महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाचा इतिहास

शेती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासातील खुप महत्वाचा टप्पा आहे. या शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. शेतीच्या आधाराने मानवाला स्थैर्य प्राप्त झाले आणि हळुहळु स्थिर लोकसमुह जीवनात संस्कृती उदयाला यायला लागली. मानवसमुहाने या कृषिप्रधान संस्कृतीत आपले पोषण करणाऱ्या भुमी आणि त्या भुमीवर धान्य पिकवणारी स्त्री यांना आदिशक्ती स्वरुपात प्रतीक म्हणुन स्वीकारले. काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या शक्तीच्या प्रतीकाबद्दल आदरभाव व्यक्त करण्याची पद्धत बदलत गेली. बंगालमध्ये होणारा दुर्गापुजा उत्सव त्याच परंपरेतील आहे. बंगालमधील काही व्यापारी विदर्भात येऊन स्थायिक झाल्यानंतर त्यांनी इकडेही दुर्गापुजा उत्सव सुरु केला. आपल्याकडील लोक त्यात सहभाग घेऊ लागले. त्या अगोदर या उत्सवाची फारशी चर्चा नव्हती. परंतु महाराष्ट्रात हा उत्सव सार्वजनिक स्वरुपात कधी आणि कोणत्या पार्श्वभुमीवर सुरु झाला याची माहिती आपल्याकडे अभावानेच आढळते.

१८९२ मध्ये पुण्याला भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. नंतर गणेशोत्सवाला व्यापक स्वरुप येत गेले आणि तो महाराष्ट्रभर पसरला. हळुहळु गणेशोत्सवात सनातनी लोकांचा प्रभाव वाढत गेला. मुंबईत दादरलाही गणेशोत्सव मोठ्या स्वरुपात साजरा व्हायचा. सर्व लहानमोठ्या जाती जमातींकडुन त्यासाठी वर्गणी गोळा केली जायची. दादरकर ब्राह्मण मंडळी पुढाकार घेऊन उत्सव साजरा करतात म्हणुन बाकीच्या लोकांनीही उत्सवासाठी त्यांना सहकार्य केले. नंतर मात्र या ब्राह्मण मंडळींचा प्रभाव इतका वाढला की दादरच्या कार्यकारी मंडळावर त्यांनी ताबाच घेतला. इतर लोकांनी उत्सवात एखाद्या कार्यक्रमासाठी कुणाचे नाव सुचवले की ही मंडळी त्यांना सरळसरळ नकार देऊ लागली. त्यांनी आपल्याच जातबांधवांना जास्तीत जास्त संधी देण्याची भुमिका घेतली. बाकीचा समाज या घटना बारकाईने पाहत होता.

१९२३-२४ च्या दरम्यान गणेशोत्सव हा अखिल हिंदुंचा उत्सव आहे तर मग त्यात स्पृशांसोबत अस्पृशांनाही सहभागी होऊन पुजन करण्याचा हक्क असला पाहिजे या मागणीने जोर धरला. त्याकाळात स्पृश्य-अस्पृश्यता भेदभाव कमी करण्यासाठी काही युवक मंडळे काम करत होती. त्यांना दादरचे हे प्रकरण समजल्यावर त्यांनी लोकांची मागणी उचलुन धरली आणि तशा मागणीचे लेखी पत्र दादर गणेशोत्सवाच्या कार्यकारी मंडळाला दिले. त्यावर अनेक वादविवाद झाले. प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी यात पुढाकार घेतला. दादरच्या कार्यकारी मंडळासोबत चर्चा झाली. मार्ग निघाला. “रिवाजाप्रमाणे आधी ब्राह्मणाने गणेशाची शास्त्रोक्त पुजा करायची त्यानंतर अस्पृश्यांनी अंघोळ केल्यानंतर ब्राह्मण पुजाऱ्याच्या हातात फुले शिवुन द्यायची आणि ब्राह्मणाने ती शिवुन घेऊन पुढे गणपतीला अर्पण करायची” असा तो तोडगा. ठरल्याप्रमाणे संपुर्ण गणेशोत्सवात हा प्रकार पार पडला.

परंतु कर्मठ सनातन्यांनी दरवर्षी हा प्रकार चालणार नाही असा गाजावाजा करत १९२६ पासुन दादरला होणारा गणेशोत्सवाच बंद करण्याचा निर्णय घेतला. सनातन्यांच्या हा कावेबाजपणा प्रबोधनकार ठाकरे व इतर नागरिकांना आवडला नाही. सनातन्यांच्या या वृत्तीला छेद देण्यासाठी सर्व जाती जमातींना एकत्रित बंधुभावाने सामावुन घेणाऱ्या अजुन एखाद्या सार्वजनिक उत्सवाची गरज प्रबोधनकार आणि इतर मंडळींना वाटु लागली.

महाराष्ट्राची कुलदेवता आईभवानीच्या दरबारात कोणताही जातीभेद न मानता सर्वांना मुक्त प्रवेश होता. तिचा नवरात्र उत्सव हाच महाराष्ट्राचा राष्ट्रीय उत्सव. शिवरायांच्या काळापासुन आई तुळजाभवानीचा जागर महाराष्ट्राच्या घरोघरी आणि गडांवर होत होता. पेशवाईच्या काळात यात खंड पडला. टिळकांनी गणेशोत्सवाचे स्तोम अजुन वाढवल्यामुळे तिकडे दुर्लक्ष झाले. आपणच या ऐतिहासिक परंपरेचे पुनरुज्जीवन करायला हवे असा विचार करुन प्रबोधनकारांच्या पुढाकाराने “लोकहितवादी संघ” स्थापन झाला. त्या माध्यमातुन १९२६ मध्ये दादरला महाराष्ट्रातील पहिला “श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव” साजरा झाला.

दादरच्या लोकहितवादी संघाची भुमिका महाराष्ट्रभर सर्वांना आवडली. या पहिल्याच नवरात्र उत्सवासाठी लोक येऊ लागले. संघाचे अध्यक्ष म्हणुन रावबहादुर बोले यांनी सर्वांचे स्वागत केले. मंडपात शिवरायांचा भगवा ध्वज उभा करण्याचा मान दलित समाजातील आमदार सोळंकी यांना देण्यात आला. दलित दांपत्याकडुनच धार्मिक विधी करण्यात आला. पालवेशास्त्रींनी धार्मिक विधीचे काम पाहिले. कविवर्य बसंत बिहार यांनी देवीची आरती गायली. उत्सवाला दररोज हळुहळु गर्दी वाढु लागली. एका संध्याकाळी यमुनाबाई घोडेकर या बाजारात भाजी विकणाऱ्या महिलेचे तडफदार भाषण झाले. दादरच्या प्रसिध्द पंचम बुवांचे “दार उघड बये..” या कवनावर किर्तन झाले. छत्रपती शिवराय, उमाजी नाईकांवर पोवाड्याचा कार्यक्रम झाला. दररोज काही ना काही प्रवचन, नाटके, स्पर्धा होऊ लागली. संपुर्ण उत्सवात लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

दसऱ्याचा शेवटचा दिवस उजाडला. शिलांगणाच्या स्वारीसाठी लोक गर्दी करु लागले. मात्र पोलीस काही केल्या मिरवणुकीला परवानगी देईनात. तेव्हा रावबहादुर बोले, केळुसकर गुरुजी, नवलकर वकील यांनी आपले वजन वापरुन परवानगी मिळवली. विराट मिरवणुक निघाली. मिरवणुकीतल्या गर्दीसमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे छोटेखानी भाषण झाले. लोकांनी दसऱ्याचं सोनं लुटलं. जोंधळ्यांच्या लाह्यांचा प्रसाद वाटला गेला. बंगालमध्ये उत्सवमुर्तीला बुडवण्याचा प्रघात होता, महाराष्ट्रात मराठ्यांनी तो बंद केला. सर्वत्र लोकांच्या उत्साहात पहिल्या श्री शिवभवानी नवरात्र महोत्सवाचा समारोप झाला. पुढे १९२९ पर्यंत प्रबोधनकार ठाकरेंनी हा उत्सव चालवला. त्यांनतर आजारपणामुळे ते कर्जतला गेले. मात्र खांडके आळीतील लोकांनी हा उत्सव पुढे चालु ठेवला. या उत्सवाचे लोण नंतर महाराष्ट्रभर पसरले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज आदिशक्तीचा जागर घातला जातो.

आज महाराष्ट्रात सर्वत्र साजरा होणाऱ्या सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा हा इतिहास आहे. कर्मठ सनातनी लोकांनी गणेशोत्सवात जो सांस्कृतिक वर्चस्ववाद, संकुचित जातीयवाद जोपासला त्याला शह देण्यासाठी या नवरात्र उत्सवाचे पुनरुज्जीवन झाले. मात्र आज या नवरात्र उत्सवात सुद्धा कर्मठ सनातन्यांचे प्रस्थ वाढत आहे हे चिंताजनक आहे. इतिहासातुन लोकांनी धडा घ्यावा…

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top