पगडी पुराण

शनिवारवाड्याच्या बुरुजावरुन ऐकु येणाऱ्या “काका, मला वाचवा !” प्रमाणेच “पुणेरी पगडीचा अवमान झाला”च्या आर्त किंकाळ्या काळाच्या ओघात हळुहळु हवेत विरुन जातीलही. मात्र मागे उरलेलं त्यांचं कवित्व “पुणेरी टोमणे” मारण्यासाठी कधी, कुठं आणि कसं उफाळुन येईल हे काय सांगता येत नाही. २००९ साली पुणेरी पगडी ही पुण्याची बौद्धिक संपदा म्हणुन घोषित झाली.

खरं तर “पुणेरी टोमणे” हीच पुण्याची अस्सल बौद्धिक संपदा म्हणुन मागणी करायला हवी होती. निदान पुणेरी पगडीसारखा त्यांना पर्याय तरी मिळाला नसता आणि याचा अभिमान बाळगत नाक वर करुन मिरवता तरी आलं असतं. आता राहुन राहुन का होईना ज्यांना असं वाटत असेल त्यांच्याबाबद्दल आपण सहानुभूती बाळगायला हरकत नाही. असो !

आपल्या पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात मा.शरदचंद्रजी पवार साहेबांनी जमलेल्या लोकांना “राष्ट्रवादीच्या भविष्यातील सर्व कार्यक्रमात महात्मा फुले पगडी वापरावी” असा सुचक सल्ला दिला. मात्र पवारांनी केलेलं हे वक्तव्य म्हणजे तमाम पुणेकरांचा अवमान असल्याचा आरोप सोवळं पाळणाऱ्या खोले बाईंचे बचावकर्ते करताना दिसत आहेत. मागे या बचावकर्त्यांनी एका वाहिनीवरील चर्चेत “ब्राह्मण आणि ब्राह्मण्य वेगळे नाहीत, ते एकच आहेत” अशी पुष्टी दिली होती ही गोष्ट याठिकाणी परत एकदा निदर्शनास आणुन देतो, म्हणजे आरोप करणाऱ्यांच्या मानसिकतेची जरा ओळख होईल. असो !

पुण्यामध्ये एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचा एक समुह आहे, जो स्वतःला “तमाम पुणेकर” म्हणवुन घेतो. खरं तर या समुहाच्या विचारांना पोषक असतील इतकीच या तमामांची संख्या ! आमचीच जात, आमचेच हात आणि आमचाच वरणभात असल्या आत्मकेंद्री मानसिकतेत जगणारे हे लोक. यांची प्रतीकं, यांच्या परंपरा, यांची सांस्कृतिक मुल्ये हीच सर्वश्रेष्ठ असल्याचा यांचा दावा ! यावर कुणी काही बोललं की यांच्यातला “तमाम” जागा होतो. बाकी वेळी हा तमाम निवांत झोपलेला असतो. सध्या महात्मा फुलेंच्या पगडीला विरोध करण्यासाठी तो जागा झालाय !

तसं बघायला गेलं तर पुण्याच्या इतिहासात अनेक पगड्यांचे उल्लेख आहेत. संत तुकोबारायांनी डोक्यावर “पागोटे” घालुन पुण्याच्या भूमीत वारकरी संतविचारांची मशागत केली. जिजाऊंच्या आशिर्वादाने शिवरायांनी “जिरेटोप” चढवला आणि सोन्याच्या फाळाने पुण्याची जमीन नांगरली, पुणे वसवले. त्याच पुण्याच्या बारा मावळातील मावळ्यांनी डोक्यावर “मावळा पगडी” घालुन पुण्याचे रक्षण केले. “शिंदेशाही पगडी”चं शिरस्त्राण घालुन महादजी शिंदे पुण्याच्या भूमीत धारातीर्थी पडले. महात्मा फुलेंनी समतेचं “पागोटे” घालुन शिक्षणव्यवस्थेची सुरुवात याच पुण्यात केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा बसवताना पेठेतील लोकांकडुन मिळालेली वागणुक पाहुन पुतळ्याच्या रक्षणासाठी राजर्षी शाहू महाराजांनी पुण्यात पाटलांची मोठी सभा भरवली आणि तिथली जागा त्यांना इनाम दिली. डोक्यावर “फेटा” घालुन याच पाटलांनी पुण्याचा कारभार केला. महात्मा गांधींच्या विचारांनी भारावुन स्वातंत्र्यलढ्यात “गांधी टोपी” घालुन सर्वसामान्य लोकांनी स्वातंत्र्याची पहाट पाहिली. “पेशवाई पगडी” घालुन शनिवारवाड्यावर घटकंचुकीचा खेळ खेळणाऱ्या पेशव्यांनाही इथे विसरुन चालणार नाही.

तर अशा या सगळ्या पगड्या एका बाजुला असताना पुणेरी पगडी हीच पुण्याची सांस्कृतिक ओळख म्हणुन प्रस्थापित करणे कितपत योग्य आहे ? बरं त्यावर काही बोललं की ब्राह्मणद्वेषाचा शिक्का मारायला हेच “तमाम” नावाचे विशिष्ट पुणेकर नेहमी पुढे का असतात ?

न्या.रानडे, गोखले, टिळक, चिपळूणकर, पोतदार, इत्यादि मंडळींनी डोक्यावर पुणेरी पगडी परिधान केली. त्यांच्या विद्वत्तेचं प्रतीक म्हणुन पुणेरी पगडीला एवढा बहुमान मिळावा अशी भावना असेल तर इतर पगड्यांनाही स्वतःची वेगळी ओळख आहेच की ! बाकीच्या पगड्यांनाही इतिहास आहेच की ! याच भुमिकेतुन पुरोगामी विचारांची कास धरणाऱ्या पवार साहेबांनी महात्मा फुले पगडीबाबत भाष्य केलं तर त्यात कुणाचा तिळपापड व्हायचं कारण नाही.

आम्ही पुण्यातील समविचारी लोकांनी फेब्रुवारी २०१७ आणि जानेवारी २०१८ मध्ये पुण्यात घेतलेल्या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात पवारांना अनुक्रमे शिंदेशाही पगडी आणि फुले पगडी घालुन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यावेळी स्वतःला महात्मा फुलेंचे अनुयायी म्हणवणारे हरी नरके नामक गृहस्थ काहीबाही बरळले होते. आताही बरळले आहेत. असो. आता इथल्या तो चर्चेचा विषय नाही.

आपल्याकडे वेगवेगळ्या जाती आहेत, त्यांचा उल्लेख आपण अठरापगड जाती असा करतो. खरं तर हा “अठरापगड” शब्दच इतका सुचक आहे की त्यातुनच वेगवेगळ्या जातींच्या लोकांमध्ये वेगवेगळ्या पगड्या घालण्याची प्रथा होती हे कळुन येते. अशा सगळ्या पगड्या असताना एका विशिष्ट पगडीलाच प्रतिष्ठित करण्याचा अट्टाहास का ?

महात्मा फुलेंचा लढा समतेचा होता. कोल्हापुरच्या चौथे शिवाजी महाराज यांना दरबारातील दिवाण रावबहादूर बर्वे याने वेडे ठरवले आणि त्याच्या सांगण्यावरुन इंग्रज सरकारने महाराजांना जेलमध्ये कोंडुन ठेवले. या प्रकरणात टिळक-आगरकरांनी इंग्रज सरकारला धारेवर धरल्याने दोघांना डोंगरी येथे तुरुंगवास झाला. महात्मा फुलेंनी यात लक्ष घालुन आपले मित्र व सत्यशोधक समाजाचे कोषाध्यक्ष रामशेठ उरवणे यांना तेव्हाचे दहा हजार रुपये पाठवुन टिळक-आगरकरांचा जामीन करवुन घेतला. त्यानंतर सत्यशोधक समाजाच्या वतीने दोघांची मोठी मिरवणुक काढली. (संदर्भ – केसरी, ३ ऑक्टोबर १८८३, पान ३).

हे तेच फुले आहेत ज्यांना आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत सहभाग घेतला म्हणुन पुणेरी पगडीवाल्या लोकांनी हाकलुन लावले होते. अशा फुलेंच्या नावे पुण्यात मंडई आहे, मात्र तिथेही पुणेरी पगडी घालुन टिळकांचा पुतळा उभा केला आहे. हे एक प्रकारचे सांस्कृतिक आक्रमण आहे.

पुणेरी पगडीला पवारांचा किंवा आमचा कुणाचा विरोध नाही. शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर यांचे पुरोगामी विचार ही महाराष्ट्राची ओळख आहे. ती ओळख जपण्याचे काम आम्ही करत राहणार. त्यादृष्टीने फुले पगडीला सांस्कृतिक प्रतिष्ठा मिळावी म्हणुन पवारांनी घेतलेली भुमिका अत्यंत स्वागतार्ह आहे…

साभार : अनिल माने.

#पवारसाहेब #पगडी #पुरोगामी

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top