मराठाभूषण डॉ.आ.ह.साळुंखे

प्राच्याविद्यापंडित विद्वान डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त प्रासंगिक लेख…

डॉ.आ.ह.साळुंखे सरांचा जन्म १ जून १९४३ रोजी शिवाजीनगर (खाडेवाडी) ता.तासगाव जि.सांगली येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून त्यांनी एम. ए. (मराठी), एम. ए. (संस्कृत) व पी. एच.डी. (संस्कृत) या पदव्या मिळवल्या.

कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद संस्थेच्या सातारा येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात ३२ वर्ष संस्कृत मराठीचे अध्यापन कार्य केले. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व वाङ्‌मय विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून दिलेले योगदान अत्यंत महत्वाचे आहे.

मानवी समूहाला दिशादर्शक ठरणाऱ्या साठ ग्रंथांचे लेखन करुन आह सरांनी इतिहास निर्माण केला आहे. त्यांनी अनेक ग्रंथांची भाषांतरेही केली आहेत. विचारवेध संमेलन (बेळगांव), सत्यशोधक साहित्य संमेलन (लातूर), विद्रोही साहित्य संमेलन (सोलापूर), सत्यशोधक समाजाचे ३५ वे अधिवेशन (गेवराई), शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेचे १३ वे अधिवेशन (आटपाडी) इत्यादी संमेलनाची अध्यक्षपदे त्यांनी भूषवली आहेत.

मराठी विश्वकोषात संस्कृत आणि तुलनात्मक धर्मशास्त्र या विषयावर सुमारे शंभर लेख लिहून सांस्कृतिक परिवर्तनाचा पाया त्यांनी घातला आहे.

डॉ.आ.ह.साळुंखे

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचे शिल्पकार, धर्म व संस्कृतीचे अभ्यासक, संतवाङ्‌मयाचे भाष्यकार, स्त्री सन्मानाचा संस्कार घडविणारे थोर शिक्षक, लालित्यपूर्ण व प्रासादिक भाषाशैली असलेले साहित्यिक इ. अनेक पैलू असलेले प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे.

भारतभर तसेच भारताबाहेरही असलेल्या बुद्ध विचारांच्या खुणा शोधून सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणून तथागत गौतम बुद्धाची ओळख करवून देणारे बुद्ध चरित्रकार, धर्म की धर्मापलिकडे हा संभ्रम नाहीसा करून आस्तिक शिरोमणी म्हणून चार्वाकांना संबोधणारे प्रबोधनकार, हिंदू संस्कृतीतील स्त्रियांचे स्थान शोधणारे संशोधक, मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती आणि वैदिक धर्मसूत्रांद्वारे बहुजनांची गुलामगिरीची केलेली कृती याविषयीची रहस्ये उलगडून दाखविणारे अभ्यासक, गुलामांचा आणि गुलाम करणाराचा धर्म एक नसतो हे ठणकावून सांगणारे स्वातंत्र्ययोद्धे, बळीवंशाची खरी ओळख समाजाला करवून देणारे इतिहासकार, जगतगुरु संत तुकारामांच्या विद्रोहाचे स्वरूप समजावून सांगणारे सत्यशोधक , भारतातील तात्विक संघर्षाचे सूत्र मांडणारे तत्त्वचिंतक इत्यादी नात्यांनी ते परिचित आहेत.

ऋजुता, नम्रता, प्रगल्भता, संयम इत्यादी गुणांचा संगम असलेले प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकाला आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे सहजपणे सापडतात.

संस्कृत साहित्याचा सखोल व्यासंग असूनही पांडित्य प्रदर्शनाचा सोस नसणारे विद्वान म्हणून त्यांचा लौकिक आहे. महाराष्ट्रभर व्याख्यानांच्या निमित्ताने त्यांच्या प्रासादिक वाणीचा लाभ अनेकांना होत असतो. तसाच तो देशातील अनेक राज्यांतील तसाच देशांबाहेरील श्रोत्यांनाही होतो.

बुद्धाची परिव्राजक वृत्ती आणि तुकारामांची सहृदयता यांचा मेळ असलेल्या त्यांच्या व्यक्तित्वातून बुद्ध व तुकारामांमधील सामरस्य प्रतीत होत असते. वारकरी धर्मातील बुद्ध विचारांचा धागा त्यांनी स्पष्ट केल्यामुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सामंजस्य संस्कृतीला उजाळा मिळालेला आहे.

लोकायत प्रकाशन सातारा

सामाजिक शोषणाच्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहणारे महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या धर्मविचारांचे वारस म्हणून त्यांनी जसे त्यांचे नाते चार्वाकांशी जोडले तसेच कुलस्वामी बळीराजाशीही. शेतकाऱ्यांविषयी कळवला असणाऱ्या तुकोबारायांची तलमलयांनी त्यांच्या सशक्त शब्दांमधून अभिव्यक्त केली.

थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्फत सोन्याच्या नांगराने या पुण्यनगरीचे पुनर्निमान केलेले आहे.

आह सर छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा वैचारिक वारसा पुढे चालवत आहेत. त्यांनी केलेल्या उत्तमोत्तम लेखन व संशोधनाने एक पिढी घडवली आहे व प्रकाशित पुस्तकांच्या माध्यमातून पुढील पिढी घडत आहे. हे विशेष आनंदाचे आणि अभिमानाचे आहे.

आजच्या वर्तमानाच्या संदर्भाने आह सरांच्या ज्ञान व अनुभवांतून प्राप्त होणारे मार्गदर्शन तरुणांसाठी आदर्श आहे. वर्तमान सामाजिक परिस्थितीत त्यांचे विचार दिशादर्शक आहेत. समाजाला बुद्ध, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर या साखळीत जोडणारा दुवा म्हणुन त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. सरांनी चालविलेली ही माणसं जोडण्याची परंपरा कायम ठेवण्याची जबाबदारी आज आपल्यावर आहे.

साभार – मा.विकास पासलकर.

© लोकराज्य टीम.

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top