इतिहासाच्या काठावरुन…

इतिहासाच्या काठावरुन…

इतिहास हा मुळातच प्रवाही असतो. भुतकाळात घडलेली घटना, त्या घटनेची पार्श्वभुमी हे या प्रवाहाचं उगमस्थान म्हणता येईल. कालपरत्वे उपलब्ध होणारी इतिहासाच्या अभ्यासाची संदर्भ साधने या प्रवाहाला येऊन मिळत असतात आणि इतिहासाचा प्रवाहीपणा जिवंत ठेवतात. ही प्रक्रिया जोपर्यंत सुरु असते तोपर्यंत इतिहासाचा प्रवाह आपले स्वरुप आलटत पालटत सातत्याने निखळपणे वाहत असतो. मग कुणी इतिहास अभ्यासक, संशोधक बनुन या प्रवाहात उतरतं तर कुणी वाचकाच्या भुमिकेत काठावर बसुन आपल्या परीनं प्रवाहाचं, प्रवाहात उतरलेल्यांचं निरीक्षण करत असतो. 

प्रवाहात उतरलेल्यांनी त्यातुन काय शोधावं, काय उपसावं हा जसा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो तसंच काठावर असणाऱ्यांच्या बाबतीत त्यांनी त्यातलं काय घ्यावं, काय टाळावं हा ज्यांचा त्यांचा वैयक्तिक विषय असतो. सर्वसाधारणपणे जे निर्मळ आहे, जे गरजेचं आहे किंवा जे भावी काळासाठी आपल्याला उपयोगी पडु शकतं असंच काही शोधलं जाणं किंवा घेतलं जाणं हे नैसर्गिक आहे. मात्र तरीही जगतगुरु संत तुकोबारायांच्या “तुका म्हणे झरा मुळचाचि आहे खरा” या उक्तीप्रमाणे जे मुळचंच असतं तेच खरं असतं, हे जरी लक्षात ठेवलं तरी त्यातुन संशोधकांनी, अभ्यासकांनी, वाचकांनी काय घेणं अपेक्षित आहे याचा बोध होतो.

एका अर्थानं या इतिहासाचं प्रवाही राहणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं असतं. परंतु इतिहासाच्या प्रवाहाला आपल्या सोयीनं बांध घालुन प्रवाह वळवण्याचा प्रयत्न व्हायला लागले की त्या प्रवाहाला वेगवेगळे फाटे फुटतात. साधनांत किंवा साधनांचा अर्थ लावताना भेसळ झाली की प्रवाह प्रदुषित होतो. अशा प्रदुषित प्रवाहामुळे खरेतर सामाजिक आरोग्य बिघडतं. सर्वसामान्य वाचक इतिहासाकडे पाहताना त्याच्यासाठी इतिहासातुन घेण्यासारखी जी चांगली गोष्ट असेल तेवढीच घेत असतो. त्याच्या बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी तो टाळत असतो. म्हणुन स्वतः इतिहास समजुन घेणं हे जितकं संवेदनशील काम असतं तितकंच तो इतरांपर्यंत पोहोचवणं हेदेखील संवेदनशील काम आहे.

इतिहासाचं आकलन आपल्याला भुतकाळाच्या जितकं जवळ घेऊन जात असतं तितकंच ते भविष्यकाळाच्या वाटचालीत मार्गदर्शक ठरत असतं. मात्र त्यासाठी इतिहासाला वर्तमान संकल्पना, मुल्ये लावुन त्याचे आकलन करणे हे जितके असंयुक्तिक आहे तितकेच इतिहासातील संकल्पना, मुल्ये यांना वर्तमानात यथास्थित पद्धतीने अंमलात आणणे हे सुद्धा असंयुक्तिक आहे. शेवटी इतिहास हे भुतकाळातील चुका टाळण्यासाठी अभ्यासायचे साधन आहे. या साधनाच्या माध्यमातुनच जर वर्तमानात चुका होणार असतील तर भविष्यात इतिहासाचा निखळ प्रवाह डोळ्यासमोर आटलेला बघण्याची वेळ येईल…

बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय !

Leave a Comment

error: Content is protected !!
Scroll to Top