फक्त माझी पाडसं सुखरुप पोहचू दे !

आई सारखे दुसरं दैवत या जगात कुठं नाही हे किती खरंय ते सांगणारी सत्य घटना…

जंगलाचा एक महत्वाचा नियम आहे. जंगलातील ताकतवान प्राणी दुबळ्या प्राण्यांची शिकार करणार. बळी तो कान पिळी. हीच निर्सगाची सुद्धा अन्नसाखळी आहे. निसर्गाचे संतुलन राखायचे असेल तर ही साखळी अशीच टिकली पाहिजे. अशीच सुरु राहिली पाहिजे. पण कधी कधी या जंगलातले भयाण वास्तव समोर आलं की काळजात आपल्याही काळजात चर्रर्रर्र झाल्याशिवाय राहत नाही.

मसाई मारा हे केनियातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान असुन आफ्रीकेमधील सर्व प्रकारच्या प्राण्यांचे हे माहेरघर आहे. मसाई मारा हे नाव इथल्या स्थानिक मसाई जमातीवरून पडले आहे.

फिनलँडच्या वाईल्ड लाईफ महिला फोटोग्राफर Alison Buttigieg या केनिया येथील जगप्रसिद्ध मसाई मारा फोटोग्राफीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी चित्त्याच्या शिकारीचे फोटो आपल्या कॅमेरात कैद केले. इतर सर्वसामान्य फोटोंसारखे हे फोटो. मात्र त्यात केवळ चित्त्याच्या शिकारीचे दृश्य कैद झाले नव्हते. त्यात एक अतिशय आशयपूर्ण गोष्टही लपली होती. नंतर या फोटोला सर्वोत्कृष्ट फोटोग्राफचा जागतिक पुरस्कारही मिळाला. परंतु फिनलँडच्या ज्या महिला फोटोग्राफरने हा फोटो टिपला होता, त्या महिला मात्र या फोटोमुळे काही काळासाठी नैराश्येच्या गर्तेत अडकली होत्या.

आज फेसबुक, व्हाट्सअप सारख्या वेगवेगळ्या सोशल साइट्सवर Alison Buttigieg यांनी मसाई माराच्या जंगलात काढलेले फोटो व्हायरल होत आहेत. त्या दृश्यांमागची कथाही तितकीच हृदयद्रावक आहे हे वाचल्यानंतर समजते.

Alison Buttigieg

Alison Buttigieg यांना मसाई माराच्या जंगलामध्ये एक चित्त्याची आई आपल्या पिल्लांना शिकारीचे धडे देत असतानाचे दृश्य दिसले. त्यांनी लगेच आपला कॅमेरा त्या दृश्याकडे वळवला. ते चित्ते एका हरिण आणि हरणाच्या दोन पाडसांचा पाठलाग करत होते. आपली दोन्ही पाडसं लहान असल्यामुळे आपल्या पाडसांचा त्या चित्त्यांच्या गतीपुढे निभाव लागणार नाही हे माता हरणीला समजलं होतं. आईचं हृदय जागं झालं. हरणीनं पिल्लांना पुढं जाऊन दिलं आणि तीनं हळुहळु आपली गती कमी करुन ती अचानक एका जाग्यावर थांबली. ती शांतपणे उभी राहिली.

हरणी थांबल्यावर तिच्या पिल्लांमागे धावणारे ते चित्तेही थांबले. समोर आयती शिकार दिसल्यावर चित्त्यांनी हरणीवर झडप मारली. चित्त्यांनी हरणीच्या शरीराचे एक एक लचके तोडायला सुरुवात केली. तेवढ्या वेळात हरणीची पिल्ले दूरवर पळून जाण्यात यशस्वी झाली होती.

एका बाजूला चित्ते हरणीच्या शरीराचे लचके तोडत होते तर दुसऱ्या बाजूला ती हरणी आपली पिल्ले सुरक्षित ठिकाणी पोहचेपर्यंत त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे डोळे लावून बसली होती. त्या हरणीने चित्त्यांच्या चाव्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. अजिबात प्रतिकार न करता ती सगळं सोसत होती. शेवटपर्यंत तिने आपल्या पाडसांवरची नजर हटवली नाही. आपल्या पाडसांचा जीव वाचलेला बघून तिच्या डोळ्यात मातृत्वाचे भाव दाटून आले होते

हेच ते व्हायरल फोटो

एका बाजूला चित्त्यांची आई आपल्या पिल्लांना शिकारीचे धडे देत होती तर दुसरीकडे हरणांची आई आपल्या पिल्लांनी जगावं म्हणुन स्वतः मरणकळा सोसत उभी होती. Alison Buttigieg यांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मधील आतापर्यंतच्या सर्वोत्तम छायाचित्रांमध्ये या छायाचित्रांचा समावेश झाला आहे.

ही कथा वाचल्यावर आईचं हृदय काय असतं याची प्रत्येकाला जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. उगाच म्हणत नाहीत,
आई सारखे दुसरे दैवत जगात नाही !

वाचा – शेतकऱ्यांची शेतातली शापीत पोरं

संकलन – लोकराज्य टीम.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top