महाराष्ट्राचे आबा…

महाराष्ट्राचे आबा…

राष्ट्रवादीच्या इतिहासातले एक सुवर्ण पान… आबा..

रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर.आर.पाटील. जिल्हा परिषद सदस्य, 6 वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, NCP प्रदेशाध्यक्ष असा सत्तापदांचा प्रवास करुनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले. त्यांनी स्वत:चा कधी आबासाहेब होऊ दिला नाही…आबांची स्वच्छ प्रतिमा कायम लक्षात राहते. राजकारणी असूनही त्यांनी त्यांच्यातला माणूस कधीच मरु दिला नाही. अत्यंत साधं राहणीमान, सर्वसामान्यांशी असलेला थेट संवाद त्यामुळे ते सगळ्यांना कायम आपलेसे वाटले. आबांच्या कुटुंबाने सुद्धा हा साधेपणा कायम टिकवला .

शाळकरी वयातच प्राचार्य पी. बी.पाटील यांचे मार्गदर्शन आबांना मिळाले. पुढे सांगलीतल्याच शांतीनिकेतन महाविद्यालयातून ते बीए झाले. मग एलएलबी केलं. गरिब शेतकरी कुटुंबातल्या या तरुणाचे नेतृत्वगुण सुरवातीला हेरले ते वसंतदादा पाटलांनी. कोणतीही राजकीय पार्श्वभुमी नसतानाही मनाला भिडणारी भाषणशैली, स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काही करण्याची जिद्द यांच्या जोरावर आबांनी राजकारणात वाटचाल सुरु केली.

बारामतीच्या शारदा व्याख्यानमालेत एकदा आबा बोलत होते. कॉलेजमध्ये असताना तेव्हा त्यांच टिव्हीवर ते ऐकलेल भाषण आठवलं की आजही अंगावर शहारा येतो. गरिबी क्लेशकारक असते, याचा अनुभव आबांनी घेतला होता. वडिलांच्या मृत्युनंतर त्यांचेच कपडे घालून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी माती वाहिली. त्यातून मिळालेल्या पैशातून बहिणीचे, स्वत:चे शिक्षण पूर्ण केले. सत्य तेच बोलायचे. हे ध्येय ठेवून काम केल्यामुळेच एक सामान्य मुलगा राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकला. वक्तृत्व स्पर्धेतून अनेक बक्षिसे मिळविली. त्या स्पर्धांमधूनच आबा तयार झाले. जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर आबांच्या पायात चप्पल आली. सलग 2 तास ते बोलत होते.

आबा हे धडाडीचे निर्णय घेऊ शकले त्याला कारण आहे. त्यांच्या पाठीशी शरद पवार भक्कमपणे उभे राहिले. अगदी सुरुवातीपासून सर्व विरोध डावलून पवारांनी आबांच्या पाठीवर हात ठेवला. युती सरकारच्या काळात पवारांनी आबांना पक्षाचा मुख्य प्रतोद केल्यानंतर काँग्रेसमध्ये अनेकांच्या भुवय्या उंचावल्या होत्या. पण आबांनी युतीच्या मंत्र्यांचे विधानसभेत वाभाढे काढले… आणि शरद पवारांचा विश्वास सार्थ करून दाखवला. म्हणूनच पवारांनी सगळ्यांना बाजूला करुन आबांना थेट उपमुख्यमंत्री केलं.

आबा पदावर असताना खूप महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. डान्सबार बंदी, पोलिसांचे वेतनवाढ, भरतीतील गैरप्रकार आबांच्या काळातले महत्त्वाचे निर्णय… तर गृहमंत्रीपदाच्या काळात त्यांनी राबवलेले महात्मा गांधी तंटामुक्त अभियान ही अभिनव होते. डान्सबार बंदीवरचा आबांचा निर्णय धाडसी आणि वादग्रस्त ठरला, पण बार मालकांचे धाबे दणाणले.

नक्षलग्रस्त गडचिरोलीचंही पालकत्व स्वीकारून आदिवासींच्या नेमक्या समस्या जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. फार कमी जणांना माहित असेल पण आबांच्या काळात सगळ्यात जास्त नक्षलग्रस्तांनी समर्पण केलं एवढंच नाही, तर आदिवासी मुलांना दत्तक घेऊन इंग्रजी शाळेत त्यांनी घातलं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणलं.

आबांच्या जाण्याने उभा महाराष्ट्र हळहळला. राष्ट्रवादीचा स्वच्छ, सोज्ज्वळ चेहरा म्हणून आबांची ओळख होती. एकदा शरद पवार म्हणाले होते “काही माणसे अशी असतात की त्यांच्या कर्तृत्वाने, वागण्याने, समाजाच्या उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी त्यांनी केलेल्या कष्टाने, सार्वजनिक जीवनामध्ये लोकांच्यामध्ये कसे राहावे याचा ते आदर्श ठरतात.” त्यांचं वाक्य खरं ठरलं. कारण आबा तसेच होते. त्यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावून गेली.

महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली…!

साभार : शैलजा शशिकांत जोगल
अँकर, जय महाराष्ट्र न्यूज