जगात दुबईला जी प्रतिष्ठा आहे, त्या दुबईच्या उभारणीत महाराष्ट्रातल्या या मर्द मावळ्याचा महत्वाचा वाटा असणं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

आज शिर्के कन्स्ट्रक्शन ही जगातील एक नामवंत बांधकाम संस्था आहे. भारत सरकारचे आणि बाहेरच्या देशातील अनेक मोठे प्रकल्प त्यांनी पुर्ण केले आहेत. भारताचे संरक्षण मंत्रालय, मुंबई – बेंगलोर हायवे, पुण्याचा हिंजवडी विप्रो आयटी पार्क, चेन्नईचा विप्रो आयटी पार्क, कर्नाटक विधानसभा, आंध्रप्रदेश सरकारची बांधकामे, महाराष्ट्र विद्युत महामंडळ, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अशी विविध प्रकारची कामे त्यांनी पुर्ण केली आहेत.

बी.जी.शिर्के यांनी “सिपोरेक्स”च्या माध्यमातुन बांधकामासाठी प्रीफॅबचे नवीन क्रांतीकारी तंत्र विकसीत केले. या तंत्राद्वारे आतापर्यंत त्यांनी देशविदेशात, सर्व प्रकारच्या हवामान विभागात दीड लाखांहुन अधिक घरे बांधलेली आहेत. बांधकाम व्यवसायातील पारंपरिक वेळखाऊ निविदा धोरण हटवुन त्यांनी पुर्णपणे औद्योगिक दृष्टीतुन ही सर्व कामे अत्यंत विक्रमी वेळात पुर्ण केली.

पुण्यात २००८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टीने १९९४ मध्ये बालेवाडी येथे १६५ एकरांच्या माळरानावर “श्रीशिवछत्रपती क्रीडानगरी” या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑलिम्पिकनगरीचे अत्यंत भव्य बांधकाम त्यांनी एक वर्षात पुर्ण केले. हा एक जागतिक विक्रम ठरला. हे काम माझ्यासाठी अभिमानास्पद, उल्लेखनीय व ‘माईल स्टोन’ ठरणारे असल्याचा उल्लेख त्यावेळी स्वतः शिर्के यांनी केला होता. योगायोग म्हणजे त्यावर्षी बी.जी.शिर्केंचा अमृतमहोत्सव आणि त्यांच्या कंपनीचा सुवर्णमहोत्सव होता.

बी.जी.शिर्केंना फक्त पैसा कमवायचा नव्हता, तर बांधकाम क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणुन त्याचे आधुनिकीकरण, व्यावसायिकरण करण्यासोबतच बांधकामाची पारंपरिक वेळखाऊ निविदा पद्धती, गुणवत्तेपेक्षा लागेबांध्याना असणारे महत्व अशा गोष्टी त्यांना मोडुन काढायच्या होत्या.

कोणतेही बांधकाम उत्तम दर्जाचे आणि वेळेवर पुर्ण व्हावे हे व्रत त्यांनी आयुष्यभर पाळले. देशातील, राज्यातील समस्या धोरणविषयक बाबी, शिक्षणपद्धती, भ्रष्टाचार अशा विषयांवरही ते अधिकारी, नेत्यांशी चर्चा करत. प्रधानमंत्री इंदिरा गांधींनीही त्यांची पत्रे वाचुन त्यातील सुचनांचा विचार केला होता.

आपल्या मातीशी आणि माणसांशी असणारी नाळ कायम ठेवुन समाजातील नव्या उमेदीच्या, जिगरबाज तरुणांना ते आवाहन करतात, “उठा, तरुणांनो उठा. तुम्ही बुद्धिमान व पराक्रमी आहात. तुमच्या धमन्यातुन वाहणार्‍या, सळसळत्या रक्तात जग जिंकण्याची धमक आणि ताकद आहे. मात्र,आता जग जिंकण्याचा मार्ग हा उद्योजकता व व्यापारातुन जातो. कारकुनीतुन नाही. नोकर्‍या मागत हिंडत फिरण्यापेक्षा स्वतःच्या पायावर, हिंमतीने उभा राहा. कोणताही उद्योग, व्यवसाय कमी समजु नका. त्यात जिद्दीने उतरा, प्रामाणिक कष्ट करा, नव्या गोष्टी शिका, नवे शास्त्र व तंत्र निर्माण करा. एकमेकांना सहाय्य करत मराठी उद्योजकतेची नवी संस्कृती निर्माण करा. मग जग तुमचे आणि तुमचेच आहे…

ते स्वतःबद्दल म्हणतात, “मी सामान्य उद्योजक नाही. केवळ नवीन शास्त्र, तंत्र, यंत्र निर्माण करणे हे माझे कधीच ध्येय नव्हते. मी पारदर्शक संशोधक, शास्त्रज्ञ, उद्योजक आहे. याचे सदैव भान ठेवून आजवर मी निश्‍चित ध्येयाने वाटचाल केली आहे…

बी.जी.शिर्के यांनी शुन्यातुन विश्व निर्माण केले. १ ऑगस्ट २०१७ ते २०१८ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. नवीन उद्योजक, व्यावसायिक तरुणांना त्यांच्या कार्याची ओळख होणे गरजेचे आहे. उद्योगमहर्षी बी.जी.शिर्के हे खऱ्या अर्थाने बांधकाम क्षेत्रातील शिवाजी ठरतात. त्यांच्या अफाट जिद्दीला, प्रामाणिक कष्टाला आणि गुणवत्तापुर्ण व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा…

लेखन – अनिल माने.

वाचा जिजाऊंचा शिवाजी – रजनीकांत बद्दल
© लोकराज्य टीम.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top