वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (डोमीसाईल) कसे काढावे ?

हे प्रमाणपत्र काढण्यासाठी पुढील पायऱ्यांनी जा.
१) पुर्वतयारी – जन्मतारीख व रहिवासी पुरावा घेणे
२) आवश्यक कागदपत्रे जमा करणे
३) प्रक्रिया – सेतु केंद्रातुन वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र काढणे

१) पुर्वतयारी – जन्मतारीख व रहिवासी पुरावा घेणे.

● जन्मतारीख पुरावा घेणे
अ) अर्जदार आणि त्याचे वडील अशा दोघांचा शाळा सोडल्याचा दाखला (ज्यात जन्मतारीख व जन्मस्थान यांचा उल्लेख असावा) किंवा
ब) आपल्या ग्रामपंचायत/नगरपंचायत/नगरपालिका/मनपा यांच्याकडील अर्जदाराच्या जन्माच्या नोंदवहीतील उतारा किंवा
क) सेवानोंद पुस्तकातील जन्मस्थानाचा उल्लेख असलेल्या पानाची साक्षांकित प्रत घ्यावी किंवा
ड) शाळा/कॉलेज मधील जन्मतारखेचा उल्लेख असणारा बोनाफाईड दाखला

● रहिवासी पुुरावा घेणे
गावातील १५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त एकाच ठिकाणी वास्तव्य असल्याचा ग्रामसेवक आणि गावकामगार तलाठी यांचा तुमच्या नावाचा रहिवासी दाखला घ्यावा.

२) आवश्यक कागदपत्रे जमा करणे

● जन्मतारखेचा पुरावा

● रहिवासी पुरावा

● ओळखीचा पुरावा (कोणताही एक) – तुमचा फोटो असणारे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्र यापैकी कोणत्याही एकाची साक्षांकित प्रत

● पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) – रेशनकार्ड, लाईट बिल, मिळकत कर पावती, ७/१२ किंवा ८अ उतारा, फोन बिल, पाणीपट्टी, घरपट्टी यापैकी कोणत्याही एकाची साक्षांकित प्रत

● विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर १०₹ चे कोर्ट फी स्टॅम्प/तिकीट आणि अर्जदाराचा फोटो

● महाराष्ट्रात सलग १० वर्ष वास्तव्य असल्याबाबत १००₹ स्टॅम्प पेपरवर स्वयं घोषणापत्र/शपथपत्र/प्रतिज्ञापत्र
अ) अर्जदाराचे वय १८ वर्ष पुर्ण असल्यास त्याने स्वतःने केलेले प्रतिज्ञापत्र
ब) अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असल्यास त्याचे आई-वडिल किंवा कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने केलेले प्रतिज्ञापत्र
क) अर्जदार भाड्याने राहत असेल तर घरमालकाचे १००₹ स्टॅम्पवर संमतीपत्र व घरमालकाच्या नावे असणारे वीज बिल

● अर्जदार परराज्यातील असेल किंवा अर्जदाराचा जन्म महाराष्ट्राबाहेरील असल्यास
अ) वीस वर्षापासुनचे महाराष्ट्रातील वास्तव्याबाबत महसुली पुरावा उदा.मालमत्ता कार्ड, जमीन असल्यास ७/१२, खरेदीखत, कर पावत्या
ब) मुळ राज्याचा अधिवास स्वखुशीने सोडत असल्याचे व महाराष्ट्र राज्याचा अधिवास स्वीकारत असल्याचे प्रतिज्ञापत्र

● अर्जदार विवाहीत स्त्री असल्यास
अ) पतीचा शाळा सोडल्याचा दाखला व पतीकडील रहिवासाचा पुरावा
ब) विवाहाचा पुरावा (कोणताही एक)- विवाह नोंदणी दाखला, गॅझेटमध्ये प्रसिध्द झालेला नावातील बदल, लग्नपत्रिका, पोलीस पाटील यांचा दाखला

● अर्जदाराचे किंवा त्याच्या वडीलांचे जन्मस्थळ भारताबाहेरील असेल तर त्यांच्या पासपोर्टच्या सर्व पानांची साक्षांकित झेरॉक्स प्रत

● दहावी बोर्ड सर्टिफिकेट

(वरील कागदपत्रांची फाईल बनवुन त्याची साक्षांकित प्रत तयार करुन ठेवावी.)

३) प्रक्रिया – सेतु केंद्रातुन वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र काढणे

सेतु/नागरी सुविधा केंद्र/तहसील कार्यालयामधुन डोमीसाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारा फॉर्म घ्यावा. त्यातील सर्व माहिती अचुकपणे भरुन तुमची सही करावी. त्यावर १०₹ किंमतीचे कोर्ट फी स्टँप/तिकीट लावावे. तुमचा फोटो लावावा. या फॉर्मसोबत वर यादीत दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत. हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला फॉर्म सेतु/नागरी सुविधा केंद्र/तहसील कार्यालयमध्ये जमा करावा. फॉर्म जमा केल्यावर पोचपावती/टोकन घ्यावे. सदर टोकन वर तुमचे डोमीसाईल प्रमाणपत्र मिळण्याची तारीख दिली जाते. हे टोकन जपुन ठेवावे आणि टोकनवर दिलेल्या दिवशी येऊन टोकन दाखवुन आपले डोमीसाईल प्रमाणपत्र घ्यावे. त्यावर तहसीलदाराची सही-शिक्का असल्याची खात्री करावी. डोमीसाईल प्रमाणपत्र मिळाल्यावर त्याच्या आवश्यक तेवढ्या झेरॉक्स काढुन सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवाव्यात.

(कृपया परवानगीशिवाय हा मजकुर इतरत्र छापु नये.)

© लोकराज्य टीम.

Leave a Reply